ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मुहम्मद रफी तू बहोत याद आया…!

July 30, 202118:50 PM 93 0 0

३१ जुलै १९८०.‌ मुंबईचे जुहू येथील कब्रस्तान.‌ एक जनाजा आणि दहा हजारांहून अधिक लोक. भारतातील सर्वात मोठा अंत्यविधी. कोट्यावधी लोकांच्या हृदयात घर करणाऱ्या भारतातल्या सर्वात मोठ्या गायकाचे हृदयविकाराच्या झटक्यानंतर निधन झाले ज्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने दोन दिवस जाहीर शोक व्यक्त केला तो लोकोत्तर पार्श्वगायक मोहम्मद रफी आपल्या असंख्य चाहत्यांना सोडून गेला. ज्यांच्या मनमस्तिष्कात रफी आवाजाच्या रुपाने गुंजत होते ते कावरे बावरे झाले होते. शहर में चर्चा है , ये दुनिया कहती है कहीं तू वही तो नही…शाम फिर क्यूु उदास है दोस्त, तू कहीं आस पास है दोस्त”, ही धर्मेंद्र आणि हेमामालिनी अभिनित आसपास (१९८१) या चित्रपटातील गाणी त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधी रेकॉर्डिंग केले गेले होते. गाण्याची रेकाॅर्डिंग झाली आणि त्यानंतर संगितकार लक्ष्मीलाल प्यारेलाल यांना ते म्हणाले की, ‘मी आता निघून जातो’ आणि ते कायमचे निघून गेले. रफी यांच्या अंत्ययात्रेत हिंदू,मुस्लिम, शिख, इसाई सर्व धर्मातील लोक सामील झाले होते. मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यातच रफी यांचे निधन झाले होते तेही रमजानचे शेवटचे दिवस होते. बांद्र्याच्या बडी मस्जिदमध्ये जनाजा-ए-नमाज अदा झाली त्यात राज कपूर, राजेंद्र कुमार, सुनील दत्त यांच्यासह चित्रपट सृष्टीतील झाडून सारे लोक उपस्थित होते. त्यांच्या पार्थिवाला सर्वच धर्माच्या लोकांनी खांदा दिला ही अलौकिक गोष्ट होती. त्यांच्या अंत्ययात्रेला जे लोक उत्स्फुर्तपणे जमले होते ते केवळ त्यांच्यासाठीच जमा झाले होते. तिथे आलेले वा न येऊ शकलेले सर्वचजण दु:खी, कष्टी होते. आसवं गाळीत होते. मनातल्या मनात रडत होते. अंत्ययात्रेवर सतत पाऊस कोसळत होता. निसर्गही रडत होता. आभाळही त्यांना अलविदा म्हणण्यासाठी जमिनीवर उतरले होते. रफी साहेब जणू म्हणत होते की, तुम मुझे यूँ…भुला ना पाओगे… कब्रस्तानात जागेअभावी सन २०१० मध्ये, मधुबालासारख्या अनेक चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह मोहमद रफी यांची थडगी पाडली गेली आणि मयत झालेल्या नवीन लोकांना दफन करण्यासाठी जागा तयार केली गेली. परंतु चाहत्यांनी रफी यांच्या मकबऱ्याच्या ठिकाणी नारळाचे झाड लावले. रफी यांच्या जन्म आणि मृत्यूच्या वर्धापन दिनी वर्षातून दोनदा त्याच्या समाधीस भेट देणारे चाहते त्याच्या थडग्याच्या जागी नारळाच्या झाडाचा रफीस्मृती म्हणून तिथे फुले वाहतात.

जेव्हा एके काळी फक्त रेडिओ हेच जनमानसांच्या मनोरंजनाचे तथा प्रबोधनाचे साधन होते तेव्हा रफी साहेब दररोज त्यांच्या चाहत्यांना भेटत असत. त्यांच्या अनेक चाहत्यांकडे रफींची हजारो गाणी आजही संकलीत आहेत. त्यांनी अनेक भाषांमधील मिळून जवळपास ७४०० गाणी गायली आहेत. त्यांची गाणी ऐकूनच खेड्यापाड्यातही अनेक गायक तयार झाले. रफी यांच्या दर्दभऱ्या आवाजाचे शौकीन जगभर सापडतात पण त्यांच्या गाण्यावर आणि आवाजावर फिदा झालेला एक अवलिया चाहता गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये राहतो. त्याचे उमेश माखिजा असे नाव असून त्याने चक्क रफी यांचे मंदिर बांधले आहे. अख्ख्या विश्वात असे एकमेव मंदिर आहे, असे त्याचे म्हणणे आहे. या मंदिराची ख्याती दिवसेंदिवस वाढत चालली असून देश-विदेशातून चाहते मंदिराला भेट देण्यासाठी येतात. विशेषतः सुट्टीच्या दिवशी दरबारच भरतो. लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, इंडोनेशिया इथून चाहते भेट देऊन गेले आहेत. देशभरातून तर नेहमीच चाहते येतात. हिंदी आणि गुजराती चित्रपटातील कलाकारांनी अनेक वेळा या मंदिराला भेटी दिल्या आहेत. त्यांच्यासाठी जागा अपुरी पडू लागल्याने देव्हाऱ्याजवळच्या तीन खोल्या त्यांनी पडल्या असून ती जागा भक्तांसाठी मोठा हॉल म्हणून तयार केली आहे. स्वतः माखिजा आता शेजारच्या फ्लॅटमध्ये रहायला गेले आहेत. या मंदिराला रफीचे मुंबईतील कुटुंबीयसुद्धा नियमित भेट देतात. एवढेच काय एकमेकांच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात ही हे कुटुंबीय एकत्र येतात. रफींच्या आवाजातील गाणी हीच आपल्यासाठी भजने आहेत. ही गाणीच दिवसभर स्फूर्ती देतात , असे ते म्हणतात. थकून भागून रात्री घरी आल्यानंतर माखिजा मंदिरात जातात आरती करून मंदिरातच गाणी ऐकल्यानंतर मग जेवण करून झोपतात. माखिजा यांनी ज्या ठिकाणी रफीचे मुंबईत दफन करण्यात आले त्याठिकाणची मातीही आपल्या संग्रही ठेवली असून ती ते दररोज कपाळी लावतात. पूजेच्या कामांमध्ये त्यांचा नातू एतांश व मुलीचा मुलगा दानिश ही लहान मुले मनापासून मदत करतात. पत्नी पुनम आणि मुलगी आरती ही मंदिराची देखभाल करतात, असे त्यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. आणखी एका चाहत्याची गोष्ट. मोहम्मद रफींच्या विषयी संगीतकार नौशाद नेहमी एक किस्सा सांगतात. एका गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यायची होती. या गुन्हेगाराला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली. या गुन्हेगारानं त्याच्या कुटुंबाला भेटण्याची, विशेष खाद्यपदार्थांची मागणी केली नाही. तर त्यानं इच्छा व्यक्त केली की, त्याला ‘बैजू बावरा’ सिनेमातलं ‘ऐ दुनिया के रखवाले’ हे गाणं ऐकायचं आहे. त्यानंतर एक टेपरेकॉर्डर आणून त्याला हे गाणं ऐकवण्यात आलं.

मोहम्मद रफी यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या नावानेही काही संस्था पुरस्कार देतात. हिंदी, उर्दू, मराठी, इंग्रजी, तेलगू, पंजाबी, गुजराती, बंगाली अशा विविध भाषांमधून हजारो गीतांना स्वरबद्ध करणारे पद्मश्री मुहम्मद रफी या दिग्गज गायकाचा भारत सरकारने मरणोपरान्त ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान करावा, अशी इच्छा २०१८ त्यांच्या अस्सल व कट्टर ६५ वर्षीय चंद्रकांत दुसाने या एका चाहत्याने केली. बालपणापासून रफींच्या गीतांची भुरळ पडलेल्या दुसाने यांनी आपले उभे आयुष्य त्यांच्या गीतांवर प्रेम करण्यात व्यतीत केले. त्यांनी रफींच्या आवाजातील सुमारे वीस हजार गीतांचा संग्रह करून रेकॉर्डप्लेअर, कॅसेट, सीडीच्या माध्यमातून करून ठेवला आहे. हा संग्रहच मला उतारवयात तारुण्याची ऊर्जा बहाल करत असल्याचे दुसाने यांनी आवर्जून सांगितले. दुसाने यांनी एखादी गोष्ट करावी किंवा करू नये यासाठी त्यांना त्यांच्या मातोश्री बालपणापासून महाविद्यालयीन जीवनापर्यंत थेट रफीजींची ‘कसम’ देत असे, अशी आठवणही त्यांनी सांगितली. जुन्या काळात तांग्यातून नव्या चित्रपटाची उद्घोषणा केली जात होती. त्यावेळी ज्या चित्रपटांमध्ये रफींची गीते आहेत ती उद्घोषणेदरम्यान कानी पडली की दुसाने त्या तांग्यामागे फिरत असे. दुसाने यांनी जेव्हा नवीन घर घेतले तेव्हा त्यांनी कुठल्याही प्रकारची पूजाविधी करण्याअगोदर वास्तुशांती चक्क रफींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली. तसेच संपूर्ण दिवसभर मित्र परिवारासह रफीजींवर प्रेम करणाऱ्यांना बोलावून त्यांची गाणी ऐकविली होती. दुसाने यांनी ३५ वर्षे कंपनीत कामगार म्हणून नोकरी करतानाही रफींच्या गीतांचा छंद तितकाच निष्ठेने जोपासला. ‘ओन्ली रफीं’चे त्यांच्याकडे एक हजार रेकॉर्ड, आठशे कॅसेट, ३५० सीडींचा संग्रह आहे. ४फेब्रुवारी १९८० ला श्रीलंकेच्या स्वातंत्र्यदिनी त्यांना एका विशेष शोसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यासाठी बारा लाख लोक जमले होते. तो त्या काळातील जागतिक विक्रम होता. श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती जे. आर. जयवर्धने आणि पंतप्रधान प्रेमादासा कार्यक्रमाचं उद्घाटन करून निघून जाणार होते. पण रफींच्या गायनानं त्यांना असं काही मोहीत केलं की, ते कार्यक्रम संपेपर्यंत तिथंच थांबून राहिले. रफी यांची सून यास्मीन खालिद यांनी रफी यांच्यावर पुस्तक लिहिलं आहे. त्या म्हणतात, “रफी परदेशात गेले की तिथल्या भाषेतलं एक गाणं म्हणत. श्रीलंकेत रफी यांनी सिंहली भाषेत गाणं ऐकवलं.” ते जेव्हा हिंदीत गाऊ लागले आणि गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. या गर्दीत हिंदी समजणारे फारच कमी लोक असतील.

सोनू निगम, महेंद्र कपूर, शब्बीर कुमार, मोहम्मद अजीज आणि उदित नारायण या गायकांन वर मोहमद रफीच्या गायनाच्या शैलीचा प्रभाव होता. अन्वर (गायक) यांनीही रफीच्या आवाजाचे अनुकरण केले. २२ सप्टेंबर २००७ रोजी, कलाकार तसावर बशीर यांनी रचित केलेल्या रफीच्या मंदिराचे अनावरण यूकेच्या बर्मिंघॅमच्या फाजेले स्ट्रीटवर करण्यात आले. बशीरला आशा आहे की याचा परिणाम म्हणून रफीला संतांचे स्थान मिळेल. मुंबई वांद्रे उपनगरातील व पुणे येथील पद्मश्री मोहम्मद रफी चौक (एमजी रोड विस्तारत) रफीच्या नावावर आहे. २००८ च्या उन्हाळ्यात, सिटी ऑफ बर्मिंघम सिम्फनी ऑर्केस्ट्राने मोहमद रफी यांच्या पुनरुत्थान नावाची डबल सीडी काढली ज्यामध्ये रफीच्या १६ गाण्यांचा समावेश केला. बॉलिवूड पार्श्वगायक सोनू निगम यांनी या प्रकल्पासाठी आवाज दिला आणि जुलै २००८ मध्ये लंडनमधील इंग्लिश नॅशनल ऑपेरा, मॅन्चेस्टरचे अपोलो थिएटर आणि बर्मिंघमच्या सिंफनी हॉलसह इतर ठिकाणी सीबीएसओकडे भेट दिली. जून २०१० मध्ये, मोहमद रफी व लता मंगेशकर यांच्यासह आउटलुक मासिकातून घेण्यात आलेल्या आउटलुक म्युझिक पोलमध्ये सर्वात लोकप्रिय पार्श्वगायिका म्हणून निवड झाली. याच मतदानाने मोहमद रफी यांच्या “मन रे, तू कह ना धीर धर” (चित्रलेखा, १९६४) या गाण्याला प्रथम क्रमांकाचे गाणे म्हणून मतदान केले. नंबर दोन स्थानासाठी तीन गाणी बांधली गेली: यामध्ये दोन गाणी मोहमद रफी यांनी गायली. ती गाईड (१९६५) मधील ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है’ आणि ‘दिन ढल जाए, है रात ना जाए’ ही गाणी होती. हे सर्वेक्षण आउटलुकमध्ये प्रकाशित झाले. निर्णायक मंडळामध्ये भारतीय संगीत उद्योगातील लोकांचा समावेश होता. दरवर्षी त्यांच्या जन्म आणि मृत्यू वर्धापनदिन स्टेज, रेडिओ आणि दूरदर्शनवर कित्येक हजार संगीत श्रद्धांजली वाहण्यात येतात. आज मोहमद रफी यांची लोकप्रियता जगभरातील त्याच्या प्रचंड फॅन फॉलोवरमध्ये दिसून येते. मोहमद रफी यांच्या लोकप्रिय गाण्यांचे रीमिक्स किंवा पुन्हा तयार करणे सुरू आहे. बीबीसी एशिया नेटवर्कच्या १०० वर्षांच्या हिंदी सिनेमाच्या स्मरणार्थ रफीच्या बहारों फूल बार्साओ यांना सर्वाधिक लोकप्रिय हिंदी गाणे समजले गेले. २०१३ मध्ये सीएनएन-आयबीएनच्या सर्वेक्षणात त्यांना हिंदी सिनेमाचा सर्वात महान आवाज म्हणून मत देण्यात आले.

मोहम्मद रफी यांना सहा फिल्मफेअर पुरस्कार आणि एक राष्ट्रीय फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९६७ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. २००१ मध्ये, हिरो होंडा आणि स्टारडस्ट मासिकाने रफीला “मिलेनियमचे सर्वोत्कृष्ट गायक” म्हणून नाव दिले. त्यांच्यावर लिहिलेली अनेक पुस्तके आहेत. आठवणी मोहम्मद रफींच्या (श्रीधर कुलकर्णी, पाचवी आवृत्ती-जुलै २०१६),पैगंबर-ए-मौसीक़ी : मोहम्मद रफ़ी (हिंदी लेखक – चौधरी ज़िया इमाम) बाॅयोग्राफी आॅफ मो. रफी (इंग्रजी लेखक – डेव्हिड कोर्टनी) मोहम्मद रफी: गाॅड्स ओन व्हाॅईस (इंग्रजी लेखक – धीरेंद्र जैन), मोहम्मद रफी : गोल्डन व्हाॅईस आॅफ सिल्वर स्क्रीन(इंग्रजी, लेखिका – सुजाता देव) , मोहम्मद रफी हमारे अब्बा – कुछ यादें (हिंदी लेखिका – यास्मीन खालीद रफी) या पुस्तकांमुळेही चाहत्यांच्या मनात कायमचे घर करुन रफी राहिले आहेत. पुण्यात रफीच्या नावाची मोहम्मद रफी आर्ट्‌ फाऊंडेशन नावाची संस्था आहे. ती दरवर्षी अंदाज-ए-रफी नावाचा कार्यक्रम करते आणि एखाद्या गायकाला पुरस्कार देते. आमदार आशीष शेलार हे आपल्या स्पंदन या संस्थेमार्फत मोहम्मद रफी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एका गायकाला दरवर्षी जीवनगौरव पुरस्कार देतात. रफी यांच्यासोबत काम केलेल्या अनेक मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, शाल श्रीफळ, स्मृतीचिन्ह असे आहे. मोहमद रफी यांच्या मृत्यूच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त ३१ जुलै २०१० रोजी मुंबई येथे मोहम्मद रफी अकादमीची सुरूवात झाली, हि अकादमी त्यांचा मुलगा शाहिद रफी यांनी भारतीय शास्त्रीय आणि समकालीन संगीत प्रशिक्षण देण्यासाठी सुरु केली. त्यांच्या निधनानंतर अल्लाह राख, मर्द, कुली, देश-प्रेमी, नसीब, आस-पास आणि हीरालाल-पन्नालाल यांच्यासह असंख्य हिंदी चित्रपट रफीला समर्पित करण्यात आले. अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित केलेले आणि ‘गायक मोहम्मद अजीज’ यांनी गायिलेले १९९० मधील हिंदी चित्रपटातील गाणे रफीच्या स्मृतीस समर्पित केले होते.
‘ना फनकार ऐसा तेरेबाद आया
‘मुहम्मद रफी तू बहोत याद आया’
– गंगाधर ढवळे, नांदेड
मो. ९८९०२४७९५३.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *