नांदेड – आईचे पत्र हरवले, आम्हाला नाही सापडले! हा एक बालपणीच्या काळातील खेळ एक आनंददायी मानला जातो आणि आजही खेळल्या जातो. पण यात नकारात्मक शब्दांची भलावण करण्यात आल्याचे दिसते. यात सकारात्मक व आशयपूर्ण शब्दांची जुळवणी करीत आईचे पत्र हरवले ऐवजी आईने लिहिलेले पत्र मुलींना सापडले हा आनंददायी आणि भावनाप्रधान उपक्रम जवळ्याच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत राबविण्यात आला. यानिमित्ताने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या येणाऱ्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून शाळेचे मुख्याध्यापक ढवळे जी. एस. आणि सहशिक्षक संतोष घटकार यांच्या कल्पकतेतून शिक्षण घेऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याबाबत भावनिक साद घालणारी पोस्टकार्डे पोस्टाद्वारे पाठवून शाळेत शिकणाऱ्या आपल्या मुलींना आश्वस्त केले आहे.
देशभरात मुलगी वाचवा, मुलगी शिकवा अभियान सुरू आहे. मुलगी शिकली प्रगती झाली हे घोषवाक्य सर्वत्र दुमदुमत आहे. परंतु ग्रामीण भागातील ८६% मुलींचे शिक्षण अर्धवट राहते. त्यापैकी बहुतांश मुलींचे प्राथमिक शिक्षण संपल्याबरोबर बालवयातच विवाह उरकले जातात. बोटांवर मोजण्याइतक्याच मुली उच्च शिक्षण घेतात. त्यामुळे पालकांचे प्रबोधन मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. याचाच एक भाग म्हणून जवळा येथे मुलींना आईने पत्र लिहावे, त्यातून एक मोलाचा संदेश द्यावा, ते मुलींनी वाचून महत्वाचा दस्ताऐवज म्हणून कायम सांभाळावा आणि तो पिढीदरपिढी हस्तांतरित करावा या उपक्रमामागे उद्देश होता. त्याला माता पालकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पत्रलेखनास प्रारंभ करण्यात आला.
कोरोनामुळे अजूनही प्राथमिक शाळा बंद आहेत. काही ठिकाणी उच्च प्राथमिक वर्गातील मुले मुली शाळेत येण्यास धजावत नाहीत. कोरोनाचे संकट असले तरी माणसाची सर्वच क्षेत्रात पराकाष्ठेची झुंज सुरू आहे. अशातच ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणावर गंडांतर येऊ नये यासाठी मोबाईलच्या जमान्यात अनौपचारिक पत्रलेखनास फारसे महत्त्व उरले नसले तरी ‘आईचे पत्र सापडले’ हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. यात मीनाताई गोडबोले, आशाताई झिंझाडे, प्रतिभा गोडबोले, रेणुका टिमके, मनिषा गच्चे, जयश्री कदम, रेखा शिखरे, मायावती गच्चे यांच्यासह अनेक माता पालकांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., सहशिक्षक संतोष घटकार, मारोती चक्रधर, हैदर शेख, इंदिरा पांचाळ, श्रावस्ती गच्चे, गंगासागर शिखरे, अंजली कदम, साक्षी गच्चे, संघमित्रा गच्चे, नंदिनी टिमके, विद्या गोडबोले, अंजली झिंझाडे, प्रतिक्षा गोडबोले आदींनी परिश्रम घेतले.
आईने काय लिहिले आहे पत्रात?
प्रिय, लाडके शुभ आशिर्वाद. तू आता तुझ्या वर्गात शिकत आहेस. तुझा अभ्यास तर चांगलाच सुरु असेल, आहे.
आम्हाला आमच्या घर कामांमुळे तसेच मोल मजुरींसाठी शेतावर जावे लागत असल्याने तुझ्या अभ्यासाकडे लक्ष देता येत नाही.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची सतत आठवण ठेवून तुला खूप खूप शिकायचे आहे. तू खूप शिक आणि मोठी हो.
तुझ्या प्रगतीतच आम्हाला खरे समाधान आहे. तुच आमचा सन्मान आणि अभिमान आहेस.
तुझा आईची तुला सतत साथ असेल आणि प्रेमळ शुभेच्छाही.
Leave a Reply