कराड : दारुच्या वादातून तरुणाची साताऱ्यात हत्या केल्या प्रकरणी पुण्यातून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. धारदार हत्याराने वार केल्यानंतर तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी अवघ्या पाच तासातच दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. दारु पिण्याच्या वादातून हत्या सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात शनिवारी सकाळी चौंडेश्वरी नगर गोवारे या ठिकाणी मळी नावाच्या शिवारात ही घटना उघडकीस आली होती. या घटनेची दखल घेऊन सातारा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 5 तासात या गुन्ह्यातील आरोपींना शोधून काढले. दारु पिण्याच्या वादातून तरुणाची हत्या झाल्याचा आरोप आहे.
शनिवारी कराड येथील खुनाची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी त्यांच्या सहकाऱ्यासह घटनास्थळी भेट दिली. गोपनीय माहितीच्या आधारे माहिती घेतली असता दारु पिण्याच्या कारणातून हा खून झाला असल्याची माहिती समोर आली.
पाच तासात आरोपी पुण्यात जेरबंद
त्यानुसार अवघ्या पाच तासात या गुन्ह्यातील 23 वर्षीय आरोपी आकाश अनिल गवळी आणि 25 वर्षीय अक्षय अनिल गवळी (दोघे रा. चौंडेश्वरी नगर, कराड) या दोन्ही आरोपींना पुण्याहून अटक केली. कराड शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंदियात मजुरांची हत्या
दरम्यान, निर्माणाधीन इमारतीत दोन मजुरांची निर्घृण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार दोनच दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. गोंदिया शहरातील सिंधी कॉलनी भागात ही घटना घडली. मजूर झोपेत असतानाच त्यांचा जीव घेण्यात आला. हत्येनंतर त्यांच्यासोबत राहणारा मजूर पसार झाला.
झोपेत हत्या, आरोपी पसार
दोन्ही मजूर हे मूळ उतर प्रदेशमधील होते. अमन आणि निरंजन अशी मयत मजुरांची नावं आहेत. तर आरोपी बलवान दोघांची हत्या करुन पसार झाला. गुरुवारी रात्री या नवनिर्मित इमारतीत चार मजूर झोपले होते. यापैकी दोघांची झोपेतच निर्घृण हत्या करण्यात आली. एक मजूर घटनास्थळावरुन पसार झालेला आहे, तर दुसऱ्या मजुराने याची माहिती परिसरातील नागरिकांना दिली.
Leave a Reply