जालना ( प्रतिनिधी) : महिलांनी घरगुती स्वरूपात तयार केलेल्या वस्तूंना ग्राहक मिळण्यासाठी उत्पादक ते ग्राहक यांचा थेट समन्वय गरजेचा असून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी खरेदी मेळाव्या सारखे उपक्रम आधार देणारे आहेत. असे प्रतिपादन नगराध्यक्षा सौ .संगीताताई गोरंट्याल यांनी येथे बोलताना केले. रक्षाबंधनाचा पार्श्वभूमीवर उडान ग्रुप तर्फे गुरूवारी ( ता. १९) गुरू गणेश भवन येथे आयोजित खरेदी मेळाव्यास जालनेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोदवला. या मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी सौ. संगीताताई गोरंट्याल बोलत होत्या. या वेळी उडान ग्रुप च्या किर्ती अग्रवाल, रेणू अग्रवाल, सुजाता मुथा, अलका औंधीया, संगीता यशवंते, स्नेहल लुणावत, नसीम शेख, सुधा अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या मेळाव्यास जालना शहरासह जिल्हाभरातील महिला व नागरिकांनी भेट देऊन खरेदी केली तसेच स्वादिष्ट पदार्थांचा आनंद लुटला. जालना व औरंगाबाद येथील महिलांनी घरगुती स्वरूपात उत्पादित केलेल्या राख्या, कपडे ,साडी , महिलांसाठी दागिने ,सौंदर्यप्रसाधने, कोल्हापुरी चप्पल, कुरडई, पापड,वनस्पती रोपे,रोबोटिक क्लासेस, मसाले, सणांसाठी लागणारे सजावट साहित्य, पूजेची आकर्षक थाळी, चटई, बेडशीट, देवांचे वस्त्र, अशा विविध वस्तूंची चोपन्न दालने थाटली . दिवसभर खरेदी साठी वर्दळ सुरू होती. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी उडान ग्रुप च्या पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.
महिलांच्या उन्नती साठी प्रयत्न : किर्ती अग्रवाल
दीड वर्षापुर्वी स्थापन झालेल्या उडान ग्रुप ने सोशल मीडिया च्या माध्यमातून
महिलांकडून घरगुती स्वरूपात उत्पादित वस्तूंना ग्राहक मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळत असून अशा महिलांना दोन पैसे मिळून हातभार लागावा या उद्देशाने उत्पादक ते ग्राहक असा समन्वय साधण्यासाठी नियमांचे पालन करत उडान तर्फे प्रथमच आयोजित मेळाव्यास जालनेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .या पुढे ही महिलांच्या उत्पादकांना ग्राहक मिळण्यासाठी उडान ग्रुप प्रयत्नशील राहील. अशी माहिती किर्ती अग्रवाल यांनी दिली.
Leave a Reply