जालना (प्रतिनिधी) ः आर्थीक बाबींचा कोणताही विचार न करता जालना नगर पालिकेचे महापालिकेत रूपांतर करण्याचा घाट काही मंडळींनी घातला आहे. महापालिका होण्यास आपला विरोध राहणार असून तशाप्रकारचा काही प्रस्ताव नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आलाच तर सदर प्रस्ताव फेटाळून लावण्यात येईल असे भाजपाचे गटनेेते अशोक पांगारकर यांनी सांगीतले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पांगारकर यांनी म्हटले आहे की, जालना नगर पालिका ही राज्यातील दुसर्या क्रमांकाची अ वर्ग असलेली नगर परिषद आहे. सद्यस्थितीत जालना नगर पालिके अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचार्यांचे वेतन राज्य शासनाच्या सहाय्यक अनुदानातून अदा करण्यात येते.
नगर पालिकेचे रूपांतर महापालिकेत केल्यास या सर्व कर्मचार्यांचे वेतन महापालिकेला स्वतः करावे लागणार आहे. इतका पैसा कसा उपलब्ध होईल असा सवाल उपस्थित करून राज्यशासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून दिला जाणारा निधी देखील पालिका अस्तित्वात आल्यानंतर बंद होईल. महत्वाचे म्हणजे परभणी, लातूर आणि अकोला या महापालिका अस्तित्वात येवून आता दहा वर्षाचा कालावधी उलटला असून या दहा वर्षात या तीन्ही शहरातील विकासाची काय अवस्था आहे याबाबत महापालिकेसाठी पुढाकार घेणार्या मंडळींनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. शहराची हद्दवाढ आणि लोकसंख्या वाढवून महापालिका करण्यासाठी सुरू असलेल्या खटाटोपाला काहीही अर्थ नाही असे स्पष्ट करून गटनेते पांगारकर म्हणाले की, महापालिका अस्तित्वात आली तर शहरातील जनतेला वाढीव कराचा भुर्दंड सहन करावा लागेल. जालना शहरातील जनता वाढीव कर भरण्या इतकी आर्थीक दृष्ट्या सक्षम नाही. महापालिकेच्या संदर्भात राजकीय वर्तुळात वेगवेगळे मत मतांतर असले तरी जालना नगर पालिका ही नगर पालिकाच राहिली पाहिजे असे आपले वैयक्तीक मत असून केवळ राजकारणासाठी विरोध करणे योग्य नाही. विकासाच्या मुद्यावर आम्ही एकत्र आहोत. केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपाचे जेष्ठ नेते श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी राज्यात फडणवीस सरकार असतांना 70 ते 80 कोटी रूपयांचा निधी जालना नगर पालिकेला मिळवून दिला. श्री दानवे पाटील यांनी विकास कामांमध्ये राजकारण आडवे येवू दिले नाही. याशिवाय शहरातील अंतर्गत सिमेंट रस्ते, अंतर्गत जलवाहिनी, कुंडलिका नदीवरील पुल इत्यादी कामांसाठी कोट्यावधी रूपयांचा निधी मंजुर करून आणला. आ. कैलास गोरंट्याल आणि नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांच्या नेतृत्वात जालना नगर पालिकेने गेल्या चार वर्षात विकासाची भरीव कामे केली आहे. नागरीकांना आवश्यक असणार्या पाणी, रस्ते, लाईट, स्वच्छता इत्यादी नागरी सुविधा पालिकेतर्फे देण्यात आल्या आहे. नागरीकांना नागरी सुविधांशिवाय काहीच अपेक्षीत नाही. जालना नगर पालिका या सुविधा उपलब्ध करून देण्यात सक्षम असून असे असतांना नगर पालिकेचे महापालिकेत रूपांतर करण्याचा घाट कशासाठी घातला जात आहे? असा सवाल भाजप गटनेते अशोक पांगारकर यांनी उपस्थित केला आहे.
Leave a Reply