उरण ( संगिता पवार) उरण : जेएनपीटी बंदर परिसरात असलेल्या एका रासायनिक प्रकल्पात ऑईल गळती लागली आहे.पाच दिवसांपूर्वी लागलेल्या गळतीतून एडिबल ऑईल थेट नाल्यावाटे समुद्रात पोहचत असल्याने परिसरात जल प्रदुषणाची समस्या निर्माण झाली आहे.
जेएनपीटी परिसरात अनेक रासायनिक प्रकल्प आहेत.अशा विविध रासायनिक प्रकल्पात तीन हजार पासून १० हजार किलो लिटर्स क्षमतेच्या तेल साठवणूकीच्या टाक्या आहेत.या प्रचंड क्षमता असलेल्या टाक्यांमध्ये अत्यंत ज्वालाग्राही असलेला नाफ्ता,क्रूड ऑइल, एडिबियल ऑईल आदी ज्वलनशील रासायनिक पदार्थाची साठवणूक केली जाते. मागील पाच सहा दिवसांपासून जेएनपीटी परिसरातील एका रासायनिक कंपनीत एडिबल ऑईलची गळती लागली आहे.गळती लागलेले एडिबल ऑईल थेट नाल्यावाटे समुद्रात पोहचत असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.या प्रत्यक्षदर्शींकडून नाल्यावाटे वाहत जाणारे एडिबल ऑईल कामगारांमार्फत ड्रममध्ये भरुन काढले जात असल्याचेही पाहाण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.नाल्यातुन वाहत ऑईल थेट समुद्रात मिसळत आहे.त्यामुळे जल प्रदुषणाची समस्या निर्माण झाली आहे.तसेच या जलप्रदूषणामुळे स्थानिक मासेमारीही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मात्र या जलप्रदूषणाच्या समस्येकडे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून नेहमीच जाणीव पूर्वक दुर्लक्षच करत असल्याचा आरोप केला जात आहे.मात्र कोणत्या कंपनीतुन एडिबल ऑईलची गळती सुरू आहे याबाबत सर्वच शासकीय यंत्रणा अद्यापही अंधारातच असल्याचे सध्याचे चित्र आहे. न्हावा-शेवा बंदर विभागाचे वपोनि मधुकर भटे यांनी याबाबत पोलिसात कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले.तसेच याबाबत काहीही माहितीही उपलब्ध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.तर जेएनपीटी परिसरातील रासायनिक कंपन्यांच्या बाहेर वाहतूकीसाठी आलेले शेकडो ऑईल टॅंकर उभे असतात.फावल्या वेळात ऑईल टॅंकर नाल्याच्या आसपास पाण्याने धुवून टाकतात.ऑईल टॅंकर धुतलेले रासायनिक मिश्रित दुषीत पाणी नाल्यात मिसळते.नाल्यात मिसळलेले रासायनिक मिश्रित दुषीत सांडपाणी थेट नाल्यावाटे समुद्रात मिसळते.यामुळे जलप्रदूषणाची समस्या निर्माण होते.
मात्र यासाठी ऑईल टॅंकर चालकांऐवजी येथील रासायनिक कंपन्यांना दोषी ठरवले जात असल्याचे येथील एका रासायनिक कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
Leave a Reply