नांदेड – येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आज २४ जुलै रोजी भव्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून व्याख्यान व विधानचर्चा हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक माधवराव पाटील मातुळकर हे राहणार असून जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगांवकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला यशस्वी उद्योजक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य उद्योगरत्न मारोतराव कवळे गुरुजी, भोकर पंचायत समितीच्या सभापती निताताई रावलोड, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव देवसरकर, मातुळचे उपसरपंच माधव बोईनवाड, स्वागताध्यक्ष सरपंच सविता कदम यांची उपस्थिती राहणार आहे.
आषाढ पौर्णिमेचे औचित्य साधून सप्तरंगी साहित्य मंडळाच्या ४३ व्या काव्य पौर्णिमेचे आयोजन भोकर तालुक्यातील मातुळ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी अकरा वाजता करण्यात आले आहे. दुसऱ्या सत्रात स्तंभलेखक व कवी नागोराव येवतीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कविसंमेलनात अनुरत्न वाघमारे, पांडुरंग कोकुलवार, नागोराव डोंगरे, गंगाधर ढवळे, प्रशांत गवळे, मारोती कदम, शंकर गच्चे, चंद्रकांत कदम, निवृत्ती लोणे, दत्ताहरी कदम, गोविंद बामणे यांच्यासह अनेक नवोदित कवी कवयित्री सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात आपल्या व्याख्यानातून व कवितेतून आपल्या गुरुचरणी काव्यपुष्पांजली वाहण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला परिसरातील सर्व कवी कवयित्रींनी हजेरी लावावी असे आवाहन ग्रामपंचायत कार्यालय आणि समस्त गावकरी मंडळी मातुळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply