जालना :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात साजरा करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचा नियोजनबद्ध आराखडा तयार करुन प्रत्येक विभागाने एकमेकांमध्ये समन्वय साधत कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणुन साजरे करण्यात येत असुन 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक विभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सुचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. प्रत्येक विभागाने त्यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची जनजागृती करण्याबरोबरच लाभार्थ्यांना या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळेल यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सुचना करत अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना शासनाकडून प्राप्त झालेल्या सुचना व्यतिरिक्त कल्पकतेने अधिकाधिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. प्रत्येक विभागाने झालेल्या कार्यक्रमांचा डाटा संकलित करण्याचे निर्देशही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभांचे आयोजन स्वामित्व योजनेंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वाटप, शेतकऱ्यांना उद्योग उभारणीसाठीचे नियोजन, पंचायत स्वच्छता पंधरवडा, तुषार सिंचन उपयोगितेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती, सरपंच परिषद, कुटूंब कल्याणकारी योजनांचा प्रचार, प्रसार, स्वातंत्र्य सैनिकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, शोषखड्डे, गांडुळनिर्मिती प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल माहितीसाठी संवादसत्रे, जल व मृदा संवर्धनासाठी जलसंधारणाची कामे हाती घेणे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसंदर्भात कार्यशाळा, रोजगार मेळावे, फार्मर प्रोडयुसर कंपन्यांच्या क्षमतावृद्धीसाठी कार्यशाळा, सुशासन सप्ताहाचे आयोजन, ग्रामपंचायत, पंचायत समिती स्तरावच्या यशोगाथांना प्रसिद्धी, मॅरेथॉन आयोजन, जिल्हा, गट, शालेय स्तरावर प्रश्नमंजुषा, गायन, चित्रकला, निबंध स्पर्धा, बचतगटांसाठी मेळावे, राष्ट्रीय गुणवत्ता निरीक्षक कार्यक्रमांतर्गत रस्ते, पुल गुणवत्ता निरीक्षण करणे, अन्न, पोषकता, आरोग्य व स्वच्छता विषयावर संवादसत्राचे आयोजन, महिला व बालकल्याण अंतर्गत विविध विषयांवर वेबिनार, मेरा गाव, मेरी धरोहर, वृक्ष लागवड, रोजगार निर्मिती कार्यक्रम, रक्तदान शिबीर, सामाजिक योजनाबद्दल प्रबोधनावर भर, मेक ईन इंडिया, आत्मनिर्भर भारत योजनांवर भर देणे यासह ईतर कार्यक्रम राबविण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी दिल्या.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती भोसले यांनी या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विभागाने करावयाच्या कार्यवाहीची माहिती पॉवर पॉईंटच्या माध्यमातुन दिली. बैठकीस सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply