जालना (प्रतिनिधी) ः वडील रिक्षा चालक आणि घरची आर्थीक परिस्थिती बेताची असतांना या सर्व परिस्थितीवर मात करत येथील स्व. भुदेवी किशनराव गोरंट्याल क्रिडा प्रबोधिनीतील कु. किरण राऊत या विद्यार्थीनीने जिद्द व परिश्रमाच्या जोरावर विज वितरण कंपनीतर्फे विद्युत सहाय्यक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
अंबड चौफुली जवळील योगेशनगर मधील रहिवाशी असलेल्या कु. किरण राऊत या विद्यार्थीनीचे वडील रिक्षा चालक असून दिवसभर रिक्षा चालवून ते आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. घरची आर्थीक परिस्थिती जेमतेम असली तरी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असलेल्या कु. किरण राऊतने आ. कैलास गोरंट्याल व नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांच्या भक्कम पाठबळामुळे सुरू असलेल्या स्व. भुदेवी किसनराव गोरंट्याल प्रबोधिनीतर्फे चालविण्यात येत असलेल्या मोफत स्पर्धा परिक्षा उपक्रमात सहभागी होत स्पर्धा परिक्षेची जय्यत तयारी केली होती. या स्पर्धापरीक्षा उपक्रमातून पाठबळ मिळालेल्या कु. किरण राऊतने विज वितरण कंपनीतर्फे विद्युत सहाय्यक पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेला सामोरे जात घवघवीत यश मिळवून प्रबोधिनीचे नाव उंचावले आहे. जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवलेल्या कु. किरण राऊतने आपल्या या यशाचे श्रेय आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांना दिले असून स्व. भुदेवी किशनराव गोरंट्याल क्रीडा प्रबोधिनीच्या संचालिका सौ. आरती दाभाडे आणि गणेश दाभाडे यांचे विशेष आभार मानले आहे. या क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून वर्षभरात 100 पेक्षा अधिक विद्यार्थींनी स्पर्धा परिक्षेला सामोरे जात सरकारी नौकरी मिळवतील असा विश्वास संचालिका सौ. आरती दाभाडे आणि गणेश दाभाडे यांनी व्यक्त केला.
Leave a Reply