नांदेड – नव्या शैक्षणिक सत्रास प्रारंभ झाल्यानंतर जिल्ह्यात शाळा तपासणी पथकाच्या माध्यमातून शाळा शुभारंभ भेटीला (ता. १५) सुरुवात झाली आहे. गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, प्रभारी केंद्रप्रमुख, विषय तज्ज्ञ, विशेष तज्ज्ञ, विशेष शिक्षक – शिक्षिका यांच्या पथकाची स्थापना करून विभागनिहाय नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शिक्षणविस्तार अधिकारी आंबलवाड एस.एम., आणि केंद्रप्रमुख आमीन पठाण यांच्या पथकाने जवळा देशमुख येथे भेट देऊन शाळा तपासणी केली. कोरोनामुळे शाळा बंद असतांना शिक्षण थांबू नये म्हणून आॅनलाईन शिक्षण व गृहभेटी याबाबत कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, सदस्य मारोती चक्रधर, आनंद गोडबोले यांची उपस्थिती होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर १५ जून पासून जिल्ह्यात विद्यार्थ्यांविना शैक्षणिक सत्रास प्रारंभ झाला आहे. त्यात शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शाळेत उपस्थित राहून शाळाप्रवेश, आॅनलाईन शिक्षण, गृहभेटी, वृक्षारोपण, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, शालेय स्वच्छता, कोरोनाबाबत त्रिसूत्रीचा वापर, शाळा निर्जंतुकीकरण, गणवेश वाटप, जुन्या पाठ्यपुस्तकांचे संकलन व वाटप याबाबतची कामे करावयाची आहेत. या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय पथकाने जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सर्व बाबींची तपासणी केली. त्यानंतर आॅनलाईन शिक्षण व गृहभेटींतून शिक्षण कसे चालू ठेवावे याबाबत कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले. जवळा देशमुख परिसरातील बोरगाव, जवळा पु., बेटसांगवी, कपिलेश्वर सांगवी, शेवडी बाजीराव, अंतेश्वर आदी गावांतील शाळांना भेटी देऊन तपासणी करण्यात आली. दरम्यान, उर्वरित गावांसाठी पथकाचा दौरा दि. १८ रोजी संपणार असला तरी आॅनलाईन पद्धतीने व गृहभेटींच्या माध्यमातून शिक्षण सुरू राहणार असल्याचे शिक्षण विभागाने कळविले आहे.
Leave a Reply