कही पर चीन लिखा है, कही पर जापान लिखा है
मगर मैने मेरे इस दिल पर हिंदुस्तान लिखा है…!
ऑनलाइन त्रैभाषिक गझल मुशायरा संपन्न
जालना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद जालना शाखा तसेच, जेईएस महाविद्यालयाचा मराठी विभाग जालना यांच्या संयुक्त विद्यमाने त्रैभाषिक गझल मुशायराचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. या मुशायरामध्ये महाराष्ट्रातील नामांकित गझलकार सहभागी झाले होते. गझल मुशायराचा प्रारंभ कोल्हापूर येथील मराठी गझलकरा डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी अत्यंत आशयगर्भ रचनेने केला.
डरकाळीने एका जागी मी थिजुन गेले नाही
तो असला वाघ तरी मी शेळी झाले नाही
या रचनेतून त्यांनी प्रखरपणे स्त्रीशक्तीचा जागर केला.
मालेगाव येथील उर्दू हिंदी गझलकार मकसूद अश्रफ यांनी
कही पर चीन लिखा है कही जापान लिखा है
मगर मैने मेरे इस दिल पर हिंदुस्तान लिखा है
सब अपने देश की तारिफ में लिखते रहे क्या क्या
मैने तिरंगे को अजिमो शान लिखा है
असे म्हणत देशभक्तीपर रचना सादर केली. तर पुढील एका रचनेमध्ये त्यांनी
दरिया खिलाफ आहे ना समुंदर मेरे खिलाफ
खतरे हि सर उठाते है अक्सर मेरे खिलाफ
असे म्हणत मानवी मनातील समाजाविषयीचे द्वंद्व व्यक्त केले.
शेख एजाज यांनी दोन हिंदी गझला सादर केल्या.
फार नाजूक माझी त्वचा वाटते
घाव माझा शिवाया सुई लाजते आणि
हट्ट पूरवू कसा राधिके मी तुझा
ठेवले ओठ की बासरी लाजते
ही मराठी गझल तरन्नूममध्ये सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. जालना येथील उर्दू गझलकार लियाकत अली खान यासिर जालनवी यांनी सामाजिक वास्तवावर बोट ठेवत परखडपणे भाष्य केले.
गैर मुमकिन है कोई गैर आकर
मेरी कस्ति को डुबोने कोई मेरा अपना होना
वो तो बाजार मे आया है लुटाने के लिए
कैसे मुमकिन है अब इमान का सौदा होना
परभणी येथील मराठी गझलकार आत्माराम जाधव यांनीही अत्यंत सुंदर गझला सादर करून रसिकांची दाद मिळविली. वर्तमान वास्तवाचा वेध घेताना ते म्हणतात की,
बघा माणसाच्या मदतीला माणूस धावून आला
दुनियेने तर आभाळाला हात जोडले होते
माझ्या एकांताने सारी दुनिया माझी केली
पस्तावत बसले ते ज्यांनी मला सोडले होते
या गझल मुशायराचे अध्यक्ष अकोला येथील नामांकित मराठी गझलकार, गीतकार, संवादलेखक डॉ. श्रीकृष्ण राऊत यांनी आपल्या गझल सादरीकरणातून मुशायराला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली.
सोडेन बायकोला जर ऐकणार नाही
पण देश सोडण्याचा माझा विचार नाही
याहून वेगळी का असणार देशसेवा
फाईल मी कोणतीही दाबणार नाही
ही देश प्रेमाची भरती आणणारी रचना रसिकांच्या टाळ्या मिळवून गेली. याप्रमाणेच एकापेक्षा एक आशयपूर्ण रचना त्यांनी सादर केल्या. या गजल मुशायराचे बहारदार सूत्रसंचालन जालना येथील प्रसिद्ध गझलकार डॉ. राज रणधीर यांनी केले. यादरम्याने त्यांनीही आपल्या काही गझला सादर केल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव जिगे, जे.ई.एस. महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. जवाहर काबरा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. बजाज , डॉ. यशवंत सोनुने, डॉ. एकनाथ शिंदे, डॉ. वसंत उगले उपस्थित होते. तर ऑनलाइन गझल मुशायराचा डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, संशोधन परिषदेचे सचिव डॉ. पंडित रानमाळ, डॉ. गोवर्धन मुळक, सत्यशीला तौर, डॉ. अपर्णा जिगे पाटील, डॉ. शिवाजी हुसे, अनिता पवार, साईनाथ चिन्ंनादोरे, यांच्यासह शेकडो साहित्य रसिकांनी युट्यूब वाहिनी आणि फेसबूक पानांवरुन आस्वाद घेतला. यासाठी श्रीनिवास सैंदर यांनी तांत्रिक बाजू सांभाळत या मुशायराचे विविध फेसबुक पान आणि यूट्यूब वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपण केले.
Leave a Reply