आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये सण, उत्सव व व्रतांचे विशेष महत्व आहे. प्रत्येक सण, उत्सव व व्रतांमध्ये विविध वनस्पती व त्यांच्या पूजनाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. जसे तुळस, बेल, पिंपळ, औदुंबर, वड ही वृक्षे पूजनीय मानून त्यांचे संवर्धन केले जाते असेच वटवृक्षाचे संवर्धन व पूजन करणारे एक व्रत म्हणजे “वटपौर्णिमा व्रत” होय.
वादविवादात यमाला हरवून हरण केलेले पतीचे प्राण परत मिळवणार्या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते. सावित्री आणि यमाचे वटवृक्षाखाली संभाषण झाल्यामुळे या दिवशी वटवृक्षाला महत्त्व प्राप्त झाले. वटवृक्षाचे अजून महत्व सांगायचे तर वटवृक्ष हा स्थिरतेचे प्रतीक आहे.
प्रलय झाला तरी वटवृक्ष असतोच. तो युगान्ताचा साथीदार आहे. बाल मुकुंदाने प्रलयकाळी वटपत्रावर शयन केले. प्रयागच्या अक्षय्य वटाखाली राम, लक्ष्मण आणि सीता विसावले होते. ब्रह्मा, श्रीविष्णु, महेश, नृसिंह, नील आणि माधव यांचे वटवृक्ष हे निवासस्थान आहे. अध्यात्मात वड, पिंपळ, औदुंबर आणि शमी हे पवित्र अन् यज्ञवृक्ष म्हणून सांगितले आहेत. या वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य अधिक असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही पुष्कळ होतो. वटसावित्रीची पूजा म्हणजे `सावित्रीच्या पातिव्रतेच्या सामर्थ्याची पूजा’; म्हणून या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते. वटवृक्ष हा अक्षय अशा प्राणाचे दर्शक आहे. या माध्यमातून त्या वृक्षाच्या गुणधर्माचा लाभही आम्हाला होतो. वृक्ष पूजनीय असल्यामुळे त्या वृक्षाला तोडले जात नाही तर त्याला जल देऊन त्याचे संवर्धन करायला शिकविणारी अशी आमची महान संस्कृती होय. या प्रत्येक कृती मागील विज्ञान समजून घेऊन या संस्कृतीचे संवर्धन करू या व पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचवू या.
डॉ०. पी. एस. महाजन
संभाजीनगर
Leave a Reply