ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वेदना घुंगरांच्या

January 23, 202213:57 PM 89 0 0

सध्या देश कोरोनाच्या तिस-या लाटेचा सामना करीत असुन कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गर्दीच्या ठिकाणी जमू नये,गर्दी टाळा अशा शासनाच्या सुचना असल्याने अनेक ठिकाणच्या यात्रा रद्द होत आहेत. ज्या गावात तमाशाचे कार्यक्रम होते त्या गावातील यात्रा रद्द झाल्याने व राज्य शासनाने रात्रीची संचारबंदी घोषित केल्याने तमाशाचे कार्यक्रम सुद्धा होऊ शकणार नाहीत. जर ग्रामदैवतांच्या यात्रा, जत्रा सुरू झाल्या नाहीत तर लोकनाट्य तमाशा फडमालक व कलाकार यांच्यावर अधिकच उपासमारीची वेळ येणार आहे. राज्यात सध्या सर्वांना मुभा आहे मग तमाशा कलावंतांवर अन्याय का? निवडणुका, प्रचार, जल्लोष चालतो मग तमाशा का चालत नाही? अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेने असे प्रश्न उपस्थित केले आहेत. समाजाचे प्रबोधन व मनोरंजन करणारी तमाशा ही कला महाराष्ट्राची लोककला म्हणून ओळखली जाते. वर्षातील आठ महिने गावोगावी फिरून ही कला सादर केली जाते. दस-यापासून तमाशाचा वर्षाचा हंगाम सुरू होत असतो. गुढीपाडव्यापर्यंत गावोगावी तंबूत तिकिटे लावून तमाशाचे खेळ होतात. मार्च, एप्रिल, मे या कालावधीत महाराष्ट्रभर गावोगावी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. पाडव्यानंतर गावोगावच्या जत्रांमध्ये तमाशा होतो. स्थानिक संयोजकांच्यावतीने गावातील यात्रेकरूंसाठी मनोरंजन व्हावे यादृष्टीने तमाशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. यासाठीच्या सुपारीही लाखोंच्या घरात देण्यात येतात. त्यामुळे या तीन-चार महिन्यांत तमाशाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. सर्वाधिक यात्रा याच काळात असल्यामुळे यात्रांमध्ये आपली कला सादर करून पोट भरणा-या तमाशा कलाकारांना आणि फड मालकांना हा कालावधी मोठी पर्वणी समजली जाते. एका तमाशासाठी ५० हजारांपासून ते अडीच लाखांपर्यंत सुपा-या ठरवण्यात येत असतात. राज्यात असलेले तमाशाचे फड व सुपारीचे दर लक्षात घेता या क्षेत्रातही कोट्यवधीची उलाढाल होत असते.

पूर्वी दूरदर्शन वगळता एकही चॅनल नव्हता, मोबाईल तर नव्हतेच त्यामुळे गावातील वर्षातली तीन दिवस होणारी जत्रा हा अख्खा तालुक्याचा विषय असे.याञा आणि जञा व तमाशाचे फड हे अतुट नाते होते. त्यामुळे यात्रा काळात कोणत्या गावात, कोणाचा तमाशा याची माहिती गावकरी घेत. गावातली लोकं, जुणे जाणकार मंडळी शेतातली कामं आवरुन संध्याकाळी धावत-पळत घर गाठायची आणि कशीबशी भाजी- भाकरी पोटात कोंबुन जीकड ढोलकीचा आवाज येतोय त्या गावाकडं सायकली किंवा पायपीट करुन तमाशाचा फड गाठायची. लावणी आणि वग हे तमाशाचे दोन मुख्य अंग. गण, गवळणणे तमाशाला सुरुवात होत, लावणी, सिनेमाची गाणी, बतावणी आणि अखेर वग. दुसऱ्या दिवशी सकाळी देखील तमाशाचा काही भाग दाखवला जायचा आणि मग फड तिथून हलुन पुढच्या गावाला जायचा. तमाशाही मर्यादा सांभाळत होता, त्यात खालच्या दर्जाचे विनोद फारसे नसायचे. उलट सामाजिक संदेश देणारे वग म्हणजे नाटक होते. कालांतराने तमाशानेही काही बदल अंगीकृत केले आणि तमाशातील प्रेक्षकांची गोडी जणू हळू-हळू कमी होऊ लागली. त्यातच शासनाने रात्रभर चालणा-या तमाशावर बंदी आणली आणि तमाशाचा वेळ कमी केला. यानंतरच्या काळात विविध वृत्तवाहिन्याआल्या, इंटरनेट आला, मोबाईल आलाआणि तमाशाचा प्रेक्षक अगदी दूर-दूर जात राहिला. रात्रीच्या वेळमर्यादेमुळे तमाशाला आधीच घरघर लागली होती. त्यातून राज्यात ८२ छोटे-मोठे तमाशा फड आणि त्यावरील शेकडो कलाकार तग धरून होते. ही कला टिकवण्यासाठी फडमालक आणि कलाकार प्रयत्न करीत होते.

दोन वर्षींपूर्वी ऐन यात्रा-जत्रांच्या हंगामाच्या तोंडावर करोनाची पहिली लाट आली. फडमालकांनी सावकारांकडून कर्ज घेऊन कलाकारांना पहिला हप्ता दिला होता. मात्र, कमाई सुरू होण्यापूर्वीच संपूर्ण टाळेबंदी जाहीर झाली आणि फडमालक हवालदिल झाले. पहिल्या लाटेतील परिस्थिती सुधारल्यानंतर नाटक, चित्रपटगृहेही सुरू झाली. त्यामुळे तमाशालाही परवानगी देण्याच्या मागणीसाठी तमाशा परिषदेने आंदोलन केले. तमाशाला परवानगी देण्याचा निर्णय झाला असतानाच करोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा कठोर निर्बंध लागू झाले. कमाईच नसल्याने फडमालकांच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर व्याजाने वाढत गेला. सलग दुसरा हंगामही हातचा गेल्याने अक्षरश: अनेक तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती.

राज्यात तमाशाच्या निमित्ताने हजारो ग्रामीण कलाकार आपला उदरनिर्वाह करत असतात. किमान आठ ते दहा हजार कलाकार या कलाविश्वाशी जोडलेले आहेत. आता ऐन यात्रांच्या हंगामात कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्यामुळे याचा विपरीत परिणाम गावोगावच्या ग्रामीण कलाकारांवर होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये असणारे फडमालक तमाशे सुरू ठेवण्यासाठी कलाकारांना अगोदर पैसे देत असतात. त्यासाठी अनेक फडमालक सावकारांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेत असतात, तर काही फडमालक बँकेकडून कर्ज घेत असतात. सदरचा पैसा घेऊन हे कलाकार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू ठेवतात आणि तमाशाच्या कालावधीत काम करून सदरची रक्कम फेडत असतात. ही बाब लक्षात घेऊन फड मालकांनाही याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. फडमालक व कलाकार दोघांवर आज रडण्याची वेळ आहे. ही बाब लक्षात घेता शासनानेतमाशा कला जिवंत ठेवण्यासाठी या फड मालकांना आधार देण्याची गरज आहे. यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे, कलाकारांना सानुग्रह अनुदान देणे, फड मालकांना आर्थिक मदत करण्याची गरज असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केलेआहे.
– सुरेश मंत्री,अंबाजोगाई.
संपर्क – ९४०३६५०७२२

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *