जालना (प्रतिनिधी) ः मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदासाठी घेण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी एका आदेशान्वये रद्द ठरवली आहे. जालना जिल्ह्यात अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. याविषयी अधिक माहिती अशी की ग्रामपंचायत पांगरी गोसावी ता. मंठा जि. जालना येथील सार्वत्रिक निवडणूक जानेवारी 2021 मध्ये झाली होती. नवीन सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीसाठी दि. 10 फेब्रुवारी 2021 रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.
या प्रकरणातील अर्जदार राजेंद्र बाबूलाल पवार यांनी सदरच्या सभेमध्ये अध्यासी अधिकारी यांच्याकडे रीतसरपणे अर्ज सादर करून सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीसाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्याची विनंती केली होती. मात्र अध्यासी अधिकारी यांनी अर्जदार राजेंद्र पवार यांची गुप्त पद्धतीने मतदान घेण्याची मागणी फेटाळली. व सदरच्या सभेमध्ये सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीसाठी मतदान हे हात वर करून घेतले. त्यामुळे अर्जदार यांनी अॅड. विलास सतीशराव भुतेकर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्याकडे विवाद अर्ज दाखल करून ग्रामपंचायत पांगरी गोसावी ता.मंठा येथे दि. 10 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या विशेष सभेचे कामकाज रद्द करण्याची मागणी केली होती.
दरम्यानच्या काळात प्रकरणात वेळोवेळी सुनावणी घेण्यात आली. सुनावणी दरम्यान अॅड.विलास भुतेकर यांनी सक्षमपणे अर्जदार यांची बांजू मांडून विद्यमान न्यायालयाच्या ही बाब निर्दशनात आणून दिली की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 33(4) मधील तरतुदीनुसार सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये अध्यासी अधिकारी यांच्याकडे मतदानासाठी हजर असलेल्या सदस्यांपैकी कोणत्याही सदस्याने गुप्त पद्धतीने मतदान घ्यावे अशी मागणी केल्यास. सदरचे मतदान हे गुप्त पद्धतीनेचं घेतले पाहिजे अशी तरतूद आहे.
यावरून जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी ग्रामपंचायत पांगरी गोसावी ता. मंठा जि. जालना येथील दि. 10 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया रद्द करून सदरच्या सभेमध्ये आरती संतोष पवार यांची उपसरपंच पदी झालेली निवड रद्द केली. प्रकरणात अर्जदार यांच्या वतीने अॅड.विलास सतीशराव भुतेकर यांनी बाजू मांडली.
Leave a Reply