‘विद्या विना मती गेली,
मती विना गती गेली,
गती विना वित्त गेले,
वित्त विना शूद्र खचले,
एवढे अनर्थ एका अविद्येने केले’..
हा जगाला महान मूलमंत्र देणारा विविध बहुआयामी व्यक्तिमत्व असणारा क्रांती नायक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले होय. 11 एप्रिल 1827 हा त्यांचा जन्म दिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या जयंती दिनी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख लिहिण्याचा छोटासा प्रयत्न मी करीत आहे. महात्मा जोतीराव फुले हे एकोणिसाव्या शतकातील पहिले सामाजिक इतिहासकार, इतिहास संशोधक, उत्कृष्ट विश्लेषक, शैक्षणिक क्रांतीचे नायक, मानववंशशास्त्राचा पाया रचणारे संशोधक, स्त्री-उद्धारक, आद्य नाटककार, पहिले शिवशाहीर, धर्म चिकित्सक, मानवतावादी धर्म संस्थापक,आणि सत्यशोधक धर्माचे संस्थापक असे बहुआयामी त्यांचे महान व्यक्तिमत्व. महात्मा फुले यांच्या विषयी लिहिताना त्यांचे विविध पैलू आपल्यासमोर मांडताना त्यांचा प्रत्येक पैलू मौल्यवान आणि महत्त्वपूर्ण आहे. एकाजरी पैलूवर लिहायचं झाल तर कित्येक प्रबंध तयार होतील.असे त्यांचे महान कार्य आहे.
त्यांनी शिक्षणाला अतिशय महत्व दिले आहे.सर्व गोष्टींचे मुळ हे शिक्षणच आहे. त्यामुळे शिक्षणाशिवाय जीवन नाही.म्हणून शिक्षण विषयक विचार मांडताना महात्मा फुले म्हणतात, प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असावे. प्राथमिक शिक्षणावर स्थानिक कराच्या निम्मा निधी खर्च करावा. त्यांच्या मते अभ्यासक्रमामध्ये यांत्रिकी, नीतीबोध, आरोग्य, शेतकी उपयुक्त कला यांचा अंतर्भाव असावा. एवढेच नाहीतर शिक्षण व्यवस्था ही सरकारी यंत्रणेकडे असावी. ती खाजगी यंत्रणेकडे असणे इष्ट होणार नाही. कारण प्राथमिक व उच्च या दोन्ही पातळ्यांवर शिक्षणाचे संवर्धन होण्यासाठी आवश्यक असणारी आस्था आणि कृपादृष्टी ही केवळ सरकारच दाखवू शकते. असे त्यांचे मत होते. हंटर आयोगासमोर शिक्षण विषयक धोरण निर्भीडपणे मांडणारा हा पहिला शिक्षण महर्षी होय.
शेतकऱ्यांविषयी आपली भूमिका मांडताना म.फुले म्हणतात,शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवाव्यात. त्यांना यंत्रातंत्राचे ज्ञान द्यावे. शेतकऱ्यांना गैरशिस्त करण्यापासून परावृत्त करावे. तसेच युरोपीय शेतकऱ्यांप्रमाणे त्यांना विद्यादान मिळावे. सिंचन लोकल फंडाद्वारे शेतकऱ्यांचे शोषण, इंग्रजांचे औद्योगीकरण, कारागिरांचे शोषण, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा,कर्ज काढून सण करण्याची वृत्ती याविषयी शेतकऱ्यांची बाजू घेऊन महात्मा फुले खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिले. यावर ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा सुंदर ग्रंथ लिहून त्यांनी त्यामध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. आणि या अनमोल ग्रंथाची प्रत त्यांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांना पाठविली. यावरुन तेच शेतकऱ्यांचे उध्दारकही ठरतात.
महात्माफुले यांचे स्त्रीजीवना विषयीच्या हक्क आणि अधिकाराच्या लढ्यासाठी फार मोठे योगदान आहे. एकोणिसाव्या शतकात ज्योतिबा स्त्रीच्या मानवी हक्कांची मांडणी करणारा जगातील पहिला भारतीय क्रांतीमानव होय. ते स्त्रीवादी चळवळीचे उद्गागाते म्हणून संबोधले जातात. तेच स्त्रीपुरुष समानतेचे आधुनिक काळातील पहिले पुरस्कर्ते आहेत. महात्मा फुले स्त्री विषयीआपली भूमिका मांडताना ते म्हणतात की पुरुषांपेक्षा स्त्री श्रेष्ठ आहे. कारण ती जन्मदात्री आहे. पुढे ते म्हणतात, शिक्षण घेऊन स्त्री आदर्श माता, पत्नी, भगिनी, कन्या बनावी. स्त्रीला सन्मानाने जगता पाहिजे. यासाठी शिक्षणाला त्यांनी महत्त्व दिले. स्त्री शिक्षणाचे त्यांनी समर्थन केले. कारण शिक्षणामध्येच परीवर्तन घडवून आणण्याची ताकद आहे.
शिक्षणाचे महत्त्व सांगताना ते म्हणतात की, शिक्षण हे गुलामी नष्ट करण्याचे हत्यार आहे. स्त्री सबला बनेल आणि पुरुषांच्या बरोबरीने ती कार्य करेल. स्त्री ही एक मानव असे ते मानीत असत. यावरून महात्मा फुले यांची स्त्रीकडे पाहण्याची समतावादी दृष्टी प्रतिबिंबित होते. ते एवढ्यावरच थांबले नाहीतर त्यांनी स्वतःच्या पत्नीस म्हणजेच क्रांतीज्योती सावित्री शिकवून मुलींसाठी पहिली शाळा पुण्यात काढली. व सावित्रीबाई मुख्याध्यापक झाल्या. आणि स्त्री जीवनातील मानाच प्रथम स्थान त्यांना मिळाले. म.फुलेंनी शिक्षणाच्या मानवी हक्कावर मोहर उमटवली आणि स्त्री सबली करणाला प्रारंभ केला.
ते एक महान साहित्यिक होते.13 मे 1885 मध्ये मराठी ग्रंथोत्तेजक मंडळाच्या भरलेल्या संमेलनासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी म.फुलेंना आमंत्रित केले होते. 1855 ते 1889 या चौतीस वर्षांच्या काळात जोतीरावांनी सातत्याने लेखन केले. समाज प्रबोधन, समाज प्रबोधन, समाज परिवर्तन, विवेकवाद, विज्ञानवाद रुजविणे, समाजक्रांतीला प्रवण करणे हा त्यांच्या लेखनाचा उद्देश होता. खऱ्या अर्थाने ते राष्ट्रबांधणीच करत होते, असं म्हणायला हरकत नाही.
त्यांची ग्रंथसंपदा तृतीय रत्न हे नाटक, शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा, शेतकऱ्याचा आसुड, गुलामगिरी, इशारा, मराठी ग्रंथकार सभेस पत्र, सत्सार एक-दोन, हंटर शिक्षणआयोगापुढे निवेदन, अखंडादि काव्यरचना, सार्वजनिक सत्यधर्म आदी विविध विपुल साहित्य लेखन त्यांनी केले. यातूनच शासनाने त्यांचा तयार केले ला महत्त्वाचा ग्रंथ म्हणजेच ‘समग्र वाङमय’ हा होय. महात्मा फुलेंचे साहित्य म्हणजे ज्ञानाचा महासागर होय. त्याही काळात आणि आजही तंतोतंत मानवी जीवनात तितकाच लागू पडणारा आहे. म्हणून जो कोणी या ज्ञानाच्या महासागरामध्ये पोहून जाईल, त्यांच्या जीवनाच नक्कीच सोनं होईल. अशा या महान समाजसुधारकास विनम्र अभिवादन….!
– बाबुराव पाईकराव
डोंगरकडा ता. कळमनुरी
मो. 9665711514
Leave a Reply