जालना (प्रतिनिधी) ः जालना शहर व विधानसभा मतदार संघातील 45 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या सर्वांनी कोव्हीड लसीचा लाभ घेवून करोना विरुद्धच्या लढाईत शासन आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महराष्ट्र विधीमंडळ आश्वासन समितीचे प्रमुख आ. कैलास गोरंट्याल यांनी केले आहे. जालना शहर व विधासभा मतदार संघात कोव्हीड लसीचा झालेला तुटवडा लक्षात घेवून आ. गोरंट्याल यांनी आज जालना शहरातील मंठा रोडवर असलेल्या शाकुंतलनगर आणि जालना तालुक्यातील दरेगाव येथील लसीकरण केंद्राला अचानक भेट देवून लसीच्या साठ्या संदर्भात लसीकरण केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी दरेगाव येथे लसीकरण मोहिमेचा आ. गोरंट्याल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
दरेगावसह परिसरातील असलेल्या विविध गावांमधील 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण करुन घेण्याबाबत गावातील प्रतिष्ठीत नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यानी पुढाकार घेण्याची सुचना आ. गोरंट्याल यांनी यावेळी केली. दरेगाव येथील लसीकरण केंदावर आज गुरुवारी 128 नागरिकांनी लस घेतली. जालना शहरातील शाकुंतलनगर भागात सामाजिक कार्यकर्ते राज स्वामी यांच्या संपर्क कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रात परिसरातील नागरिकांनी कोव्हीड लसीचा लाभ घेतला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राम सावंत, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वसंत जाधव, समाधान शेजुळ, दरेगावचे उपसरपंच गणेश ढवळे, गणेश चौधरी यांच्यासह दरेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच शाकुंतलनगर भागातील लसीकरण केंद्रावर पाणीपुरवठा सभापती सौ. पुनम स्वामी, राज स्वामी यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Leave a Reply