सन 2018 च्या मध्यावधीत शहराचे हृदय असलेल्या वजिराबाद भागात रात्री गोळीबार झाला. दोन गटांच्या आपसातील भांडणातून हा गोळीबार झाला होता. पोलीस अंमलदाराने दिलेल्या तक्रारीनंतर वजिराबाद पोलीस ठाण्यात या प्रकरणी जीव घेणा हल्ला या सदरात गुन्ह क्रमांक 240/2018 वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या प्रकरणात कांही आरोपींना न्यायालयाने अटकपुर्व जामीन दिला होता. कांही आरोपींना पोलीसांनी पकडले होते. त्यांना पुढे नियमित जामीन मिळाला होता.काही आरोपींना दोषारोपात फरार आरोपी दाखविण्यात आले होते. याप्रकरणात पोलीसांनी कांही आरोपींविरुध्द मकोका कायद्याची कार्यवाही केली होती. पण उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी मकोका कायद्याची कार्यवाही चुकीची आहे असा आदेश दिला होता. त्यामुळे या आरोपींविरुध्द न्यायालयात भारतीय दंड संहितेच्या कलम 307,326 आणि भारतीय हत्यार कायद्याचे कलम 4/25 नुसार दोषारोप दाखल केला होता. त्यावर न्यायालयात नियमित फौजदारी खटला क्रमांक (आरसीसी)456/2019 असा क्रमांक आहे. हा खटला दि.16 जुलै 2019 रोजी दाखल झाला होता.
जामीन झाल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात अशा प्रकारची प्रकरणे जिल्हा न्यायालयात वर्ग करण्याची प्रक्रिया असते. त्यासाठी सर्व आरोपी एकदा हजर राहणे आवश्यक आहे. पण या प्रकरणातील आरोपी न्यायालयात हजरच राहत नव्हते म्हणून मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणातील 13 जणांविरुध्द 30 डिसेंबर 2019 रोजी अटक वॉरंट जारी केले होते. त्या 13 मधील रवि नंदलाल यादव याने आपले अटक वॉरंट रद्द केलेले आहे.
आज दि.24 ऑगस्ट रोजी या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी होती. पण या प्रकरणातील 12 आरोपी अनवर अली खान अकबर अली खान, कमलकिशोर गणेशलाल यादव, विजय मदनलाल यादव, सोहन यादव, पप्पु उर्फ राजेंद्र गोपाल यादव, तुलजेश भरतलाल यादव, संतोष दयाराम जोशी, सरबजितसिंघ संधू उर्फ मोनी महाराज, तुलजेश चंद्रभान यादव, रवि नंदलाल यादव या 12 जणांचे अटक वॉरंट मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात विना तामीलच परत करण्यात आले.
जवळपास 20 महिने झाले आहेत. 12 आरोपींविरुध्द न्यायालयाने अटक वॉरंट दिलेले असतांना सुध्दा हे आरोपी पोलीसांना सापडत नाहीत आणि त्यांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित राहतात.आजच्या परिस्थितीत हा खटला क्रमांक 456 घोषणेसाठी प्रलंबित आहे. अर्थात हे आरोपी न्यायालयात हजर झाले नाही तर त्यांच्याविरुध्द फरार आरोपी अशी घोषणा होईल. सध्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी योगेशकुमार रहांगडाळे यांनी या प्रकरणात पुन्हा एकदा अटक वॉरंटसह सुनावणीची पुढील तारीख निश्चित केली आहे.
अटक वॉरंटचे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेला का भेटत नाहीत ?
जिल्ह्यात प्रत्येक प्रकरणाचा समांतर तपास करण्याचा अधिकार स्थानिक गुन्हा शाखेला प्राप्त असतो. मागील 20 महिन्यांमध्ये नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने मागील 20 वर्षाच्या तुलनेत भरपूर जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे. दोन टोळ्याच्या जवळपास 30 गुन्हेगारांना पकडून तुरूंगात पाठविण्याचे श्रेय स्थानिक गुन्हा शाखेला आहे. स्थानिक गुन्हा शाखेतील असंख्य पोलीस अंमलदार या शाखेची सातबारा केल्याप्रमाणे कार्यरत आहेत. पण खटला क्रमांक 456/2019 मधील या 12 आरोपींवर अटक वॉरंट असतांना ते मात्र स्थानिक गुन्हा शाखेला दिसत नाहीत योच आश्चर्य वाटते.
Leave a Reply