ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पोलीस खात्यातील राजकीय हस्तक्षेप थांबला पाहिजे : मीरा बोरवणकर

October 18, 202113:57 PM 29 0 0

जालना (प्रतिनिधी ) – हल्ली 5-6 वर्ष केसेस आणि निकाल लागत नाहीत, त्यामुळे आरोपी आणि गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढत चालले आहे. कुणावर कुणाचा वचक राहिलेला दिसत नाही, ही बाब विचारात घेता त्वरित अथवा वर्षभरात निकाल लागल्यास कायद्याची भीती निर्माण होऊन गुन्हे आणि वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांना निश्चितच आळा बसेल, असा विश्वास महाराष्ट्रातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी तथा लेडीज सुपरकॉम म्हणून आपली 37 वर्षाची कारकीर्द गाजविणाऱ्या मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केला. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असेपर्यंत पोलीस खात्यात अजिबात राजकीय हस्तक्षेप होत नसे, तो हल्ली मोठ्या प्रमाणात वाढला आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊन, रोटरी क्लब ऑफ वाई, रोटरी क्लब ऑफ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित शारदोत्सव या व्याख्यानमालेचे आठवे आणि शेवटचे पुष्प मीरा बोरवणकर यांनी “माय जर्नी इन पोलीस” या विषयावर गुंफले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या व्याख्यानमालेत रोटरी क्लबचे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपावले, प्रांतपाल नॉमिनी स्वाती हेरकर, महिला सबलीकरण संचालक महानंदा सोनटक्के, उपप्रांतपाल डॉ. सुमित्रा गादिया, रोटरी क्लब ऑफ अकलुजचे अध्यक्ष सी.ए. नितीन कुदाळे, सचिव गजानन जवंजाळ, रोटरी क्लब ऑफ वाईचे डॉ. प्रेरणा ढोबळे, सचिव तथा अध्यक्ष दिपक बगाडे, रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनचे अध्यक्ष अॅड. महेश धन्नावत व सचिव प्रशांत बागडी, जालना रोटरीचे अध्यक्ष महेंद्र बागडी व सदस्य मोठ्या संख्येने ऑनलाइन उपस्थित होते. मीरा बोरवणकर पुढे म्हणाल्या की, हल्ली पोलीस खात्याला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे पोलिसांना निष्पक्षपणे चौकशी करता येत नाही. जनतेला पोलीस आणि कायद्याचे भय वाटत नाही, त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पोलीस खात्यात 25 टक्के रिक्त जागा आहेत, त्या भरून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नायप्रणाली अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे. केस वेळेवर लागत नसल्याने फिर्यादी हताश होत आहेत. पाच ते सहा वर्षांनी शिक्षा होते. 30 ते 90 दिवसात तपास करून वर्षाच्या आत केस संपल्यास महिला अत्याचारासह गंभीर स्वरूपाच्या अनेक गुन्ह्यात निश्चितच घट होईल. 37 वर्षांच्या सेवेतून निवृत्तीनंतर आपणास सतरा वर्षापूर्वीच्या एका केसेसमध्ये साक्षीसाठी जावे लागले. एवढ्या दीर्घ कालावधीनंतर केस कशी टिकणार, कशी शिक्षा होणार, असा प्रश्न उपस्थित करून मीरा बोरवणकर म्हणाल्या की, पोलीस खात्यात सुधारणा आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाने सात दिशानिर्देश दिलेले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. निवडणूक जाहीरनाम्यात पोलीस खात्यात सुधारणांचा उल्लेख करण्याबाबत लोकप्रतिनिधींवर दबाव आणावा, असा सल्ला देऊन त्या म्हणाल्या की, राजकीय हस्तक्षेपामुळे राष्ट्रीय तपास संस्था आणि महाराष्ट्र पोलीस वेगवेगळ्या दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यात समन्वय राहिलेला नाही, असे सांगून त्यांनी पोलीस खात्यातील अनेक त्रुटींवर प्रकाश टाकला.

लहानपणी आपण केवळ अभ्यासावरच लक्ष केंद्रित न करता इतर ॲक्टिव्हिटीवर भर दिल्यामुळेच पोलीस सेवेत पोहोचलो. आयपीएसनंतर लिंगभेदला सामोरे जावे लागले. पोलीस अधिकारी म्हणून पहिली पोस्टिंग मिळाल्यानंतर महिला असल्याने कायदा व सुव्यवस्था हाताळता येईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पोलिसांमध्ये महिलांची काय गरज, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला. विशेष म्हणजे माझ्या नेमणुकीच्या फेरविचारासाठी फाईल तीन वेळेस मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली, ही आठवण सांगताना त्या म्हणाल्या की, पहिल्या महिला पोलीस अधिकारी म्हणून मी आव्हान पेलल्यानंतर अधिक क्षमतेने काम करण्यास सुरुवात केली. मुंबईची सहआयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जेएनपीटीवर कुख्यात छोटा राजांच्या गॅंगने धुमाकूळ घातल्याची घटना घडली. माहिती पडताच आपण महीला आहे, याचा विचार न करता मध्यरात्री निघाले, रस्ता विसरले. मात्र, घटनास्थळी पोहोचलेच. त्या ठिकाणाहून एक रिवाल्वर जप्त केले, याची आठवण करून देत आपण डगमगलो नाही. महिलांनी कोणतेही काम आपल्याला झेपेल का, असा न्यूनगंड बाळगू नये, असे आवाहन त्यांनी केले. युवक-युवतींसाठी पोलीस खात्यात मोठ्या प्रमाणात संधी असून, त्यासाठी अभ्यासाबरोबरच ॲक्टिव्हिटीवर भर द्या, असे सांगून त्यांनी रोटरी क्लबने आयोजित केलेल्या शारदोत्सव या व्याख्यानमालेबद्दल प्रशंसोद्गार काढले. उपस्थितांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. राजकारणात चांगल्या माणसांची गरज असून, त्यांनी राजकारणात आल्यास बराच फरक पडेल, त्यामुळे तुम्ही राजकारनात या, अशी साद त्यांना एका रोटरी सदस्याने प्रश्नोत्तरादरम्यान घातली असता, “राजकारण नको रे बाबा”, असे सांगून त्यांनी राजकारणात येण्यास विनम्रपणे नकार दिला. रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनचे अध्यक्ष ऍड. धन्नावत म्हणाले की, नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून रोटरीने शारदोत्सव व्याख्यानमालेच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गांच्या यशाची गाथा सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. यातून महिला आणि युवती प्रेरणा घेऊन वाटचाल करतील, असा आम्हास विश्वास आहे. आगामी काळात केवळ महिलांसाठी विशेष परिषद आयोजित करण्याचा रोटरी क्लबचे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपावले, प्रांतपाल नॉमिनी स्वाती हेरकर यांचा मनोदय असल्याची माहिती त्यांनी दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *