ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पोशिंदा तू जगाचा : बळीराजा

October 1, 202114:17 PM 96 0 0

पोशिंदा तू जगाचा
तु मायबाप माझा
तुच जगाचा विधाता
शेतकरी बळीराजा
या विश्वात शेतकरी राजास बहुमोलाचे स्थान आहे. कारण तोच जगाचा पोशिंदा आहे. स्वतःचे सुख दुःख विसरून जगासाठी जगणारा तोच एकमेव आहे. उन,पाऊस,वादळवारा,याची पर्वा न करता जीवाचे रान करुन तो शेतात पिके घेत असतो.आणि कष्टाने लेकरापरी त्यास जपत असतो. कारण लक्षावधी विश्वातील लेकरांची त्याला काळजी असते.पिक आले तर माणूस जगेल आणि पीक नाही तर जीव नाही. यासाठी तो जीवाचे रान करत असतो. याही पुढे असे म्हणेन एक वेळेस जग थांबेल,पण शेतकरी थांबणार नाही. भूमातेचे आणि शेतकऱ्यांचे माय लेकरासारखे अजोड नाते आहे. ते कोणासही वेगळे करता येणार नाही. म्हणूनच तो जगाचा पोशिंदा संबोधला गेला आहे.
पुरातन काळापासून शेतकरी हा महत्त्वपूर्ण मानल्या जातो. बळीराजा पासून आजपर्यंत बघितले तर छत्रपती शिवरायांच्या काळातसुद्धा शेतकऱ्यांना आदराचे स्थान आहे. शिवरायांनी शेतकरी हित जपले. त्यांना सुखसुविधा देण्यात आल्या.ते शेतकऱ्यांची एवढी काळजी घेत असत की, शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होणार नाही, यासाठी त्यांनी सैनिकांना ताकीद दिली होती. शाहू महाराजांनी सुद्धा शेतकरी हिताचे निर्णय घेतले. वेगवेगळ्या सुविधा दिल्या. तर बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सुद्धा बाहेर देशातून तंत्रज्ञान विकसित करून आणून शेतकऱ्यांना पिके भरघोस येण्यासाठी व त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले.
साधुसंतांनी सुध्दा शेतकऱ्यांच्या जीवनावर आपल्या कीर्तनातून, अभंगातून भाष्य केलेले आहे. त्यापैकी
संत तुकाराम महाराज शेतकऱ्यांच्या जीवन संघर्षाविषयी आपल्या अभंगात म्हणतात,
मढे झाकुनिया करिती पेरणी। कुणबियाचे वाणी लवलाहे
ही त्यागवृत्ती आणि धाडसी वृत्ती शेतकरी वर्गाशिवाय कोणीही करु शकणार नाही. हे दातृत्व फक्त आणि फक्त शेतकरीच करु शकतो.

पण आज हाच दाता संकटात सापडलाय.तो त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडतो आहे. पावसाने आपल्या रौद्ररुपी अवताराने त्याला होत्याच नव्हते केले आहे. पुरामुळे शेतातील पिकांची धूळधाण झाली आहे. शेतांनी तळ्याची रुपे धारण केली आहेत. पिके पाण्याखाली गेली आहेत. तोंडावर आलेल्या पिकांना मोड फुटले आहेत. आज बळीराजा धरणीला पडला आहे. आणि शेतातील पिकांकडे पाहून तो ओक्साबोक्शी रडत आहे. महागाई मुळे त्यावर कर्ज बाजारी होण्याची वेळ आली आहे. पाऊस सतत सुरुच आहे. नदीनाले तुडुंब वाहत आहेत. गावात पाणी शिरले आहे. काही ठिकाणी तर शेतकरी बैलांसोबत वाहून गेले आहेत. ओल्या दुष्काळाचे फार मोठे संकट बळीराजावर कोसळले आहे. तरी शासनाने मदतीचा हात देवून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी ई-पिक पाहणी प्रकल्प सेवा आणली आहे. त्यामार्फत शेतकरी स्वतः स्वतः चा अहवाल देण्याचा फार मोठा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. त्यासाठी शासनाचा हा स्तुत्य उपक्रम अभिनंदनीयच आहे. कारण शेतकऱ्यांना कोणावर विसंबून बसण्याची गरज नाही. आपले झालेले नुकसान तो स्वतः नमूद करुन देवू शकतो. पण त्यातही तो अडचणीत सापडला आहे. अस म्हणावं लागेल ‘देणारा भरभरून देत आहे, आणि घेणाराची झोळी अपूरी आहे.’ विकसित भागातील सधन आणि सुशिक्षित शेतकरी ज्यांच्या कडे स्मार्ट फोन आहेत. ते सहज आपली नोंदणी करुन अहवाल भरत आहेत. पण मोबाईल निरक्षर असलेले शेतकरी आजही यापासून वंचित आहेत. तर ग्रामीण भागात वाडी तांडयावर नेटवर्क समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ब-याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यासाठी सध्या तरी हा कार्यक्रम नवीन आहे. हळूहळू तेही शिकतील. पण तरीही प्रशिक्षण त्यांना आवश्यक वाटते आहे.आजतरी त्यांच्यासाठी आँनलाईन आणि आँफलाईन या दोन्ही सोयी उपलब्ध असाव्यात म्हणजे ते सर्व सामान्य माणसाला सोईस्कर पडेल असे वाटते. जेणे करून कोणीही या योजनेपासून वंचित राहणार नाही.हीच काळजी घेणें महत्त्वाचे आहे. नैसर्गिक आपत्तीस कोणी ही थांबवू शकणार नाही. पाऊस ही प्रक्रिया न थांबणारी आहे. म्हणून त्या नुकसानाकडे दुर्लक्ष करुनही चालणार नाही. सध्याची पूरग्रस्त परिस्थिती भयावह झालेली आहे. कित्येक जनांना जलसमाधी मिळालेली आहे. त्यावर शोक व्यक्त करून शांत बसून चालणार नाही. तर त्यासाठी उपाय योजना महत्त्वाची आहे. जेणे करुन कोरडा दुष्काळ आणि ओला दुष्काळ ही परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही. यासाठी ही प्रयत्न आवश्यक आहेत.
याबाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेती आणि जलनीती धोरणा विषयी जाणून घेणे गरजेचे होईल. भारतातील नद्या जोड प्रकल्प संकल्पना ही बाबासाहेबांच्या जलविषयक चिंतनाचा विषय होता. यातून पुराच्या पाण्याचे नियंत्रण आणि संवर्धन, सिंचन, विद्युत निर्मिती, नौका विहार,मृदा संवर्धन आणि मत्स्य उत्पादन यातून आर्थिक विकासाची त्यांची धारणा होती.
हे जलनीती धोरण राबविल्या गेले तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. कोरडा दुष्काळ थांबेल. पुराच्या दुर्घटना थांबतील.आणि पाण्याचे इतरही उपयोग घेता येतील. ही योजना कृषी क्षेत्रालाही लाभदायी आहे. आणि शेतकरी विकासालाही फायदेशीर होईल. कारण आपला देश कृषी प्रधान आहे. त्यामुळे शेतकरी हीत जोपासणा-या गोष्टी महत्त्वाच्या असतील. पिकाला रास्त भाव आणि शेतकऱ्यांचे हक्कही जोपासले जावेत.जेणे करून शेतकरी कर्ज बाजारी होणार नाही एवढेच नाही तर त्यास संपात उतरण्याची पाळी येणार नाही. शेतकरऱ्यांचे सुख आणि समाधान हीच समृद्धीकडे जाणारी वहिवाट आहे. म्हणून शेवटी एवढेच म्हणेल, हे बळीराजा! तु सुखी होवो, संकटमुक्त होवो..कारण तुच पोशिंदा आहेस.

– बाबुराव पाईकराव
डोंगरकडा
MO. 9665711514

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *