जालना :- जालना जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2021 मध्ये रिलायंस जनरल इन्शुरंस विमा कंपनीमार्फत कापुस (जि.) तूर, मुग, उडीद, सोयाबीन, बाजरी व मका अधिसुचित पिकांकरीता राबविण्यात येत आहे. कृषि व पदुम विभागाच्या दि.29 जुन 2021 च्या शासन निर्णयानुसार हंगाम कालावधीत प्रतिकुल परिस्थिती उदाहरण पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतक-यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमा धारक शेतक-यांना 25 टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतुद आहे.
जालना जिल्ह्यात दि. 23 जुलै 2021 ते 16 ऑगस्ट 2021 पर्यंत जवळपास 8 ते 25 दिवसांचा पावसाचा खंड पडलेला असल्याने पिकांच्या उत्पादनात घट येणे अपेक्षित असल्याने जिल्हास्तरीय समितीची बैठक दि. 6 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आलेली होती. सदर बैठकीमधील निर्णयानुसार दि. 18 ऑगस्ट 2021 रोजी पत्रान्वये पिक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिक नुकसानीचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई निश्चित करणेसाठी राज्य शासनाचे अधिकारी व विमा कंपनीचे कर्मचारी यांची संयुक्त समिती तयार करुन विमा अधिसुचित क्षेत्रातील सोयाबीन पिकाचे पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी 5 टक्के क्षेत्राचे सर्वेक्षण करणेबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे सर्व तालुका कृषि अधिकारी यांचेकडुन प्राप्त सर्वेक्षण अहवालानुसार जालना जिल्ह्यातील सोयाबीन पिकासाठी अधिसुचित विमा क्षेत्र घटकातील उत्पादनात येणारी घट ही सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत 50 टक्के पेक्षा जास्त आहे. दि. 13 सप्टेंबर 2021 रोजी जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीमध्ये यावर चर्चा करुन वरीलप्रमाणे जालना जिल्ह्यातील सोयाबीन या अधिसुचित पिकासाठी अधिसुचित सर्व विमा क्षेत्र घटकातील सोयाबीन या पिकाचा पिकविमा काढलेला असेल अशा सर्व पिकाविमाधारक शेतक-यांना दि. 29 जुन 2020 च्या शासन निर्णयातील हंगामातील प्रतिकुल परिस्थितीमध्ये अपेक्षित नुकसान भरपाई रक्कमेच्या 25 टक्के मर्यादेपर्यंत नुकसान भरपाईची आगाऊ रक्कम देणेकरीता अधिसुचना निर्गमित करण्याबाबत सविस्तर चर्चा करुन सर्वानुमते अधिसुचना निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार जालना जिल्ह्यात सोयाबीन या अधिसुचित पिकासाठी अधिसुचित सर्व विमा क्षेत्र घटकातील सोयाबीन या पिकाचा पिक विमा काढलेला असेल अशा सर्व पिकविमाधारक शेतक-यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये अपेक्षित नुकसान भरपाई रक्कमेचया 25 टक्के मर्यादेपर्यंत नुकसान भरपाईची आगाऊ रक्कम देणेकरीता अधिसुचना निर्गमित करण्यात आलेली आहे. विमाधारक शेतक-यांना देण्यात येणारी ही मदत अंतिम येणा-या नुकसान भरपाईतुन समायोजित करण्यात येईल असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जालना यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
Leave a Reply