साहित्याच्या दुनियेत
चमकती अनेक रत्न
दिसे शोभून यामध्ये
अनमोल अनुरत्न
साहित्य क्षेत्र हे वैचारिकांचे फार महत्त्वाचे विचारपीठ होय.
आपल्या लेखन कौशल्याने हर एक साहित्यिकांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. प्रत्येकाच्या लिखाणात त्यांची स्वतःची विशेषता दिसून येते. अशीच आपल्या लेखन कौशल्याची विशेष मोहर वाचक मनावर उमटवून वाचक मनावर आपल्या शैलीची मोहिनी घातली आणि वाचकांच्या मनात आपले विशेष स्थान उभे केले. असे शांत, सुस्वभावी, गोड वाणी लाभलेले, मैत्रीभाव जपणारे ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार अनुरत्न वाघमारे यांचे नाव जनमानसांच्या ओठांवर आहे. अनुरत्न वाघमारे यांना नुकताच अदिलाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार नुकताच मिळाला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यशैलीवर मला लिहण्याचा सुवर्णयोग लाभला. हे मी माझे भाग्य समजतो.
अनुरत्न वाघमारे यांच्या कार्याचा आढावा घेतला असता त्यांचे कार्य अथांग आहे हे मान्य करावेच लागेल. त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. ते फक्त साहित्यिकच नाहीत तर ते एक सच्चे कार्यकर्ते आहेत. समाजामध्ये सुद्धा त्यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याची सुरुवात कुठून करावी. हे माझ्या साठी अवघड काम आहे.एक कार्यकर्ता म्हणून कार्याची सुरूवात करावी की साहित्यिक म्हणून हा प्रश्न आहे.nएक कार्यकर्ते म्हणून त्यांच्या कार्याला हात घातला तर असे लक्षात येईल की समाजाच्या कानाकोपर्यात जाऊन त्यांनी धम्म चळवळ राबविली. ग्रामीण भागात वाडी, तांड्यावर व्याख्याने त्यांनी दिली. डोंगरकडा या आमच्या गावी त्यांचे एक व्याख्यान झाले होते. त्या व्याख्यानाचा मी श्रोता म्हणून साक्षीदार आहे. तिथूनच मी सरांच्या सहवासात आलो. त्यांच्या निमित्ताने मी साहित्य प्रवाहात सामील झालो. म्हणून म्हणतो की त्यांच्या कार्याची व्याप्ती फार मोठी आहे. ते ग्रामीण भागात किंवा पंचक्रोशीतच थांबले नाहीत.तर राज्यभर त्यांनी कार्य केले आहे. त्यांचे त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे विविध शिबिरे, ध्यान केंद्रे, अभ्यास केंद्रे, हे बहुमोल कार्य पार पाडत असताना महाराष्ट्रभर फिरले. भाजा पुणे, नंदुरबार, विदर्भातील
बोरधरण, याही पलीकडे त्यांनी राज्याबाहेर जावून कार्य केले आहे. केरळ, कन्याकुमारी, गुलबर्गा, कर्नाटक याठिकाणी त्यांनी आपले योगदान दिले.आजही ते धम्म मित्र म्हणून सर्वांना परिचित आहेत.
समाज कार्य करतांना त्यांनी साहित्य क्षेत्राकडे दुर्लक्ष कधीच केले नाही. साहित्याच्या माध्यमातून मनोरंजनातून त्यांनी जनतेचे प्रबोधन केले. जवळजवळ त्यांची चार ते पाच पुस्तके आतापर्यंत प्रकाशित झाली आहेत. चार काव्यसंग्रह आणि एक कथासंग्रह यांचा त्यात समावेश आहे. आपल्या लेखनीला प्रत्येक वेळी त्यांनी विशेषतः एक अनोखी पद्धत अवलंबण्याचा प्रयत्न केला आहे. जी याअगोदर कुणीही वापरली नाही.bत्यांचा पहिला काव्यसंग्रह *चितपट* यामध्ये त्यांनी सहाच ओळींच्या कविता केल्या आहेत. आणि तो सुंदर मनोरंजक आशययुक्त काव्यसंग्रह आहे.
भारत माझा देश आहे
समता ममता इथे नांदते
मला देशाचा अभिमान आहे
भावभावकीला ठेचुन मारले
गावानेच मला बहिष्कृत केले
गावाचाच मला अभिमान आहे.
त्यांच्या पुढील कवितेत ते म्हणतात,
हर एक काम करता करता
आपल्याच नवऱ्याला हजारदा मारते
मळकट घाम पुसता पुसता कपाळावरील कुंकवाला
तेवढेच जपते.
हा त्यांचा महाराष्ट्रातील पहिलाच स्वप्रयोग आहे. या काव्यसंग्रहास ‘शब्दगंध’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.
*’माझ्या नजरेतून बाबासाहेब’* हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह. यामध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या निगडीत प्रत्येक वस्तूंचा आपल्या काव्यात समावेश करून बाबासाहेबांच्या साहित्यांना काव्यमय केले. त्यामध्ये कोट, टाय, पेन,चष्मा, दिक्षाभूमी यांना काव्यशिल्पांनी सजविले आहे. ‘नदर’* हा त्यांचा ग्रामीण भाषेतील कथासंग्रह होय. ग्रामीण भाषेचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘नदर’ होय. त्यातील गंमतीशीर संवाद वाचकांना रमून ठेवतात. या कथासंग्रहास ‘सयायी’ हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे .
‘ दंगल घडविण्याचा परवाना’* हा काव्यसंग्रह समाजातील विविधतेची सविस्तर मांडणी करणारा आहे. आपल्या मनाचा ठाव घेणारा काव्य संग्रह आहे. ‘ धुतलेलं मातरं*’हा सरांचा एक प्रसिद्ध काव्य संग्रह होय. जो आपणास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी आपल्या मनात उतरवणारा आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजावून देणारा काव्यग्रंथ आहे. बाबासाहेबांचे महत्त्व त्यांनी वेगवेगळी उदाहरणे देवून आपल्या शैलीतून सांगितले. हे त्यांचे अतिशय लोकप्रिय असलेले काव्य आहे.
कवी म्हणतात,
‘भिंतीचा कोस काढायचा असेल तर
वळंबा कोनाळी वापरतात.
दार बसवतांना चौकटीचा कोस काढायचा असेल तर
लेवलपाईप किंवा पारापट्टी वापरतात.
पण आपल्यातील कोस काढायचा असेल तर
बाबासाहेबांचे विचार अनुसरावे लागतात,
अस मव्हा बाप म्हणायचा.
अनुरत्न वाघमारे सरांचे लिखाण हे मानसाला समतेचा मार्ग दाखविणारे आहे. एवढेच नाही तर मानसाला मानवतेचा धडा देणारे आहे.
वाघमारे सर भारतभर धम्म कार्य करीत फिरले. पण त्यांनी
भुतानचा परदेश दौराही केला. आणि तेथून ते बुद्धांच्या धम्माची शिदोरी घेवून आले आहेत. लवकरच ते आपले प्रवास वर्णन प्रकाशित करणार आहेत.सरांनी समाज कार्याचा रथ हाकतांना विविध कार्यात स्वतः ला झोकून दिले. त्यांची सामाजिक संस्थेने आणि समाजानेही नोंद घेतली. कोवीड-१९काळात त्यांनी जीवाची पर्वा न करता अडचणीत सापडलेल्या लोकांना अन्न धान्य, कपडे यांचे वाटप केले.त्यांच्या या कार्याची महात्मा कबीर समता परीषदेने नोंद घेवून त्यांना ‘कोविड योद्धा’ म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले आले.
निवडणूक या राष्ट्रीय कार्यात त्यांनी बी.एल.ओ. या पदावर काम करत असताना त्यांच्या उत्कृष्ट कामाची नोंद जिल्हाधिकारी साहेब यांनी घेवून त्यांना सन्मानित केले. सेवेत असतांना ‘वृक्षारोपण’ या विशेष मोहीमेंतर्गत त्यांच्या कार्यालयास महाराष्ट्र शासनाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दिले.
साहित्य क्षेत्रातील कामगिरी पाहता त्यांनी प्रथम अक्षरोदय साहित्य मंडळ स्थापन केले. त्या मार्फत त्यांनी नवसाहित्यीकांना एक विचारपीठ उभे करुन दिले. ते आज मंडळात ‘उपाध्यक्ष’ म्हणून काम पाहतात. नांदेड शहरात गुरूतागद्दीच्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदविला. त्यासाठी त्यांना पुरस्कृत करून सन्मानित करण्यात आले. याशिवाय ईतरही बरेच राज्यस्तरावरील पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. ते मराठी ग्रामीण साहित्य परीषदेचे सचिव आहेत. त्यांनी सप्तरंगी साहित्य मंडळाची स्थापना केली. आणि त्याचे जाळे दुरवर पसरविले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली त्रैभाषिक कविसंमेलन, काव्य पौर्णिमा, तसेच अखिल भारतीय बहुभाषिक राष्ट्रीय स्तरावरील कविसंमेलन घेऊन त्यांनी साहित्य रसिकांच्या मनात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.
या गौरवशाली कर्तृत्ववान साहित्यिकांस अदिलाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त त्यांचे मनस्वी अभिनंदन. आणि त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना भरभरून शुभेच्छा..
– बाबुराव पाईकराव
डोंगरकडा
9665711514
Leave a Reply