जालना दि.18- वाचनाने आपला सर्वागींण विकास होतो. वाचन हे जीवनाचे अविभाज्य अंग असुन कारागृहातील बंदीजनानांसुध्दा वाचनाचा अधिकार असल्याने त्यांच्यासाठी जालना जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने सुरु केलेले कारागृह ग्रंथालय हा अंत्यत उपयुक्त व स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. ते जालना येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने जालना जिल्हा कारागृहामध्ये सुरु केलेल्या कारागृह ग्रंथालयाचे उद्घाटन करतांना बोलत होते. या ग्रंथालयामध्ये विविध व उपयुक्त विषयांवरील मुबलक ग्रंथ, सुसज्ज फर्निचर, वाचनीय म्हणी, वाचनास पोषक असे वाचन कक्ष या सर्व बाबी बंदीजनाच्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडवुन आणण्यात सहाय्यभुत ठरणाऱ्या असुन जिल्हा ग्रंथालय अधिकारी व कारागृह अधीक्षक निश्चितच कौतुकास पात्र असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी मत व्यक्त केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी या विशेष कारागृह ग्रंथालय स्थापन करण्यामागची भूमिका व्यक्त करतांना जिल्हा नियोजन समितीने जिल्हा वार्षीक योजनेतुन दिलेल्या मदतीमुळे सदरचे ग्रंथालय प्रस्थापित करण्यात आल्याचे सांगुन बंदीजनांचा कारागृहातील कालावधी सुसह्य, सकारात्मक व वाचनासारख्या छंदामध्ये सहज व्यतीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रस्ताविकेतुन कारागृह अधीक्षक श्रीमती अरुणा मुगुटराव यांनी कारागृहातील बंदीजनानी या ग्रंथालयातील ग्रंथ वाचुन स्वंयविकास करावा, तसेच वाचण्यातुन काही लिहिण्याची प्रेरणा निर्माण झाल्यास ती लिहिण्यासाठी आवश्यक ते लेखनसाहित्य, आणखी काही चांगले वाचण्यासाठी वाचनसाहित्य कारागृहातर्फे लगेच उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगुन बंदीजनांनी या वाचनसेवेचा दररोज लाभ घ्यावा असे आवाहन केले. याप्रसंगी व्यासपीठावर उपअधीक्षक आशिष गोसावी, वरिष्ठ तुरुगांधिकारी असद मोमीन, तुरुंगाधिकारी सचिन पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. फेरोज अहमद हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन मुख्य लिपिक अनिल बाविस्कर यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी व ग्रंथालय उभारणीसाठी निरीक्षक ज्ञानेश्वर पैठणे, शंकर पवार, परमेश्वर सानप हे ग्रंथालयाचे कर्मचारी व संदीप गव्हांडे, सतीश रहाणे, गजानन जाधव, गणेश राठोड, सिध्दार्थ वाघमारे व श्वेता काळे या कारागृह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Leave a Reply