जालना ( प्रतिनिधी) : बांगलादेशात होत असलेल्या हिंदू देवी-देवतांच्या विटंबना, इस्कॉन मंदिरांची तोडफोड, मुली -महिलांवरील पाशवी अत्याचार, अल्पसंख्यांक हिंदू बांधवांच्या होणाऱ्या कत्तली त्यांची दुकाने व घरांची जाळपोळ या घटनांच्या निषेधार्थ जालन्यात शनिवारी ( ता .23 ) इस्कॉन तर्फे जिल्हा कचेरीवर काढण्यात आलेल्या नामसंकीर्तन रॅलीत विविध हिंदू पंथ व हिंदुत्ववादी संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदनात बांगलादेश सरकारने हिंसा तात्काळ थांबवून दोषींविरूध्द कार्यवाही करून अल्पसंख्याक हिंदूंना संरक्षण द्यावे अशा मागण्या करण्यात आल्या.
बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर झालेल्या अन्याय व अत्याचाराच्या निषेधार्थ इस्कॉन तर्फे शनिवारी जगातील 140 देशांत निषेध म्हणून नामसंकीर्तन रॅली काढण्यात आल्या. जालना येथे इस्कॉन चे व्यवस्थापक रास गोविंद दास यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर ” नामसंकीर्तन रॅली ” चे आयोजन करण्यात आले. सकाळी 10.00 वा. इस्कॉन चे साधक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू महासभा,वारकरी, महानुभाव पंथ,गायञी संस्थान, दत्त पंथ यांच्या सह हिंदू संघटनांचे प्रतिनिधी अंबड चौफुली येथे एकञ आले. निषेधांचे विविध फलक हाती घेऊन टाळ, मृदंग, सतार वाद्ये वाजवत, ” हरे कृष्णा,,,हरे रामा ,,,, ” अशी भजने गात नामसंकीर्तन रॅली ने जिल्हा कचेरीवर आगेकूच केली.
जिल्हा प्रशासना तर्फे नायब तहसीलदार संतोष गोराड यांच्या मार्फत राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदनात म्हंटले आहे, बांगलादेशात हिंदू व अन्य अल्पसंख्यांकांवर अनेक दशकांपासून हल्ले सुरू आहेत. हे थांबविण्याची गरज असून नुकत्याच हिंदू बांधवांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांच्या व्यथा व वेदनांचे जगातील हिंदू बांधवांतर्फे शांततामय प्रदर्शन असल्याचे नमूद करत . हिंदू व अन्य अल्पसंख्यांकांना मुक्तपणे श्रद्धेचे कार्य करता यावे यासाठी बांगलादेश सरकारने कायदेशीर मार्गाचा अवलंब करून हिंसाचार तात्काळ थांबवावा, दोषींना अटक करून शिक्षा करावी, हिंदू व इतर अल्पसंख्यांक समुदाया ची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने धार्मिक स्थळे व निवासी भागांना संरक्षण दिले जावे, अशा मागण्या लेखी निवेदनात करण्यात आल्या. यावेळी इस्कॉनचे व्यवस्थापक रास गोविंद दास, विश्वंभर दास, कृष्णा बलदेवदास , प. पू. मनोज महाराज गौड,पंडितराव भुतेकर, संजय मस्के, विष्णू मदन, मुकेश अग्रवाल ,किशोर तिवारी, भरत ताम्मेवार, विजय राऊत, कैलास चव्हाण, लक्ष्मण गिरी, डॉ.नितीन खंडेलवाल,हेमंत ठक्कर, सिध्दीविनायक मुळे, मनिष तवरावाला, धनसिंह सुर्यवंशी, अनिक शाह, जगदीश गौड, संतोष तिवारी, नितीन बागडी, शिवशंकर खिचडे, संदीप बाहेकर, प्रवीण सातुरकर ,कृष्णा आरगडे, प्रकाश चव्हाण, सविता काळे आदींनी सहभाग नोंदवला.
वेदनांचे शांतता मय प्रदर्शन : रास गोविंद
कोणत्याही धार्मिक संप्रदाय, बांगलादेश सरकार विरूध्द आमचा विरोध नसून बांगलादेशात अनेक दशकांपासून सुरू असलेल्या तसेच नुकत्याच झालेल्या हल्यांमधील वेदनांचे शांतता मय प्रदर्शन असल्याची भूमिका रास गोविंद प्रभू यांनी स्पष्ट केली.
बांगलादेशात जमावाने हिंदू मंदिरांची तोडफोड करून मुली व महिलांवर पाशवी अत्याचार करून बांधवांच्या निर्दयीपणे कत्तली केल्या तसेच घरे, दुकानांची जाळपोळ केली. हे सुरू असतांना पोलीसांनी संरक्षण देण्यास नकार दिला. असे सांगून बांगलादेश सरकारने हिंदू सह अल्पसंख्याकांना संरक्षण द्यावे. या साठी जागतिक पातळीवर नामसंकीर्तन रॅली काढण्यात आल्याचे रास गोविंद प्रभू यांनी नमूद केले.
Leave a Reply