जालना (प्रतिनिधी) ः बदनापुर तालुक्यातील बावणे पांगरी व भोकरदन तालुक्यातील राजुर या दोन महसुल मंडळातील नुकसानस्ग्रत शेतकर्यांना राज्य शासनाच्या वतीने तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी आ. कैलास गोरंट्याल यांनी राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यातील बहुतांशी गावातील शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनातर्फे नुकसान भरपाई देत असतांना? जालना जिल्ह्यात केवळ बावणे पांगरी (ता. बदनापुर) व राजुर (ता. भोकरदन)या दोन मंडळातील शेतकर्यांना झालेल्या नुकसानीच्या भरपाई पासुन वंचित रहावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे या दोन मंडळातील शेतकर्यांच्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असतांना त्यांच्यावर अन्य होत असल्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी मदत व पुनर्वनमंत्री विजय वडेट्टीवार यांची मुंबई येथे भेट घेवून लेखी निवेदन देत निदर्शनास आणुन दिले आहे.
विशेष म्हणजे महसुल व कृषी विभागाने प्रत्यक्ष पाहणी व पंचनामे करुन शासनास तसा अहवाल सादर केलेला आहे. असे असतांना बावणे पांगरी व राजुर महसुल मंडळातील शेतकर्यांना शासनाच्या वतिने देण्यात येणार्या आर्थिक मदतीतून का वगळण्यात आले असा सवाल देखील आ. गोरंट्याल यांनी या निवेदनात उपस्थित केला आहे. जिल्हाधिकारी जालना यांनी देखील उपरोक्त दोन्ही मंडळात अतिवृष्टी झाल्या बाबतचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे.
त्यामुळे वरील दोन्ही मंडळातील शेतक-यांना अतिवृष्टीमुळे पिकांची झालेली नुकसान भरपाई जिल्ह्यातील इतर महसुल मंडळातील शेतकर्यांप्रमाणे देण्यात यावी अशी मागणी देखील आ. गोरंट्याल यांनी या निवेदनात केली आहे.
Leave a Reply