ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सार्वजनिक गणेशोत्सव रोहा : एक गाव एक गणपती : शतकमहोत्सवी वर्ष

September 15, 202114:03 PM 78 0 0

माझं माहेर रोहा, जिल्हा रायगड. आजवर मी रोह्यातल्या अनेक मान्यवर व्यक्तींच्या आठवणी लिहील्या असून आपण सर्वांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. नुकतीच मी गणपती सणानिमित्त रोह्याला जाऊन आले, तेव्हा समजलं की रोह्याच्या सार्वजनिक गणपती उत्सवाचं हे शतकमहोत्सवी वर्ष आहे, त्यानित्यानेच आज माझ्या मनात असलेल्या या ” एक गाव एक गणपती ” या आगळावेगळ्या बिरुदासह साजऱ्या होणाऱ्या सांस्कृतिक सोहळ्याच्या आठवणी मी शेअर करतेय.
1922 साली आपल्या गावात सार्वजनिक रित्या साजरा होणारा उत्सव असावा या हेतूने लोकमान्य टिळक यांना अपेक्षित असलेल्या पद्धतीनेच या गणपती उत्सवाची सुरुवात करण्यात आली. संपूर्ण गावाचा म्हणून एकच सार्वजनिक गणपती असला पाहिजे, प्रत्येक आळीत, ऑफिसात , असे वेगवेगळे सार्वजनिक गणपती नसावेत, गावात एकोपा रहावा, त्याशिवाय लोकांनी चांगलं काहीतरी एकत्र येऊन करावं या हेतूने ” एक गाव एक गणपती ” अशा पद्धतीने रोह्याचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झालाय, सांगायला अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे की , आजही रोह्यात हा एकच सार्वजनिक गणेशोत्सव असतो. सगळंच गाव हा आपला उत्सव समजून अत्यंत हिरिरीने, मनापासून, आनंदाने यशाथक्ती या उत्सवात सहभागी होतो.


एखाद्या व्यक्तीला जर सार्वजनिक कार्यकर्ता म्हणून काम करायचे असेल तर त्याची सुरुवात या सार्वजनिक गणेशोत्सवातून होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ते रोह्याचे नगराध्यक्ष असा प्रवास करणारे कै.दिलीपभाई राजे यांचं नाव झटकन आठवलं. कोणी कोणतं पद भूषवलं हे आठवत नाही, पण सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे आधीच्या पिढीत माधवराव भावे, आप्पा पेंडसे, नाना बेडेकर, जनुभाऊ आठवले, मग त्यानंतर दिलीपभाई राजे, हेमंत तलवार, गजानन मळेकर, अविनाश दाते, आप्पा देसाई,दिलीप वडके ही नावं पटकन आठवतात. नंतर पुढच्या पिढीतले निखिल दाते,मकरंद बारटक्के, बापू जोशी, अमित उकडे, हरिश्चंद्र मेकडे, श्रीकांत मुरुडकर, मिलींद सुर्वे, मिलींद जोशी,सतीश पटवर्धन, सुहास दहिवलकर, संजय पांचाळ ही नाव आठवली. त्यानंतर आता कोणकोण कामं करतात हे माहीत नाही, पण पाठोपाठ एकेका पिढीतली मुलं या उत्सवात हिरिरीने पुढाकार घेऊन काम करीत असतात हे ऐकलंय.

भाटे सार्वजनिक वाचनालय आणि सार्वजनिक गणेशोत्सव रोहा या म्हणायला दोन स्वतंत्र संस्था आहेत. आता तर सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट ची स्थापना होऊन त्यांनी स्वमालकीचे कार्यालयात स्थलांतर करुनही खूप कालावधी लोटलाय. ट्रस्ट आणि उत्सव समिती, वाचनालय आणि रोहा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सण साजरा होतो. ट्रस्ट मधे वाचनालय अध्यक्ष आणि नगराध्यक्ष पदसिद्ध सदस्य आहेत, म्हणूनच सर्वसमावेशक असा उत्सव साजरा होतो. गणेशोत्सव साजरा होतो तो भाटे सार्वजनिक वाचनालयातच, माझ्या सारख्या असंख्य माहेरवाशीणी जर रोह्यात जायला मिळालं की धावीराला, आणि सार्वजनिक गणपतीच्या दर्शनाला जायची संधी कधी मिळत्ये याची वाटच बघत असतील, याची मला खात्रीच आहे. भाटे सार्वजनिक वाचनालयाचा शतकमहोत्सव झाल्यानंतर पाठोपाठ आता “सार्वजनिक गणेशोत्सव रोहा ” सुद्धा शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे, ही सर्व रोहेकरांना अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. यंदा करोनाच्या सावटामुळे हा आनंद मोठ्या प्रमाणावर साजरा करणं तर राहो ,पण काही समारंभ साजरा करता येणं पण शक्य नाहीये, म्हणून तर एक प्रकारे हा उत्सव साजरा करण्याचा मार्ग म्हणून मी या आठवणी लिहीत आहे. कित्येक नावं रहातील, कित्येक कार्यक्रम बघितलेले विसरले असेन, पण जे मनात अक्षरशः दाटून येतंय ते कागदावर उतरवण्याचा हा लेखनप्रपंच आपण गोड मानून घ्यावा , ही विनंती आहे.

दरवर्षीच गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात, ज्यावेळेस दूरदर्शन नव्हतं, त्यावेळेस तर हे कार्यक्रम हीच लोकांना मनोरंजन आणि ज्ञानवर्धन करणारे एकमेव साधन असे. एक दिवस गावातील नूतन भजनी मंडळाचे भजन, एक दिवस गावातील स्थानिक कलावंतांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर दिवशी बाहेरून बोलावलेले सन्माननीय वक्ते, गायक, वादक, एकपात्री कार्यक्रम करणारे यांच्या उत्तमोत्तम कार्यक्रमांची रेलचेल असे. ऐकीव माहितीनुसार पु.ल.देशपांडे सुद्धा या गणेशोत्सवात कार्यक्रम सादर करुन गेलेले आहेत.
माझ्या मनात ज्या कार्यक्रमांविषयीच्या आठवणी आजही स्पष्ट आहेत त्याविषयी थोडसं लिहीत्ये. आजवर सार्वजनिक गणेशोत्सवात अतिशय आवडलेली भाषणांपैकी स्पष्ट आठवतंय ते प्राचार्य शिवाजीराव भोसले सर यांचं व्याख्यान, अप्रतिम वक्तृत्व म्हणजे काय याचा पहिल्यांदाच अनुभव घेतला, बसायला जागा मिळाली नव्हती तरीही एकदाही पाय दुखतात अशी जाणीवही झाली नाही इतकं मन त्या भाषणात गुंतून गेलं होतं. उत्तरा केळकर आल्या होत्या. आल्यावर गणेशवंदना झाल्यानंतर त्यांनीच सांगितलं की, “बिलायशी नागिन” हे गाणं मी नंतर म्हणणारच आहे, ते सोडून इतर गाण्यांची चिठ्ठी पाठवून फर्माईश करा. एकापाठोपाठ एक अप्रतिम गाणी सादर होत होत कार्यक्रम पहाटे दीड का दोन वाजता संपला होता, त्याची आठवण आजही ताजी आहे. किर्ती शिलेदार यांचं गाणंही असंच पहाटेपर्यंत रंगलं होतं, बिलायशी नागिन वर डोलणारे लोकं , त्यांच्या कशी या त्यजू पदाला या गाण्यालाही उत्तम दाद देत होते. अशीच आठवण आहे मुग्धा चिटणीस च्या कथाकथन कार्यक्रमाची. तिच्या कथाकथनाच्या दुसर्या दिवशी सुप्रसिद्ध अभिनेते दत्ता भट यांचा ” झाले मृगजळ आता जलमय” हा कार्यक्रम होता. ते आदल्या दिवशीच रोह्यात आल्यामुळेच मुग्धाच्या कथाकथनाच्या कार्यक्रमाला येऊन बसले होते. भाटे वाचनालयाचा हाॅल खचाखच भरला होता, तिच्या उत्तम कथाकथनाला तितकाच उत्तम प्रतिसाद मिळत होता, दत्ता भट सुद्धा मनापासून तिच्या कार्यक्रमात दाद देत होते. दुसर्या दिवशी दत्ता भट यांच्या कार्यक्रमाला मात्र हाॅल जेमतेम भरला होता, पण याचा कोणताही उल्लेख न करता त्यांनी त्यांचे नाटक सिनेमातले विविध प्रसंग आमच्यासमोर जिवंत केले, तो आविष्कार पाहून आम्ही थक्क झालो. माझ्या भावाने केदारने दत्ता भटांना विनंती केली की सिंहासन सिनेमातला “टू बी ऑर नाॅट टू बी, मुख्यमंत्री होणार की नाही” हा गाजलेला प्रसंग सादर करायची विनंती त्यांनी लगेच मान्य करून अप्रतिम रित्या तो प्रसंग सादर केला.


शिरीष कणेकर यांचा स्टॅन्ड अप टाॅक शो याच गणेशोत्सवात मी बघितला. ज्यावेळेस सिनेमातले गाजलेले डायलॉग ते म्हणत होते, त्यावेळेस प्रेक्षकातून तेच डायलॉग बिनचूक ऐकायला आल्यावर त्यांनी विचारलं की रोह्यात किती टाॅकीज आहेत, तेव्हा फिरोज टाॅकीज बंदच होतं, फक्त एका टुरींग टाॅकीज वर एवढा अभ्यास? असं म्हणत रोह्यातल्या सिनेप्रेमी लोकांचं मला मनापासून कौतुक वाटतंय, अशा हौशी , सिनेमावेड्या लोकांमुळेच माझा कार्यक्रम जास्त लोकप्रिय होतोय , असंही ते म्हणाले होते. सुधीर गाडगीळ एका कार्यक्रमात आले होते, त्यावेळेस त्यांचीच मुलाखत ( एरवी तेच लोकांच्या मुलाखती घेतात) आणि त्यांना प्रेक्षकातून प्रश्न विचारायचे असा कार्यक्रम होता, खूप रंगतदार झाला कार्यक्रम, मी सुधीर गाडगीळांना विचारलं होतं की, तुम्ही इतके गायक, संगीतकार यांच्या मुलाखती घेता, तुम्हाला गाण्यातलं सगळंच समजतं का? यावर ते अगदी दिलखुलास हसले आणि म्हणाले ” अगदी खासच प्रश्न आहे, एवढंच सांगेन की कुठे दाद द्यायची आणि कुठे नाही, इतपत मला गाणं समजतं!!”
राम नगरकर यांचा रामनगरी हा एकपात्री कार्यक्रम याच गणेशोत्सवात होता. रात्री साडेनऊ वाजता कार्यक्रम होता, हाॅल नव्हे तर संपूर्ण वाचनालयाचा परिसर माणसांनी फुलून गेला होता. कार्यक्रम सुरु झाला आणि राम नगरकर म्हणाले की बाहेर खूपच गर्दी आहे, बाहेर कार्यक्रम घेतला तर सर्वांनाच बघता येईल, दहा मिनिटात बाहेर कार्यक्रम सुरु झाला, सगळा परिसर हास्यकल्लोळात बुडून गेला. मधेच पंधरा मिनीट अवचित पाऊस आला, तेवढा वेळ सगळेच आपापल्या जागी थांबले आणि पाऊस थांबल्यानंतर पुन्हा कार्यक्रम सुरु झाला तो पहाटेपर्यंत रंगला. इतका उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल राम नगरकर यांनी रोहेकरांचे मनापासून आभार मानले.
या आमच्या रोह्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची काही खास वैशिष्ट्य आहेत, ती या उत्सवाला इतरांपासून वेगळं दर्शवतात. एक गाव एक गणपती असा उत्सव आहे, पण घरोघरी कंपल्सरी वर्गणी गोळा केली जात नाही, लोकांनी आपणहून दिलेली रक्कम आनंदाने स्वीकारली जाते, पन्नास रुपये वर्गणीवाला आणि पन्नास हजार वर्गणीवाला यांना सारखाच आदर मिळतो. वर्षानुवर्ष लोकं स्वतःहून यथाशक्ती वर्गणी देतात. गल्लोगल्ली वेगवेगळी मंडळं नसल्यामुळेच गावातली सगळी वर्गणी याच उत्सवाला मिळते. औद्यागिक वसाहतीतील कंपन्या नेहमीच सढळ हस्ताने मदत करतात. आपल्या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रोज रात्री गावातील प्रत्येक आळीला आरतीचे यजमानपद असते व संपूर्ण गावाचा या उत्सवात सहभाग असतो.
आज शंभराव्या वर्षात पदार्पण करुनही आजवर या गणेशोत्सव मंडळ/ ट्रस्ट यांनी कधीही हा नवसाला पावणारा गणपती आहे” नवसाचा राजा” ,खास वैशिष्ट्य म्हणून लोकांना न दिसेल अशी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करुन रांगा लावायला भाग पाडणं असं केल्याचं ऐकिवात नाही, लोकाभिमुख सण कायम तसाच आहे, लोकांनी लोकांसाठीच केलेला उत्सव!! मला याचा फार अभिमान वाटतो. अशा वैविध्यपूर्ण गणेशोत्सवाचे शंभराव्या वर्षात सर्व वैशिष्ट्य जपत जपत पदार्पण होणं, जुन्या नव्याची यशस्वी सांगड घालणं यामुळेच हे यश मिळवलंय असं वाटतं. पूर्वीपेक्षा गुलाल उधळणे कमी करणे, गोंगाट कमी करणे, निर्माल्य संकलन करुन त्याचं खत बनवणे असे कालानुरूप बदल घडतच आहेत. आता मी चिपळूण मधे असले तरी गणपतीचे दिवस जवळ आले की रोह्याचा गणपती उत्सव आठवतो,मन भूतकाळात रमतं, आज त्याच आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केलाय.
आमच्या रोह्याच्या या “एक गाव एक गणपती ” या शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला माझ्या मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा !!
राजेश काफरे हे शतकमहोत्सवी वर्षाचे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांचे विशेष अभिनंदन. हे वर्ष संपतांनाच सर्व विघ्नं दूर होतील आणि सांगता समारंभ दणक्यात साजरा करता येईल अशी मला खात्री वाटते आहे. राजेश्वर नेतृत्वाखालील हा समारंभ साजरा होवो, या शुभेच्छा!!
हा उत्सव शतकानुशतके असाच वैशिष्टय़पूर्ण पद्धतीनेच साजरा होईल, अशी त्या गणराया चरणी प्रार्थना.

सुवर्णा भावे जोशी,

चिपळूण

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *