जालना(प्रतिनिधी)ः प्रदुषण नियंत्रण विभागाच्या नियमानुसार वाहनाची तपासणी करुन त्यांना पी. यु. सी. प्रमाणपत्र देण्यात येते. परंतु वाहनाची तपासणी न करताच केवळ फोटो पाहून पी. यु. सी. प्रमाणपत्र देण्याचा प्रताप जालना शहरात सुरु होता. अखेर या प्रकरणी प्रादेशीक परीवहन विभागाने कारवाई करुन कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नॅशनल पीयूसी सेंटर असे खोटे पी. यु. सी. प्रमाणपत्र देणार्या सेटंरचे नाव आहे.
जालना शहरात बेकायदेशीर कामे करणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या बेकायदेशीर कामे करणार्यांचा बंदोबस्त करण्याची मोठी जबाबदारी पोलीसांवर आहे. परंतु संबंधीत विभागाने पुढाकार घेतला तर पोलीसांना कारवाई करणे सोपे जाईल. असे नागरीकातुन बोलल्या जात आहे.
जालना औद्योगिक वसाहत परिसरामध्ये असलेल्या नॅशनल पीयूसी सेंटरमध्ये बनावट पीयूसी प्रमाणपत्र दिले जात असल्याच्या तक्रारी उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांकडे आल्या होत्या. वरिष्ठांच्या आदेशानुसार उदय साळुंखे यांनी काही प्रमाणपत्राची तपासणी केली. यावेळी पीयूसी प्रमाणपत्र देताना वाहन तेथे प्रत्यक्षात हजर नसल्याचे आढळून आले. दरम्यान याप्रकरणी पीयूसी सेंटरचा मालक शेख साजिद शेख कबीर रा. संजयनगर याच्याविरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Leave a Reply