नांदेड – येथील साहित्यिक तथा शब्ददान प्रकाशन संस्थेचे प्रकाशक प्रा. अशोककुमार दवणे यांनी आपल्या साहित्यातून तसेच प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून एकखांबी आंबेडकरी चळवळच उभी केली आहे. त्यांच्या अनेक साहित्यकृती अंधारात चाचपडणाऱ्या नाहीत तर त्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या बोटाच्या दिशेने मार्गोत्क्रमण करणाऱ्या आहेत. त्यांचे स्वतःचे साहित्य, संपादित साहित्य तसेच चित्रपट निर्मिती या माध्यमातून सुरू असलेले प्रा. अशोककुमार दवणे यांचे कार्य अत्यंत स्पृहणीय असे आहे असे प्रतिपादन येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. जगदीश कदम यांनी केले. यावेळी आंबेडकरी कवी गंगाधर ढवळे, प्रा. दवणे यांच्या सुविद्य पत्नी वैजयंतीमाला दवणे, मुलगी अभियंता दक्षता दवणे, उत्कर्षा दवणे यांची उपस्थिती होती.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने प्रा. अशोककुमार दवणे यांच्या मराठी भाषेत २०१२ कवितांचा संग्रह असलेल्या ‘माझ्या मरणाआधीचा जाहीरनामा’ या महाकाव्य ग्रंथास भारतातील सर्वात मोठा कवितासंग्रह असल्याची नोंद करुन मानपत्र, मानचिन्ह, पदक, पेन, लोगोसह त्यांना सन्मानित केले आहे. याचेच औचित्य साधून डॉ. जगदीश कदम आणि समीक्षक गंगाधर ढवळे यांनी दवणे यांचा सत्कार केला. दवणे यांचे चिरंजीव प्रशिक दवणे हेही सिव्हिल इंजिनिअर आहेत. या संघर्षशील कुटुंबात सर्वच उच्चविद्याविभूषित आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. कदम यांनी अशोक दवणे यांची छोटी मुलाखत घेतली. विचारलेल्या सर्वच प्रश्नांना दवणे यांनी सडेतोड उत्तरे दिली. यातून प्रा. दवणे यांच्या अनन्यसाधारण कार्याचे अंतरंग उलगडले. दोन दिग्गज साहित्यिकांमध्ये ही मैफल जवळपास एक तास रंगली होती.
‘महामानव’ या महाकाव्यग्रंथाचे ३६ जिल्ह्यांत एकाचवेळी प्रकाशन
यावेळी बोलतांना दवणे म्हणाले की, आंबेडकरी कविता माझ्या डोक्यात सतत खेळत असते. त्यातूनच एक नवी संकल्पना सुचली. महाराष्ट्रातील नव्या जुन्या कविंच्या तब्बल २०२१ कवितांचा महामानव हा संग्रह निर्माण झाला आहे. तो आता प्रकाशनासाठी सिद्ध आहे. मी हे व्यवसाय म्हणून करीत नाही, केवळ सामाजिक बांधिलकीच्या नात्याने करतो. येत्या काही दिवसांतच महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून महामानव या महाग्रंथाचे एकाच वेळी प्रकाशन होणार आहे. राज्य सरकारने तसेच भारतातील विद्यापीठांनी याची दखल घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. ‘
Leave a Reply