नांदेड – इंग्रज सरकारचा एकछत्री अंमल आणि इंग्रजी शिक्षणामुळे आलेला परिवर्तनवादी पाश्चिमात्य विचार यांच्यामुळे स्वातंत्र्यपूर्व भारतीय समाजात वैचारिक घुसळणीला सुरुवात झाली होती. केवळ सामान्य जनताच नाही तर संस्थानिक सुद्धा यामुळे प्रभावित झाले होते. याचाच परिणाम म्हणून लहान मोठे राजे आणि संस्थानिकांनी आपापल्या संस्थानात लोकाभिमुख सुधारणा राबवायला सुरुवात केली होती. महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानाचे राजे राजर्षी शाहू महाराज यात आघाडीवर होते. जाती निर्मूलनाच्या चळवळीला बळ देत त्यांनी ब्राम्हण्यप्रेरित विषमतेवर थेट हल्ला चढवला. वेदोक्त प्रकरणात त्यांनी अवैदिकांची बाजू घेत समतेचा लढा अधिक मजबूत केला म्हणून राजर्षी शाहू हे समतेच्या लढ्यातील थोर योद्धे होते ,असे प्रतिपादन आंबेडकरी कवी प्रशांत वंजारे यांनी केले. ते अ. भा. तांडा सुधार समिती द्वारा आयोजित लाखा बंजारा, राजर्षी शाहू महाराज आणि वसंतराव नाईक यांच्या संयुक्त जयंती निमित्त चार दिवशीय ऑनलाईन व्याख्यानमालेच्या समारोपीय सत्रात मुख्य वक्ते म्हणून बोलत होते.
‘ राजर्षी शाहू महाराज यांचे आरक्षणविषयक धोरण आणि आरक्षणाची सद्यस्थिती’ या विषयावर बोलतांना प्रशांत वंजारे पुढे म्हणाले की, ‘ आरक्षण’ या संवैधानिक वास्तवाचा कोणताही अभ्यास नसतांना अनेक जाती आणि त्या जातींचे तथाकथित पुढारी आरक्षण मागणीच्या नावाखाली शासन आणि जनतेला वेठीस धरत आहेत. केवळ संख्येच्या भरवशावर आम्ही शासनाला झुकवू आणि आरक्षणाची मागणी पदरात पाडून घेऊ ही दांडगाई आणि मुजोरी अनेक जातीत वाढत चालली आहे. आरक्षणासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा सिद्ध करावा लागतो, आरक्षण हा गरिबी हटाव चा कार्यक्रम नसून प्रतिनिधित्वाचे तत्व आहे, इतके साधे तत्व समजून घेण्याचीही ज्यांची बौद्धिकता नाही त्यांची आरक्षणासाठी चाललेली हाराकिरी लज्जास्पद आहे.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हापासून शासनाने केवळ एका जातीला खुश करण्यासाठी सर्व स्तरातल्या नोकरभरतीवर अघोषित बंदी आणली असून प्रशासनाच्या अनेक विभागात कर्मचारी वर्गाचा अनुशेष दिवसेंदिवस वाढत चालला असून मागासवर्गीय जातींचे विद्यार्थी निराशेतून आत्महत्या करत आहेत. ही महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला धक्का देणारी बाब असून शासनाने तात्काळ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना नोकऱ्यांत समाविष्ट करून न्याय द्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा हे होते तर सहवक्ते म्हणून जसमेरसिंग बंजारा यांनी समयोचित विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पृथ्वीराज चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन सुभाष चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य प्रकाश राठोड नागपूर , डॉ. रमेश राठोड अकोला, श्रीपत राठोड, इंदल पवार, मोहन जाधव, धर्मेंद्र जाधव ,ताराचंद चव्हाण , दत्तराव पवार, धोटू चव्हाण, विलास जाधव , सरदार राठोड यांनी परिश्रम घेतले.
केंद्र आणि राज्यसरकारच्या विविध विभागातील (सचिव, अतिरिक्त सचिव आणि संयुक्त सचिव ) मागासवर्गीय ,विशेषतः अनुसूचित जाती आणि जमातींची संख्या नसल्यागत असून याला सरकारची मागासवर्गीयांप्रती अनुदारता कारणीभूत असल्याचे प्रशांत वंजारे यांनी आकडेवारीसह सांगितले. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे सार्वजनिकक्षेत्रातील नोकऱ्या अत्यंत कमी झाल्या असून शिक्षण गरिबांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. सरकारने सार्वजनिक उद्योग विकायला काढल्यामुळे कल्याणकारी राज्याची संकल्पना नेस्तनाबूत झाली आहे. या अनागोंदीतून बाहेर पडायचे असेल तर संविधानाचा शास्त्र आणि शस्त्र म्हणून वापर करावा असे आव्हान त्यांनी यावेळी केले.
Leave a Reply