ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राखी म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन

August 19, 202116:50 PM 89 0 1

राखी म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी आपली भारतीय संस्कृती आहे. स्त्री समानतेची पोकळ भाषा बोलणार्‍या सुधारकांना किंवा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्‍यांना नम्रतापूर्वक सांगितले पाहिजे, की भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे.


‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:’
जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे मनूने म्हटले आहे. स्त्रीकडे भोगाच्या दृष्टीकोनाऐवजी पवित्र दृष्टीने, आई, बहिणीच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी भारतीय संस्कृती आहे.
रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण! बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. राखी बांधणार्‍या बहिणीकडे तो विकृत नजरेने पाहत नाही. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. मात्र आज तिची मस्करी करणार्‍या आणि जनावरांप्रमाणे वागणूक देणार्‍या भावांना समजावून सांगण्याची गरज आहे.
बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणार्‍या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्‍या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो.
भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून मदनाला भस्म केले होते. त्याप्रमाणे तिसर्‍या डोळ्याच्या रूपात बहिण भावाला आजार, वासना इत्यादी भस्म करण्याची सूचना करते.
बहिण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही, तर सर्व स्त्री जातीच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते, तसेच बाह्य शत्रूपासून आणि अंतर्विकारांपासून आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहो ही भावना पण त्यात असते.
देवासुर संग्रामात देवांच्या विजयासाठी इंद्राणीने हिम्मत हरवलेल्या इंद्राच्या हातात राखी बांधली होती, असे वेदात सां‍गितले आहे. अभिमन्यूच्या सुरक्षेसाठी कुंतीने त्याला राखी बांधली होती आणि आपल्या संरक्षणासाठी राणी कर्मवतीने हुमायूँला राखी पाठवली होती. या राखीमध्ये सुरक्षिततेची भावना होती.
रक्षाबंधन हे सुरक्षिततेचे स्मारक आहे. राखी बांधल्याने एक बंधन आपल्यावर असते. हे बंधन असते ध्येयच्युत न होण्याचे. या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची आठवण राखी देते. राखी बांधताना बहिण भावाचे बंधन किंवा ध्येयाचे रक्षण करण्याची सूचना करते.
” स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा” असा महान संदेश देणार्‍या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवले आहे. अशा सुंदर प्रेम आणि भावबंधनाच्या सणाला कुटूंबापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही. सख्या भावाकडे बहिणीची दृष्टी निर्मळ आणि प्रेमपूर्ण राहील.
समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. सख्ख्या बहिणीने सख्ख्या भावाला राखी बांधण्यापेक्षा समवयस्क एखाद्या बहिणीने दुसर्‍या भावाला राखी बांधल्यास त्यामध्ये शील रक्षणाची जबाबदारी येते. सारांश, रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे, रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे, रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर! भाऊ आणि बहिण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक आहेत हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देन आहे.

सौ.रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *