ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रक्षाबंधन आणि त्यास लागलेले वारसा हक्काचे ग्रहण

August 20, 202115:16 PM 59 0 0

भाऊ बहिणीचे नाते विणणारा रेशीम धागा म्हणजे राखी होय. श्रावण पौर्णिमेला साजरा केला जाणारा सण म्हणजे रक्षाबंधन. पहिली राखी देवाला अर्पण करून, त्यानंतर आपल्याला प्राण वायू देणाऱ्या वृक्षालाही
राखी बांधावी. आणि नंतर मग आपल्या लाडक्या भावाला.
भाऊ-बहिणीचे हे एक अनोखे नाते आहे एकमेकांशी भांडणही आणि शतपटीने तितकेच प्रेमही ते एकमेकांवर करीत असतात. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक मानला जाणारा हा सण म्हणजे “रक्षाबंधन “बहिण या दिवशी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या मनगटावर राखी बांधते,आणि आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन तो तिला देतो. बहिण भावाला राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. सर्व नात्यांमध्ये भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम हे निस्वार्थी, निस्पृह आणि पवित्र असते.


बहिण-भावाला दरवर्षी प्रतीक्षा असते ती श्रावण मासात येणार्‍या या राखी पौर्णिमेची. भावासाठी त्याची खास आवड लक्षात घेऊन बहिणी राखी निवडतात. बहिणीचे लग्न होऊन ती दूर राहत असेल किंवा भाऊ शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त घरापासून दूर असेल तर राखी वेळेवर पोचण्यासाठी तिची धडपड सुरू असते.भावाचे ही तसेच असते आपल्या लाडक्या बहिणीसाठी यावर्षी काय भेट घ्यायची याच्या विचारात तो सतत असतो व त्यामुळे त्यासाठी सर्व दुकाने पालथी घालतो. हा सर्व आटापिटा झाल्यावर मग तो भाग्याचा दिवस उजाडतो.राखी बांधण्यासाठी बहिण सासरहुन माहेरी येते तेव्हा लहानपणापासून चे मोठे होईपर्यंतचे घडलेल्या क्षणांची आठवण याच सणाला होत असते.या दोघांच्या नात्यातील भावविश्व खऱ्या अर्थाने याच दिवशी व्यक्त होत असते.लहान मोठे होईपर्यंत भांडण, खोड्या,खेळणं ,बागडणं, अभ्यास सर्व एकत्रच होत असते. लहानपणीच्या भातुकलीच्या खेळातील इवल्याशा चुलीवरचा तो गरमागरम चहा ,आणि तव्यावरील ती भाकरी म्हणजे बहीण आणि वितभर बॅटने फुटभर अंतरावर मारलेला तो बॉण्ड्री वरील बॉल मोठ्या तोऱ्यात सिक्सर मारला, अशी फुशारकी मारणारा भाऊ असतो.भावाचा चेहरा वाचणारी ती बहीण असते. तर आपली स्वतःची गरज तूर्तास बाजूला ठेवून तिची आवड जपणारा तो भाऊ असतो. आई-वडिलांच्या प्रेमानंतर खरे प्रेमाचे नाते कोणाचे असेल तर ते बहिण-भावाचेच. विश्वास, आदर त्यागाच्या पायावर उभे असलेले हे नाते. बंधू राजाला राखी बांधत असताना जो मूक संवाद सुरू असतो तो म्हणजे “माझ्या भावा तुला यश, कीर्ती, प्रताप मिळो, तु कर्तृत्ववान हो किर्तीवंत हो ” अशी तिची मनोमन इच्छा असते तर भावाच्या मनात त्याच वेळी असं चालू असते की “तू काळजी करू नकोस तुझ्या अडचणीत व संकटसमयी मी धावून येणार आहे .” बहीण -भाऊ दूर असले तरी बहिण फोन करून राखी मिळाली का? विचारायला कधीच विसरत नाही. भाऊ देखील तीच्या राखीची वाट पहातच असतो. बहिणीने जरी पोस्टाने राखी पाठवली असली तरी, रक्षाबंधनाच्या दिवशी तिने पाठवलेली राखी मनगटावर मिरवण्याची ऐट काही औरच असते त्याची.


आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करण्याची संस्कृती जपली जाते.राखी बांधणार्‍या बहिणीकडे कधी विकृत दृष्टीने पाहिले जात नाही. समाजात आपली बहिण ताठमानेने जगावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी भावाची असते.समस्त स्त्री जातीच्या संरक्षणासाठी, तसेच बाहेरील शत्रू पासून व अंतर विकारांपासून आपला भाऊ विजयी होवो, सुरक्षित राहो. ही भावना त्या पाठीमागची आहे. स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा असा महान संदेश सांगणारा हा सण आपल्या कुटुंबा पुरताच मर्यादित न ठेवता समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची आज
गरज आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात लहानपणीच्या चिंचा, बोरांचा वाद , आईच्या जवळ झोपण्याचा हट्ट यावरून होणारी भांडणे,पण हीच लहानपणीची भांडणे मोठे झाल्यावर एखाद्या वेगळ्या वळणावर येऊन पोहोचतील असे वाटलच नव्हते. भाऊ-बहिणीच्या नात्यातील अनोखेपण, अल्लडपण, अन हे अतुट बंध कथी हातातून निसटून जाऊ लागले हे कळलेच नाही. याला कारण माणसाने केलेली प्रगती, विविध क्षेत्रातील स्पर्धा, औद्योगीकरण, कारखानदारी, विमानतळ ,विस्तारीकरण, सिडको या कारणाने जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. कोणत्या न कोणत्या कारणावरून भु- संपादन झाल्याने करोडो रुपयांच्या उलाढाली होत आहेत घराघरात पैशांचा पुर आला आहे. आणि इथेच माशी शिंकली.
बहिणाबाई आई-वडीलांच्या इस्टेट मध्ये समान हक्क प्राप्त झाल्याने पैसे वाटप करताना भावा बहिणीं तील या रेशीम धाग्यातील प्रेमाच्या नात्यात दुरावा निर्माण झाला बहिणीची मुले देखील अर्थात भाचे कंपनी देखील आपल्या लाडक्या मामा वर गुरगुर करायला लागली आहेत. जावईबापूंचाही तोरा वाढला आणि जमिनीच्या वाटपावर हरकती घेतल्या गेल्या. आणि या वादात भावा-बहिणीची समजूत घालताना सरकारी अधिकाऱ्यांनाही नकोनकोसे झाले आहे समजुती साठी विनंती सूचना आदेश देऊनही नात्यातील दुरावा काही संपेना. आणि मग शेवटी कायद्याचा हातोडा उचलावा लागत आहे लाखों रुपयांचा खर्च होत आहे.या वादात हातातोंडाशी आलेला घास मात्र न्यायदेवतेच्या तावडीत अडकून रहात आहे. आणि आपलाच लहानगा भाऊ जो बाजारात गेल्यावर, ताईचा हात सोडीत नसे. तोच हात या वादात कधी सुटला तेही समजले नाही.
आज रक्षाबंधन म्हणजे आजचा दिवस सासुरवाशिणीनी माहेरी रक्षाबंधनासाठी जाण्याचा. पण हीच माहेरवाशीण या वादाने कायमचीच सासुरवाशीन कधी झाली हेही कळले नाही आणि हे एक कटू सत्य आहे. रक्षाबंधनाचा हा पारंपरिक, संस्कृती जपण्याचा सण या अशा भांडणातून लोप होईल की काय? अशी भीती आजकाल वाटू लागली आहे. एकाचआईच्या पोटी जन्माला आलेली भावंडे काळ्याआईच्या लोभापायी विभक्त झाले आहेत. आणि हा राखीचा पवित्र रेशमी धागा अगदीच कमकुवत झाला आहे.
लहानपणी भातुकलीचा खेळ मांडायचा तेव्हा लहानग्या भावाला खेळण्यातील तो खोटाखोटा खाऊचा वाटा पहिल्यांदा काढणारी बहीण, आज तिचा भाऊ बाजारात भेटला, दिसला तरी पाठ फिरवित आहे.
अस असले तरी “तुझ माझ जमेना आणि तुझ्या वाचून करमेना” अस खास नात म्हणजेच भाऊ-बहिणीचे होय .रूसवे,फुगवे अन सोबत कधी कधी हाणामारीही होत असते. तर दुसरीकडे आई-बाबा रागावल्यावर जवळचं वाटणारं आपल्याला समजून घेणारे, आणि आपल्या पाठीशी उभे राहणारे नातं म्हणजे भाऊ-बहिणीचे. सुखदुःखात व प्रसंगात सगळ्यात जवळचे, निखळ ,निस्वार्थी प्रेमाच्या संबंधांची परंपरा जपणारा कौटुंबिक सण म्हणजेच रक्षाबंधन. भाऊ-बहीण परस्परात प्रेरक, पूरक,आणि पोषक आहेत असा संदेश देणारा हा सण म्हणजे भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा होय.

सौ. तृप्ती भोईर
९१६७५८१६६०

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *