अलिबाग : पेण येथील मळेघरवाडी येथे एका तीन वर्षांच्या बालिकेची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की शहरातील पेण प्रायव्हेट हायस्कूल शाळे नजीक असलेल्या मळेघरवाडी या आदिवासी वाडीत पीडित चिमुरडी व तिचे कुटुंबीय राहत होती. मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास आरोपी आदेश मधुकर पाटील हा सदर चिमुरडी रहात असलेल्या झोपडी जवळ गेला. या आदिवासी कुटुंबीयांच्या झोपडीला दार नसल्याचा फायदा घेऊन त्याने घरात झोपलेल्या मुलीला उचलून नेले. त्यानंतर सुमारे दोनशे मीटर अंतरावर नेऊन तीच्यावर बलात्कार केला, नंतर तीची हत्याकरून मृतदेह आदिवासी वाडीवर आणून टाकला. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी तातडीने पाऊ ल उचलत एका आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरु आहे.
प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक अशोक दुधे आणि अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ यांनी घटना स्थळाला भेट दिली. गुन्ह्यच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली. दरम्यान या गुन्ह्यत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीवर यापुर्वीही अशाच स्वरुपाचे गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर सुटला असल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेनंतर पेण परिसरात संतापाचे वातावरण आहे. आदिवासी समाज आणि सामाजिक कार्यकर्त्यांंनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी गुन्ह्यची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी आणि रोहा तांबडी येथील प्रकरणाप्रमाणे याही गुन्ह्यत विशेष सरकारी वकीलांची नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी केली आहे.
पेणच्या बालिका अत्याचारप्रकरणी खटला जलदगती न्यायालयात चालविणार – आदिती तटकरे
अलिबाग : पेण येथील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीविरोधातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार असल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पेण येथे दिली. मंगळवारी दुपारी त्यांनी पेण येथे पीडित बालिकेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊ न त्यांना धीर दिला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणे गरजेचे असून हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासंबधी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते व रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांना दिल्या. तर पीडितेच्या कुटुंबियांना या घटनेतून सावरण्यासाठी समुपदेशन होणे गरजेचे आहे, शासनाच्या मनोधैर्य योजनेतून पीडित बालिकेच्या कुटुंबाला तात्काळ मदत करण्याचे आदेशही त्यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना दिले.
Leave a Reply