ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोरोनापासुन सुरक्षिततेसाठी लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवा – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

May 2, 202215:19 PM 35 0 0

जालना :- सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अजूनही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटातून मुक्त होऊन सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने कोव्हीड अनुषंगिक वर्तणुकीचे पालन करण्याबरोबरच कोव्हीड प्रतिबंधात्मक लस घेऊन लसीकरणाच्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले. महाराष्ट्र दिनाच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. त्याप्रसंगी जनतेला उद्देशुन शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते.
याप्रसंगी माजी आमदार अर्जूनराव खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शर्मिला भोसले, उपजिल्हा निवडणुक अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, जिल्हा शल्य‍ चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, प्रशांत पडघन आदींची उपस्थिती होती.
कोरोनापासुन सुरक्षिततेसाठी लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवा
पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, गत दोन वर्षात कोरोना महामारीच्या काळात संघर्ष करत या महामारीतून मुक्त होण्यासाठी सर्वांनी मोठा लढा दिला. आजघडीला कमी झालेला कोरोनाचा आलेख काही प्रमाणात वाढत असल्याने या संकटातुन मुक्त होऊन सर्वांना सुरक्षित रहाण्यासाठी कोव्हीड प्रतिबंधात्मक लस प्रत्येकाने टोचुन घेणे गरजेचे आहे. १२ ते 15 तसेच 15 ते 17 आणि १८ वर्षावरील प्रत्येक लाभार्थ्यानी कोरोनापासुन सुरक्षित राहण्यासाठी लस टोचुन घ्यावी. 6 ते 12 वयोगटातील लाभार्थ्यांना लस देण्याची मुभा भारत सरकारने दिली असुन प्रत्येक पालकाने आपल्या पात्र पाल्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता टोचुन घेत या संकटापासुन सुरक्षित राहण्यासाठी प्राधान्याने लस टोचुन घेण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केले.
जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी
जालना जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या मिळाव्यात यासाठी आरोग्य क्षेत्रात भरीव काम केले असल्याचे सांगत पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, जिल्हा सामान्य रुग्णालयात खासगी रुग्णालयाच्या तोडीच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येऊन अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रियागृह, ऑक्सिजन प्लँट आदींसह जिल्हा सामान्य रुग्णालयाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम करण्यात आले आहे. केवळ जिल्ह्याच्या ठिकाणीच नव्हे तर तालुका व ग्रामीण स्तरावरही आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी खाटांच्या क्षमतेमध्ये वृद्धी, आवश्यक साधनसामुग्री, मनुष्यबळ, रुग्णवाहिका आदी सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. महानगरामध्ये असलेल्या खासगी रुग्णालयांतील स्वच्छतेच्या बरोबरीने जिल्ह्यातील सर्व ग्रामीण, जिल्हा रुग्णालय तसेच महिला रुग्णालयातील स्वच्छतेचा दर्जा अधिक प्रमाणात सुधारावा यासाठी विशेष निधी मंजूर करुन स्वच्छतेचे काम करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.
जालन्यात कँसर युनिट व कॅथलॅब उभारणीस मंजुरी
कर्करोगग्रस्त रुग्णांना उपचारासाठी महानगरामध्ये जावे लागते. जालना जिल्ह्यातील रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी जालना जिल्ह्यासाठी कँसर युनिट मंजुरीचा नुकताच निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या सुविधेमुळे रुग्णांची वेळेत तपासणी तसेच उपचार घेणे सोईचे होणार आहे. आजघडीला हृदयाच्याबाबतीतल्या अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. हृदयाच्याबाबतीतल्या सर्व तपासण्या मोफत स्वरूपात उपलब्ध व्हाव्यात यासाठी जालना येथे कॅथलॅब उभारणीसाठीही मंजुरी मिळाली असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.
शिक्षण व्यवस्था अधिक दर्जेदार करण्यावर भर
आरोग्याबरोबरच शिक्षणही तेवढेच महत्वाचे आहे. जालना जिल्ह्यात शिक्षण व्यवस्था अधिक चांगली व दर्जेदार करण्यावरही भर देण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र वर्ग व्हावा व मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभागाव्यतिरिक्त जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातुन अधिकचा निधी मंजूर करुन शाळाखोल्यांची उभारणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील बेरोजगारांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षणही देण्यात येत असुन मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम या योजनेतुन आरोग्य क्षेत्रात काम करण्यास पात्रताधारक व इच्छुक असलेल्या युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात आवश्यक असलेल्या कौशल्ययुक्त मनुष्यबळासाठी अधिकाधिक प्रशिक्षण सत्रांची सुरुवात करण्यात यावी. शासनामार्फत या प्रशिक्षण सत्रांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाहीही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिली.
मागासप्रवर्गातील लाभार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध योजनांच्या माध्यमातुन काम करण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकही मागासवर्गीय घरापासुन वंचित राहू नये तसेच प्रत्येकाला त्याच्या स्वत:चे व हक्काचे घर मिळावे यासाठी चालू वर्षात राज्यात सर्वाधिक म्हणजेच 11 हजार 600 घरकुले मंजूर करुन घेण्यात आली आहेत. तसेच मागासवर्गीयांसाठी विविध महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, सफाई कामगारांसाठी हिताच्या योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना, ज्येष्ठ नागरीकांसाठी मातोश्री वृद्धाश्रम योजना, कन्यादान योजनेंतर्गत सामुहिक विवाह सोहळा योजना आणि बार्टीचे विविध मोफत प्रशिक्षण कार्यक्रम यासह इतर योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहनही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषि विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी
भारत हा कृषिप्रधान देश आहे. राज्यासह जिल्ह्याचे अर्थकारण शेतीवरच अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना राबविण्यात येत असल्याचे सांगत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 363 गावांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातुन 50 हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात येऊन 343 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला आहे. या योजनेत जालना जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. शेतातील पिकांना योग्यवेळी बाजारात नेण्यास या रस्त्यांमुळे मदत होणार असल्याने राज्य शासनाने मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना सुरु केली आहे. जालना जिल्ह्यात या योजनेंतर्गत 993 रस्ते मंजुर झाले असुन या रस्त्यांची कामे तातडीने पुर्ण करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषि विभागाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी समन्वयाने तसेच एकदिलाने काम करण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले.
जलजीवन मिशन अंतर्गत सर्व गावे, वाड्या-वस्त्यांना प्रतिदिन ५५ लिटर दरडोईनुसार पाणी पुरवठा करण्याचे राष्ट्रीय धोरण असुन या अंतर्गत जिल्ह्यातील 629 गावांचा समावेश करण्यात आला आहे. ही कामेही वेगाने केली जाणार आहेत.
सामाजिक न्याय विभागाच्या स्टॉलचा शुभारंभ
सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यादृष्टीने उभारण्यात आलेल्या स्टॉलचा शुभारंभ पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवरांसह समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमित घवले उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री टोपे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक,नागरिक, पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
यावेळी चंदीगड येथे अश्वारोहन स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने प्रथम पुरस्कार प्राप्त करत सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पदक बहाल करण्यात आले. तसेच पोलीस दलातील विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच कोव्हीड19 मध्ये कर्तव्य बजावत असताना मृत्यू पावलेल्या श्रीमती नलिनी उमाकांत पुरी यांच्या वारसांना 50 लक्ष रुपयांचा धनादेशही पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *