मुंबई दि. १६(विदया निकाळजे) : सुप्रसिद्ध गीतकार, कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून अलिकडेच ‘परीसस्पर्श शांताईचा’ या ईबुकचे प्रकाशन मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या सुप्रसिद्ध निवेदिका दीपाली केळकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन कार्यक्रम संपन्न झाला. महाराष्ट्रातील नवोदित, प्रथितयश कवी- कवयित्रींना *’ साहित्यजननी शांताबाई शेळके ‘* असा विषय देऊन काव्यरचनेचे आवाहन केले. त्यातून सोळा कवितांची निवड करून शांताबाई यांच्या जीवनासंबंधीची कविता आणि कवी- कवयित्रींचा परिचय आणि त्या कवितांचे सादरीकरण कवी- कवयित्रींच्या स्वतःच्याच आवाजात रेकॉर्ड करून ईबुक निर्मिती करून शांताबाई शेळके यांना आगळीवेगळी मानवंदना देण्यात आली. यात महाराष्ट्रातील सौ.सुनीता प्रकाश वाणी, सौ.शुभांगी रामचंद्र शामत, सौ.सुनीता शशिकांत गोळे, सौ.रुपश्री हृषीकेश वनारसे, सौ.अनघा अनिल साळवी, श्री.विठ्ठलराव महिपती कुसाळे, श्री.गणेश रामदास निकम, श्री.प्रदीप महादेव कासुर्डे, सौ.शलाका मकरंद काळकर, श्रीमती पूनम पुरुषोत्तम राणे, सौ.तेजश्री गजानन कुलकर्णी, सौ.स्वाती मकरंद कुलकर्णी, सौ.निर्मला श्रीनिवास देऊस्कर, सौ.सीमा हिंदूराव मुळीक, सौ.अनघा संजय जाधव, सौ.अंजली अशोक धर्माधिकारी यांचा समावेश आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा दीपाली केळकर यांनी शांताबाईंच्या अलौकिक कार्याला उजाळा दिला. स्त्रीचा आत्मस्वर ओव्या, उखाणे, पारंपरिक गीते, म्हणी यांद्वारे व्यक्त होताना शांताबाईंच्या योगदानाविषयी सांगून सह्याद्री वाहिनीवरील आठवणीतील ठेवा असणाऱ्या ‘ रानजाई ‘ मालिकेतील डॉ. सरोजिनी बाबर आणि शांताबाई यांच्या सहज, रसाळ संवादाचे स्मरण करून दिले. शांताबाईंबद्दल प्रत्येक मराठी माणसाच्या मनात असलेला आदर, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, आत्मियता याबद्दल सांगून त्यांच्या व्यक्तित्त्वाचा मोठेपणा अधोरेखित केला. या ई-बुक, व्हिडिओ निर्मिती उपक्रमाच्या प्रमुख संगिता अनिल पाटील यांनी प्रास्ताविक करून राज्यभरातील सहभागी कवी- कवयित्रींचे कौतुक केले. तर संयोजिका पूनम राणे यांनी शांताबाईंचे कार्य याविषयी माहिती दिली. प्रस्तावना मार्गदर्शक विठ्ठल कुसाळे यांनी लिहिली. मुखपृष्ठ अर्जुन माचिवले यांनी रेखाटले तर तंत्रस्नेही अमोल जाधव यांनी तांत्रिक सहकार्य करून ऑनलाइन कार्यक्रम संपन्न केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा जाधव यांनी केले. याप्रसंगी सर्व सहभागी कवी- कवयित्रींना ऑनलाइन सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
Leave a Reply