ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक दंगली घडवून आणल्या जातात – डॉ. अनमोल शेंडे

December 9, 202113:37 PM 63 0 0

नांदेड – भारतात निवडणुका तोंडावर आल्या की जातीय धार्मिक दंगली घडवून आणल्या जातात. परिस्थिती शांत झालेली असताना तथाकथित राजकीय पक्षाकडून जाणीवपूर्वक चिथावणी दिली जाते. परिस्थिती चिघळवून धार्मिक विद्वेष कसा पसरवता येईल यासाठी प्रयत्न केले जातात. राजकीय स्वार्थासाठी दंगली भडकावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जातो. आता निवडणुक ही दंगलीची प्रयोगशाळा मानली जात आहे, असा गंभीर आरोप देशाच्या राजकीय व्यवस्थेवर प्रख्यात आंबेडकरी चिकित्सक प्रा. डॉ. अनमोल शेंडे यांनी आॅनलाईन पद्धतीने व्याख्यानमालेतून केला आहे. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चार दिवसांच्या व्याख्यानमालेचे संविधान सत्र आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी ‘संविधानाला अभिप्रेत भारत’ या विषयावर डॉ. शेंडे यांनी विचार मांडले. यावेळी व्याख्यानमालेचे निमंत्रक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे, महामंडळाचे उपाध्यक्ष मधू बावलकर, संजय मोखडे, अमृत बनसोड, भैय्यासाहेब गोडबोले, मारोती कदम, सज्जन बरडे, साहेबराव पाईकराव, किशनराव पतंगे, साऊल झोटे, विजय हिवाळे, महादेव मेश्राम, वनिता इंगोले, अमोल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. शेंडे म्हणाले की, चुकीची माणसं राजकारणात आली. संविधानाला अभिप्रेत भारत घडू शकला नाही. व्यवसाय म्हणून राजकारणाकडे पाहिले. राजकारणात असलेल्यांनी खरोखरच भारतीय राज्यघटना वाचली आहे का ? आणि वाचली असेल तर संविधानातील तत्वे त्यांनी राजकीय जीवनात अमंलात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत का? हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. या देशाचा चेहरा पाहिजे तसा निरोगी होऊ शकला नाही. देशाचा विकास पाहिजे तसा होऊ शकला नाही. संविधानाला अभिप्रेत असलेला भारत घडविण्याच्या प्रक्रियेला आत्तापर्यंतच्या राजकारण्यांनी बगल दिली आहे, हेच दिसून येते. संविधानातील मार्गदर्शक तत्वांना देशाचे सशक्त धोरण न बनविता त्यात पळवाटाच अधिक ठेवल्या. या तत्वांना डावलूनच राजकारण केलं. बहुसंख्य लोकांना राजकारणापासून वंचित ठेवून काही मूठभर लोकांनी सत्तेची केंद्रे हाती घेतलेली आपणास दिसतात, याबाबतचे विवेचन त्यांनी केले. या देशाला चांगलं वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर बहुसंख्याकांचे राजकारण होणे आवश्यक आहे. देशात अनेक जाती धर्म आहेत. काही लोकांना हे राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून पुढे आणायचे आहे. त्यापद्धतीने त्यांचे षडयंत्र सुरू असते. ते संविधानाला बाजूला सारून भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता घेण्याची मागणी करीत असतात. आपल्या देशातील लोकशाही ही सर्वश्रेष्ठ अशी आहे परंतु लोकशाहीचा निर्देशांक नव्वदाव्या क्रमांकावर असून जागतिक पातळीवरील ही घसरण लोकशाहीला ठोकशाहीत रुपांतर करण्यास पुरेशी आहे, हे नाकारता येत नाही. म्हणून लोकशाही कागदावर आणि भाषणातच आहे. लोकशाही प्रत्यक्ष दिसत नाही. ती दिसावी असे वाटत असेल तर सर्वांनाच तो आधी तसा विचार करावा वाटला पाहिजे.

ज्यांच्या हाती राजकीय सत्ता आहे ते न्यायव्यवस्थेवर अंकुश ठेवत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय न मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकीय सत्तेच्या माध्यमातून चुकीचच घडत आहे. लोकशाहीचं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं पतन होत असेल तर संविधानाला अभिप्रेत आपण घडवून शकत नाही. आपला देश वाईट अवस्थेतून जात आहे. लेखक विचारवंत भयभीत झालेला आहे. म्हणून विचित्र गर्तेत देश सापडला आहे. जातीयतेच्या, धर्माच्या नावाखाली दंगली घडवून आणल्या जातात. अंधश्रद्धा मजबूत करण्यासाठी प्रयत्न राजरोसपणे केले केले जातात. या देशाने समतेकडे वाटचाल करु नये, समतावादी विचार या देशात फैलावू नयेत यासाठी प्रयत्न केले जातात. सर्व सामान्य लोकांच्या हातात जाऊच नयेत यासाठीची तजवीज आधीच करुन ठेवली जाते. राजसत्तेचे दोर सराईतपणे कापून काढले जातात. या देशात शेतकऱ्यांचे, तरुणांचे, विद्यार्थ्यांचे, सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत. याचेही राजकारण केले जाते. या देशाची सत्तासूत्रे मूठभर भांडवलवादी लोकांच्या हातात गेलेली आहेत. आजच्या सत्ताधिशांचे स्पष्ट कथन आहे की आम्ही संविधान बदलण्यासाठीच सत्तेत आलो आहोत. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला एकीचं बळ दाखवावं लागेल. संविधाननिष्ठ चळवळीची गरज आहे. संविधानाला अभिप्रेत असलेला भारत निर्माण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावे लागतील. अन्यथा पुढील येणारा काळ कठीणच आहे, याबाबत त्यांनी आश्वस्त केले.
विरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा
व्याख्यानमालेदरम्यान डॉ. शेंडे यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीकडे लक्ष वेधले. माॅब लिंचिग, देशद्रोहाची व्याख्या अशा काही घटनांमुळे देशाची प्रतिमा मलीन झाली आहे. सत्तेच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या, विरोध करणाऱ्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जात आहे. मोठे चोर देश सोडून जात आहेत तर छोट्या चोरांचे शुद्धीकरण केले जात आहे. न्याय्य मागण्यासाठी महिनोन्महिने आंदोलन करावे लागते.‌ सत्य बोलणाऱ्यांना तुरुंगात डांबले जात आहे. त्याला देशद्रोही ठरवले जात आहे. तर स्वातंत्र्यालाच बदनाम करणाऱ्यांना, सत्तेचे लांगूलचालन करणाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत‌ आहे. अशी विचित्र परिस्थिती देशात निर्माण झाली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *