सातारा हिरकणी टीम….
सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक बँक लि.सातारा ही प्राथमिक शिक्षकांच्या मध्ये लोकप्रिय असणारी बँक असून या बँकेच्या माध्यमातून अनेकांनी आपले स्वप्न साकार केली आहेत.ही बँक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असून या बँकेच्या भोंगळ कारभाराचे ज्वलंत उदाहरण नुकतेच उघडकीस आले आहे. यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने शिक्षक बँकेला दोन लाखांचा दंड ठोठावला असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक किरण यादव,चंद्रकांत मोरे,सुभाष शेवाळे,शिवाजी शिंदे यांनी दिली आहे.
दिनांक 1 सप्टेंबर 2021 रोजी रिझर्व बँकेने प्रकाशित केलेल्या प्रेस नोट मध्ये याबाबत सभासदांना प्रत्यक्ष माहिती घेता येईल. रिझर्व बँकेने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने सदरचा दंड प्राथमिक शिक्षक बँकेला ठोठावला आहे. सत्ताधारी चेअरमन यांच्या कार्यकाळातील 31 मार्च 2019 च्या रिझर्व्ह बँकेच्या तपासणीत सदरच्या अनियमित कारभारावर ठपका ठेवण्यात आला आहे. या बाबतची कारणे दाखवा नोटीस बँकेला यापूर्वीच प्राप्त झाली असून बँकेने दिलेले उत्तर रिझर्व बँक ऑफ इंडियाने फेटाळून लावले आहे आणि शिक्षक बँकेला दोन लाख रुपये दंड भरण्याची नोटीस पाठवली आहे.
समाजात व शिक्षकांच्या मनात शिक्षक बँकेविषयी चांगली आदराची भावना असताना अशा प्रकारचा दंड बँकेला होणे ही खेदजनक बाब असल्याने सत्ताधारी चेअरमन व संचालक यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. शिक्षक बँकेला दंड झाल्याने सभासद यांच्या भोंगळ कारभाराविषयी सभासदात चर्चा सुरू झाली आहे. भ्रष्ट, अनियमित, भोंगळ कारभाराला आळा घालण्याची गरज निर्माण झाल्याचे सभासदांचे म्हणणे आहे.
Leave a Reply