जालना :- शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करत असुन अतिवृष्टीमुळे जुन महिन्यात शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी मदत म्हणुन पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 350 कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया वेगात सुरु असुन दुसऱ्या टप्प्यात 3 हजार 600 कोटी रुपयांचा निधी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृषि आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, माजी राज्यमंत्री अर्जूनराव खोतकर,आमदार नारायण कुचे ,माजी आमदार संतोष सांबरे, भास्कर आंबेकर , ए.जे.बोराडे, पंडीतराव भुतेकर,अभिमन्यू खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल,भाऊसाहेब घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. दिनकर जाधव, जिल्हा कृषी अधिकारी भिमराव रणदिवे आदींची उपस्थिती होती.
कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले, शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करत असुन राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांच्या झालेल्या मदतीपोटी जिरायतसाठी 10 हजार रुपये प्रतिहेक्टर, बागायतसाठी 15 हजार रुपये तर फळबागांच्या नुकसानीसाठी 25 हजार रुपये प्रतिहेक्टर देण्याचा शासनाने निर्णय घेतला असुन जुन या महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी पहिल्या टप्प्यात 350 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया वेगात सुरु असुन दुसऱ्या टप्प्यात 3 हजार 600 कोटी रुपयांचा निधी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे सांगत पंचनाम्याची माहिती शासनास जशा प्रमाणात प्राप्त होईल, त्याप्रमाणात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातुन नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजना राबविण्यात येत असुन या योजनेंतर्गत सामुहिक शेततळयांना शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असुन येणाऱ्या काळात सामुहिक शेततळे योजनेस प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे सांगत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन अस्तरीकरणाचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचेही कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांना लागवडीसाठी पीककर्जाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांना कमी प्रमाणात पीककर्ज मिळाले असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असुन याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांचा आढावा घेण्याची सुचनाही त्यांनी यावेळी केली. सोयाबीन पिकांचे वाणांची उंची वाढुन शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात फायदा मिळावा यासाठी कृषी विद्यापिठाच्या मदतीने सोयाबीण पिकाचे वाण विकसित करण्याबाबत प्रयत्नशिल असल्याचे सांगत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत प्राप्त झालेले प्रस्ताव तपासणी करुन शासनाकडे तातडीने पाठविण्यात यावेत. जिल्ह्यात पीककापणीचे प्रयोग काटेकोरपणे करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तत्पूर्वी कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्य पीक प्रात्यक्षिक बियाण्यांचे (हरभरा) प्रातिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात आले. तसेच बांधावर खते वाटप अभियानाचा शुभारंभ हिरवी झेंडी दाखवुन करण्यात आला.
Leave a Reply