ये ग….ये ग विठाबाई, धरीला पंढरीचा चोर अशी भक्ती गीते
ऐकत ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो. स्त्री म्हणजे आधीच भावनाशील असते त्यात ती अध्यात्मिक विचारधारेची
असेल तर तिचं सगळ भावविश्व लडिवाळ होत ईश्वर चरणी लीनहोते.संत साहित्यात स्त्रियांचे अढळ स्थान आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींचे गुणगान करणार्या वारकरी संप्रदायातील महत्त्वाची संत कवयित्री म्हणजे संत जनाबाई. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. जनाबाईचे अभंगात आर्त भावभक्ती, श्रीविठ्ठल महिमा, नाममाहात्म्य, पंढरीमाहात्म्य, संतगौरव, उपदेश असे विषय आलेले दिसतात.
विठो माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।
निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी।
पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर।
गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जिवा बरोबरी।
बंका कडियेवरी, नामा करांगुली धरी ।
जनी म्हणे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा।
अश्या सर्व संतांना पूजनीय मानणार्या जनाबाई.तात्कालिक बुद्धीवादी
स्त्री सामर्थ्याचे अध्यात्मिक तेचे सामाजिक प्रतिनिधित्व करतात. जन्म संत जनाबाईंचा जन्मकाळ निश्चित नाही. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतमतांतरे आढळतात. संत नामदेवांपेक्षा चार-सहा वर्षांनी त्या मोठ्या असाव्यात, असे एक मत आहे. संत चरित्रकार महिपती असे मानतात की, जनाई नामदेवांपेक्षा दोन-चार वर्षांनी लहान होत्या. संत जनाबाईंचा जन्म परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे झाला.
संत नामदेवाशी संबंध आई-वडिलांसोबत पंढरपूरात आलेली असताना स्वत:च आग्रहाने पंढरपुरात राहिल्या. आई-वडिलांच्या मृत्यूमुळे पोरकी होऊन पंढरपुरात श्रीविठ्ठल मंदिराच्या परिसरात राहू लागल्या. नामदेवाचे वडील दामाशेटी यांनी आपल्या घरी आश्रय दिला. त्यामुळे पुढे आयुष्यभर पडेल ते घरकाम करत दासी म्हणून त्या नामदेवांच्या कुटुंबात वावरल्या, असे सांगितले जाते.
साधारण जनीची असाधारण भक्ती जनीची भक्ती म्हणजे रोजचं काम करता करता देवाचं नाव घेणं. ङ्गदळीता कांडिता तुज गाईन अनंताफफ हे तिचं तत्वज्ञान खेडोपाड्यातील अडाणी माणसांनाही आपलं वाटतं आहे. जनीनं दाखवलेला मलेकुरवाळा विठूरायाफ संसारात रमलेल्या, मुलंबाळं सांभाळणार्या आयाबायांना नेहमीच भावलेला आहे. मनाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावेफ हा जनाबाईचा अभंग गात वारकरी पंढरीची वाट चालतात.
लौकिकातलं अलौकिक भक्तिकाव्य संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत. ङ्गवात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात,फफ तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपान, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत सेना महाराज आदि सत्पुरुषांच्या जीवनाचा, सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत, असे अनेक अभ्यासकांचे मत आहे.त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत. संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी, आषाढ कृष्ण त्रयोदशी शके 1272 या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या.आयुष्यभर नामदेवांच्या भक्तीमार्गाच्या पाऊलखुणांवरून प्रवास करणारी जनाबाई अखेरच्या क्षणीदेखील गुरूची सावली बनून राहिली. इ. स. 1350 मध्ये आषाढ महिन्यात,कृष्ण पक्षात त्रयोदशीच्या मुहूर्तावर नामदेवांनी देह ठेवला. संत जनाबाई देखील त्याच वेळी नामयाच्या पायरीवर विसावून पांडुरंगात विलीन झाली.अभंग, गवळणी, ओव्यांच्या रुपात अजूनही संत जनाबाई खेडोपाड्यांतील घराघरांत जागती आहे.
Leave a Reply