जालना, दि. 22 :- जाफ्राबाद तालुक्यातील बोरगाव बु. येथील रहिवाशी असलेले जवान गणेश श्रीराम फदाट (४३ वर्षे) यांचे ऱ्हदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते.त्यांच्या पार्थिवावर दि. 22 जानेवारी रोजी जाफ्राबाद तालुक्यातील बोरगांव बु. येथे शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बोरगाव येथील ग्रामस्थ व उपस्थितांनी साश्रुनयनांनी गणेश फदाट यांना अखेरचा निरोप दिला.
शहीद जवान गणेश फदाट यांच्या पार्थिवाला त्यांचा मुलगा प्रेम फदाट (वय १४) याने मुखाग्नी दिला. दि. २१ जानेवारी रोजी सिंकदराबाद येथे कर्तव्य बजावत असतांना हदय विकाराच्या झटक्याने गणेश फदाट यांचे निधन झाले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, तहसीलदार सतीश सोनी, सपोनी अभिजीत मोरे, सैन्यदलातील सुभेदार बाळासाहेब बोरकर, विरपिता श्रीराम फदाट, विरमाता फदाट, विरपत्नी अंजली फदाट, विरपुञ प्रेम फदाट, सैन्यदलात कार्यरत असलेले दिनेश फदाट, कुंडलीक मुठ्ठे, सुधाकर दानवे, संतोष लोखंडे, रामधन कळंबे, रमेश गव्हाड, सुरेश दिवटे, सुरेश गवळी, बजरंग बोरसे, दिपक बोऱ्हाडे, राजेश म्हस्के, केशव जंजाळ, ज्ञानेश्वर माऊली, प्रदिप महाराज, माजी सुभेदार तुकाराम फदाट, कैलास जाधव, मार्तंड फदाट, ग्रामसेविका आर.जी. लांडगे, एकनाथ शेवत्रे, विनोद खेडेकर आदींनीही त्यांना पुष्पचर्क अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी गावातून निघालेल्या अंत्ययात्रेत देशभक्तीपर गीते वाजवली जात होती. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘अमर रहे… अमर रहे… शहीद जवान अमर रहे’, या घोषणांनी संपुर्ण आसमंत निनादुन गेला. गणेश फदाट यांच्या राहत्या घरापासून संपुर्ण बोरगांव बु गावातुन मिरवणुक काढण्यात येवुन त्यांचे पार्थिव मारोती मंदीरा समोर आंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. लष्कराच्या सजवलेल्या वाहनातून ही मिरवणूक निघाली. मिरवणुकीत लष्कराचे अधिकारी, जवान, स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. गावात ठिकठिकाणी गणेश फदाट यांना आदरांजली अर्पण करणारे बॅनर लागले होते. अत्यंविधिवेळी तालुक्यातील राजकीय, सामाजीक, शैक्षणिक, कृषी, सैन्यदल, महसुल, पोलीस यासह विविध क्षेञातील अनेक मान्यवर उपस्थीत होते.
Leave a Reply