नांदेड – राजमाता जिजाऊ या अवघ्या महाराष्ट्राला वंदनीय, आदर्श माता आहेत. स्वराज्याचे स्वप्न उरी धरून त्यांनी शिवबांना घडविले. शिक्षण, न्याय, व्यवहारज्ञान, राज्यकारभार असे अनेक गुण आपल्या अपत्याच्या अंगी यावेत यासाठी त्या प्रयत्नरत राहिल्या. स्त्रीच्या खंबीर, निर्धारी रुपाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ. प्रत्येक स्त्रीसाठी जिजाऊ आदर्श आहेत. निर्धार व योग्य पाठबळ यांच्या आधारावर स्त्री कोणत्याही क्षेत्रात सक्षमपणे आपला ठसा उमटवू शकते. जिजाऊंचा विचार एक आदर्श म्हणून शालेय कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांच्या मनात वृद्धिंगत होतो. जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात मुली स्वतःहून जिजाऊचा वेश धारण करून जिजाऊ साकारतात. ‘मी जिजाऊ बोलतेय!’ ही एकांकिका सादर केली जाते. यात गावातील महिलाही सहभागी होऊन सहकार्य करतात. परंतु सध्याच्या काळात या सर्वच आनंदावर विरजण पडले आहे. तरीसुद्धा जिजाऊंच्या पुण्यतिथीच्या दिवशी (ता. १७) या श्रेष्ठ मातेस विनम्र आदरांजली व त्रिवार मानाचा मुजरा करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असतांनाही जवळा या गावातल्या चिमुकल्या रणरागिणी सरसावल्या.
https://indianfast.com/
त्याचे झाले असे की जिजाऊंच्या ३४७ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी जवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ढवळे जी. एस. व शिक्षकांनी राजमाता जिजाऊंचा फोटो सन्मानाने खुर्चीवर ठेवला. त्यावेळी शाळापरिसरातील काही मुलींनी तो पाहिला. त्यानंतर जिजाऊ बद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या शाळेत आल्या. मुख्याध्यापक ढवळे यांनी जिजाऊच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुलींनी जिजाऊ वंदना सादर करुन वातावरण सदग्दीत केले. सर्व मुलींनी जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्प वंदन करून अभिवादन केले. यावेळी दीपाली गोडबोले, अनुष्का झिंझाडे, सोनाली गोडबोले, मुस्कान पठाण श्रावस्ती गच्चे, साक्षी गच्चे, शुभांगी गोडबोले, साक्षी गोडबोले, अक्षरा गोडबोले, निशा गोडबोले, मानसी गोडबोले यांची उपस्थिती होती. यातूनच विद्यार्थ्यांतील जिजाऊंप्रती असलेला आदरभाव व कृतज्ञता व्यक्त होते. या कार्यक्रमासाठी साहेबराव, संभाजी गवारे, संतोष घटकार, शादूल शेख, दीपक शिखरे, अक्षरा शिखरे, शाहेद शेख, पीरखाँ पठाण, तेजल शिखरे, कृष्णा शिखरे, योगेश मठपती, हैदर शेख यांनी मदत केली.
Leave a Reply