ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

काळजातून आरपार घुसणारे स्वकथन : ‘आरपार’

August 4, 202113:52 PM 51 0 0

कमल कदम यांचं ‘आरपार’ हे स्वकथन विविधांगांनी महत्त्वपूर्ण आहे. मराठी साहित्यक्षेत्रात या स्वकथनाचे महत्त्व अन्नन्यसाधारण असेच आहे.आंबेडकरी साहित्यात या स्वकथनाने मोलाची भर टाकलेली आहे.बेबी कांबळे पासून ते उर्मिला पवार यांच्या पर्यंत ही साहित्यपरंपरा दिसते.पण या सर्वात कमल कदम यांचं स्वकथन वेगळे वाटते. या स्वकथनाचे मुखपृष्ठही खूप बोलके आहे.मार्मिक आहे. युगायुगांचा अंधाराला आरपार चिरत हा प्रकाश बुध्दाकडे निघाला आहे.स्ञी स्वकथन म्हणून याकडे बघत आसताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की ही स्त्री भारतीय समाजव्यवस्थेतील दलित स्त्री होय. एक स्त्री म्हणून स्रिच्या वेदना सारख्या असल्या तरी आंबेडकरी स्री म्हणून वाट्याला येणारे दुःख फार वेगळे असते. घरामध्ये वेळ जात नाही म्हणून किंवा चहा पोहे घेत लिहिलेले हे लिखाण नाही तर हे लिखाण म्हणजे आपल्याच दुःखावर आपणच मारलेली फुंकर होय.

 

सामाजिक ,आर्थिक ,धार्मिक आणि शैक्षणिक असे विविध पदर या स्वकथनास लाभलेले आहेत. एकुणच लेखनाची प्रेरणा हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आहेत हे लेखिकेने वारंवार सांगितलेले आहे. बहाद्दरपूरा ते हर्षनगर नांदेड हा प्रवास म्हणावा तेवढा सोपा नव्हता. या स्वकथनातील इतर पात्रेही महत्त्वाची आहेत.त्यातील छैलाबाबू हे पात्र फारच महत्त्वाचे आहे. तसेच माय-बापू, जिज्या, बहिण, शाळा मास्तरीण, विविध प्रशासकीय अधिकारी अशा विविध व्यक्तिरेखा यात येतात. प्रसंगानुरुप लेखन हे अगदी सहजरित्या झालेले दिसून येते. कुठेही अनाठायी शब्द रचना किंवा अतिरंजितपणा आलेला नाही. जन्माला येताच ‘न्हाणीत पुरून टाका’ ही स्री म्हणून वाट्याला आलेली पहिलीच अवहेलना…. डाॅ. बाबासाहेबांच्या चळवळीचे बीज कसे तळागाळापर्यंत कसे पोहचले होते हे जिज्याच्या रुपाने कळते. शिक्षणाचे महत्त्व त्यावेळच्या दलित विशेषतः महार समाजात रूजत होते आणि त्याची सुरवात लेखिकेच्या शिक्षणाने झाली.

शिक्षण चालू असतानाच बालवयातच लग्न झाले. नवऱ्याचा विरोध असुनही शिक्षण चालूच होते. या वाटचालीत खऱ्या अर्थाने तिला साथ लाभली ती बापुची. छैलाबाबूच्या विरोधालाही ते जुमानले नाहीत. मायची भूमिका मात्र पापभिरूच होती. ना अध्यात ना मध्यात. तिचं कुणी कानावरही घेत नव्हते. पण हिच माय वाघिणीसारखी पाठीमागे होती. काॅलेजला जात आसताना समोर अलेल्या नागाला घाबरून पळत असताना माय समोरून येऊन तिला मिठीत घेते. लेखिकेला माय वेळेवर कशी पोहचली याचेच आश्चर्य वाटते. पण नंतर कळते की माय रोजच तिची समाजातील नागांपासून रक्षण करायची.

बापाबद्दल तर लेखिका फार हळवी आहे. शिक्षणासाठी खंबीरपणे तो तिच्या पाठिमागे उभा होता.बापूचा मृत्यू मात्र सुन्न करून जातो. गावोगावी गवंडी काम करून लेकीला मोठं करणारा बाप हा खरोखरच बाबासाहेबांच्या वैचारिक वारसदार होता. संपूर्ण स्वकथानात सैरभैर आणि स्वछंद वागणारा छैलाबाबू …खरं तर छैलाबाबूविषयी सांगण्यासारखं खूप काही आहे. पण लेखिकेने छैलाबाबूबद्दल सांगताना कुठेही राग , व्देष किंवा आक्रस्ताळेपणा केलेला नाही आणि हेच लेखिकेच्या लिखाणाचे यश होय. समर्पक भाषेत नेमकेपणाने छैलाबाबू बद्दल सांगितले आहे. सुख दुःखात कधीच सोबत नसलेला,फक्त नवरा म्हणून बायकोच्या शरीरावर हक्क सांगणाऱ्या छैलाबाबूने जबाबदारी मात्र कोणतीच जबाबदारी घेतली नाही. पतीची सोबत नाही हे दुःख कायम लेखिकेच्या मनात राहते.

शिकत शिकत नोकरी आणि नोकरी करत करत शिक्षण ही तारेवरची कसरत लेखिकेने पार पाडली. प्राथमिक शिक्षण ते शिक्षण विस्तार अधिकारी हा प्रवास साधा नव्हताच! शिक्षण विस्तार अधिकारी असताना जातीव्यवस्था कशी तळागाळापर्यंत पोहचलेली आहे याचे उदाहरण यात दिसून येते.पण त्याच बरोबर एक आधिकारी काय करू शकतो हे ही लेखिकेने दाखवून दिले आहे. म्हणूनच बाबासाहेबांनी मोक्याच्या जागा पटकावा आसे सांगितले होते. सरपंचालाही दम देत लेखिकेने वठणीवर आणले होते.

तीन मुलांची जबाबदारी सांभाळत हा प्रवास म्हणावा तेवढा सोपा नव्हता.तसेच चौथे अपत्य नको आणि आॅपरेशन हा निर्णय म्हणजे लेखिकेचा करारीपणा आणि धाडसीपणा दाखवतो. शिक्षणाचे बाजारीकरण कसे झाले? काॅप्यांचा सुळसुळाट या बद्दलही यात प्रकाश टाकला आहे. शिक्षणाचा खालावत चाललेला स्तर यातून दिसून येतो. शेवटी बुध्द धम्म यात्रेने त्यांचे मन अक्षरशः उजळून निघाले. पुन्हा नव्याने प्रेरणा मिळाली.गुडघ्याचे दुखणे,तीन मुले,सुना,नातवंडे यांची जबाबदारी हे सर्व यशस्विरित्या लेखिकेने पेललं.तसेच नियतीपुढे कोणाचे काहीच चालत नाही म्हटल्यांप्रमाणे कोर्ट कचेरीही नशीबात आली. पण या सगळ्यात सुखद गोष्ट घडली ती म्हणजे छैलाबाबूने तिची माफी मागत तिला मिठी मारली. यातच ती सर्वकाही भरून पावली.अल्पावधीतच छैलाबाबूचे जाणे जीवाला चटका लावून जाते. छैलाबाबुंच्या अंत्यदर्शनास भिक्कू आणि श्रामणेर भिक्कुंचे येणे ही लेखिकेच्या त्यागाचे आणि समर्पणाचे फळ होते. हे स्वकथन खूपच प्रेरणादायी आहे तितकेच काळजातून आरपार घुसणारे आहे. पुढील वाटचालीस लेखिकेस मनःपूर्वक शुभेच्छा !!!

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *