ती वावरत असते माझ्या अवती भोवती, मला सादही घालत असते कित्येक वेळा; मी मात्र कामात इतकी व्यस्त असते की तिच्या हाकेला ‘हो ला हो’ म्हणायला देखील मला कधी वेळ मिळत नाही ,.पण ती सुध्दा माझा पाठलाग कधीच सोडत नाही!
ती वावरत असते…………..
कधी येते देवघरात तर कधी येते,
स्वयंपाक घर आवरताना ! कधी कधी
तर मी बाल्कनीत बसलेली असताना
खिडकीतून येणा-या मंद वा-यातून
हळूच मला फुंकर घालून ,मनाच्या
खोल गाभा-यात अलगद जाऊन बसते!
ती वावरत असते…………
कधी रागावते,कधी हर्षते
कधी वेदनेने हळहळते,तर कधी
स्वतःतच गुंतत जाऊन, विचारांचा
गुंता सोडवत बसते!
ती वावरत असते…………..
सूर्य अस्तास जाताना सांजवेळी
पाचोळ्यातून सळसळ करत
गतकाळच्या स्मृतीत रमत जाते,
तर कधी मौनातले गुढ उकलत
मेंदूला चालना देत; व्यक्त होत
जाते को-या कागदावर ती..माझी
क..वि. ता!!!
ती वावरत असते……………
सौ.ज्योती.प.शिंदे
रोहा -रायगड
Leave a Reply