नांदेड – बौद्ध राष्ट्रांत धम्म प्रसारासाठी मोठ्या प्रमाणावर भिक्खू संघाची निर्मिती केली जाते. तोच आदर्श खुरगावच्या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात दिसून येत आहे. हे प्रशिक्षण केंद्र धम्मचळवळीत अग्रस्थानी आले असून त्याच्या विकासासाठी भरकस प्रयत्नांची गरज असल्याचे मत महापालिकेचे माजी उपमहापौर किशोर भवरे यांनी व्यक्त केले. ते तालुक्यातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भिक्कुसंघ, श्रामणेर प्रशिक्षणार्थी, साहित्यिक अनुरत्न वाघमारे, डॉ. राम वाघमारे, शंकर नरवाडे, अॅड. रणधीर तेलगोटे, सेवानिवृत्त तहसीलदार रघुनाथ वाघवेशी, उद्योजक यशवंत उबारे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे इंजि. सम्राट हटकर, भास्कर जनकवाडे, मल्लिकार्जून लेंडाळे, पत्रकार संभाजी कांबळे, डॉ. तारु, विनायक गजभारे, धम्मसंदेश व धम्मदान यात्रा संकल्पक गंगाधर ढवळे, आरतीताई वांगीकर, ललिता दवणे, गंगाधर अंभोरे, सुभाष लोकडे, प्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. विनायक लोणे आदींची उपस्थिती होती.
पौष पौर्णिमेनिमित्त तालुक्यातील खुरगाव येथे ‘बाबासाहेब पाहिलेला माणूस’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. रघुनाथ वाघवेशी आणि अॅड. तेलगोटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्यक्ष पाहिले होते आणि काही काळ त्यांचा सहवास लाभला होता. यावेळी बोलतांना वाघवेशी यांनी बाबासाहेबांच्या आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भिक्खू संघास पुष्पदान करुन स्वागत करण्यात आले. प्रकाश नगर येथील धम्मसंदेश पथक व विदिशा महिला मंडळाकडून याचना केल्यानंतर पंय्याबोधी थेरो यांनी उपस्थित उपासक उपासिकांना त्रिसरण पंचशिल दिले. भंते मेत्तानंद, संघरत्न, किर्तीबोधी, चंद्रमणी, धम्मकिर्ती, सुदर्शन, श्रद्धानंद, सुमेध, शिलभद्र, सदानंद, सुगत, संघदीप, सुप्रबुद्ध यांच्या भिक्खुसंघाने त्रिरत्न वंदना ग्रहण केली. त्यानंतर बावीस प्रतिज्ञा वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच धम्मसंदेश पथकाकडून भिक्खू संघाला भोजनदान देण्यात आले.
दुसऱ्या सत्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यवाह इंजि. सम्राट हटकर यांनी काही प्रयोग दाखवून मनोरंजनातून प्रबोधन केले. यानंतर धम्मदान कार्यक्रम घेण्यात आला. त्यात एस.टी. महामंडळातील विभागीय वाहतूक अधिकारी संजय वाळवे यांनी त्यांची कन्या मिनल वाळवे यांच्या वाढदिवसानिमित्त सहा हजार रूपयांचे दान दिले, उपा. कमलबाई सरोदे तसेच वाकळे पी. जी. यांनी प्रत्येकी पाचशे रुपये केंद्रास धम्मदान दिले. सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने बांधकामासाठी विटदान करण्यात आले. अनेक मान्यवरांनी विविध स्वरुपाचे दान देऊन पारमिता पाळली. तर सुगाव येथील उपा. महावीर वाघोळे यांनी अपत्यदान केल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर बाबासाहेब पाहिलेला माणूस या विषयावर अॅड. तेलगोटे यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले की, बाबासाहेब हे ऐतिहासिक महापुरुष होते. त्यांच्या बोलण्यात करारीपणा, वागण्यात मोठा रुबाब होता. बाबासाहेबांचा त्यागही अलौकिकच होता. आंबेडकरी विचार हा वैश्विक आहे. देशाचा कारभार संविधानाप्रमाणे चालतो परंतु त्या विरोधात मूलतत्ववादी चळवळी नेटाने उभ्या राहत आहेत.
तिसऱ्या सत्रात सारनाथ उत्तर प्रदेश येथून भंते सिद्धार्थ बोधी आवर्जून उपस्थित राहिले. धम्मदेसना देतांना त्यांनी मोफत शिक्षण आणि धम्म शिक्षणासाठी स्वायत्त संस्थाची गरज असल्याचे सांगितले. देशभरात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी खेड्यापाड्यातील गोरगरिब विद्यार्थी जे माध्ममिक शिक्षणही पूर्ण करु शकत नाहीत अशांसाठी विद्यालयांची स्थापना होणे आवश्यक आहे. त्यासाठी दानशूर उपासकांनी पुढे आले पाहिजे. सरकारकडून बौद्ध लोकांचे उच्च शिक्षण धोक्यात आले आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गायतोंड ता. हदगाव येथील समता सैनिक दलाच्या सतरा महिलांसह संजय सोनाळे, रमेश खिल्लारे, राजू वाठोरे यांनी सहकार्य केले. तसेच आर. एस. टोके, इश्वर जोंधळे, मुकुंदराव आठवले, अंबादास कांबळे, के. के. लाठकर, तुकाराम सरोदे, पुरभाजी कांबळे, आयु दिपके, लक्ष्मण पांडागळे, निवृत्ती लोणे, कपील बिऱ्हाडे, राणी नरवाडे, चैतन्या नरवाडे, आश्विनी नरवाडे, कल्याणी नरवाडे, सुप्रिया नरवाडे, शिल्पा नरवाडे, अविनाश नरवाडे, सम्राट नरवाडे, धम्मपाल नरवाडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी राहुल काॅलनी सिडको, खुरगाव नांदुसा येथील महिला मंडळ तसेच शहराच्या विविध भागांतील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
Leave a Reply