ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

श्रावण मास आम्हां महिलांसाठी खास

August 17, 202115:00 PM 95 0 4

घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा …. “किंवा श्रावण मासी हर्ष मानसी” या ओळी कानावर पडल्या की, मन कसं त्या श्रावण सरीने चिंब चिंब न्हाऊन निघते. श्रावण महिना म्हणजे कवी,लेखक यांना सुंदर साहित्यनिर्मितीसाठी चा काळ होय. कुणी या श्रावणास नीलवर्णी कृष्ण सखा म्हणती, तर कुणी निळकंठ म्हणती. याच महिन्यात 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण साजरा होतो. कुणी मंगळागौरी समोर घागरी फुंकती. बालगोपाल एकत्र येऊन गोपक्रिडा खेळती. श्रावणातील शेवटचा दिवस म्हणजे मातृदिन साजरा केला जातो. मराठी महिन्यातील श्रावण हा महिना सण, उत्सव ,उत्साह आणि गोडधोड खाऊ देणारा महिना आहे तर माहेरवाशिणीस आपल्या माहेरची आठवण करून देणारा हा महिना आहे. बंधू-भगिनीं च्या प्रेमाचे प्रतिक म्हणून राखी बांधण्याचा हा महिना. व्रतवैकल्य, मांगल्य आणि पावित्र्य जपणारा महिना श्रावण होय.
श्रावण म्हणजे सणांचा राजा अनेक व्रतवैकल्य, विधी, रूढी-परंपरा एखाद्या भरजरी शालू नक्षीकाम केल्यावर शालूचे रूप जसे अप्रतिम होते, त्याचप्रमाणे श्रावणातील हीच व्रत वैकल्य म्हणजेच जणू सोवळे नेसलेले पवित्र वस्त्र होय. व्रत म्हणजे अस नाही की, व्रत केल्याने मोक्ष प्राप्ती होते. परंतु नातेसंबंधांचे रेशमी वस्त्र जपणारा, पुण्याई कमविण्याचा महिना म्हटले तरी वावगे ठरणार नाही. श्रावणातील प्रत्येक वाराचे व देवतेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
निसर्गाचे सौंदर्य अगदी मुक्तहस्ते उधळण करणारा हा श्रावण महिना होय. आप्तेष्टांच्या प्रेमाच्या भावना वृद्धिंगत करणाऱा व भावनिक ओढ लावणारा , पण विशिष्ट नियम लावून देणाऱ्या मास म्हणजे श्रावण मास. श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्र पाशी असतो म्हणून या महिन्याला श्रावण असे नाव दिले आहे. आणि म्हणूनच प्रत्येक वारांचे महत्त्व आणि वैशिष्ट्य खासकरून याच महिन्यात आपल्याला पहावयास मिळते.
पहिला येणारा तो सोमवार श्रावणी सोमवार म्हणून गणला जातो. देशभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची रीघ लागलेली असते. महादेवाच्या पिंडीवर या दिवशी जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. याशिवाय प्रत्येक सोमवारी शिवशंभू वर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्वही फार मोठे आहे पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जव तर पाचव्या सोमवारी शिवामुठ म्हणून सातू वहाण्यांची परंपरा चालत आली आहे.
श्रावणातील मंगळवार म्हणजे प्रत्येक मंगळवारी महिला मंगळागौरीचे व्रत करीत असतात . नवीन लग्न झालेल्या मुलीने तर पहिली पाच वर्षे हे व्रत करायचे असते ,आणि त्या दिवशी त्या नववधूने अशाच नवविवाहित मुलींना बोलावून एकत्रित येऊन सकाळी पूजा केली जाते व रात्री जागरण. जागरणाचे वेळी महिला विविध खेळ खेळत असतात यावेळी सोबतच मंगळागौरी यांची विशेष गाणी गायली जातात. बस फुगडी,तवा फुगडी ,वटवाघुळ फुगडी ,फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आटापटागोटा व साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, झिम्मा, पिंगा ,गोफ, काटवटकाना,सासु- सुन भांडण, सवतीचे भांडण , दिंड,घोडा, असे बरेच मजेशीर खेळ खेळले जातात.संपूर्ण रात्र खेळ खेळून जागरण केले जाते.
बुधवार बुद्धाची व गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरु ची पूजा केली जाते यावेळी बुध आणि गुरु या़ंचे चित्र घेऊन त्याची पूजा केली जाते. धन बुद्धी, विद्या मिळवण्यासाठी हे व्रत केले जाते.
श्रावणातील शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. आपल्या घरातील लहान मुलांच्या रक्षणासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते .लहान मुले म्हणजे मोठ्या माणसांना एक जोडणारा दुवा व बळकट धागा असतो. त्यांचे रक्षण करणारे त्यांना उदंड आयुष्य मिळणारे व त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी साकडे घालणारे व्रत म्हणजे जिवंतिका व्रत होय. आणि संतती रक्षण करण्यासाठी केले जाणारे हे जिवितीकेचे व्रत होय.
शनिवार म्हणजे अश्वस्थाची ची पूजा केली जाते.दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळाशी घालावे, त्यामुळे दुधाचा सुगंध पिंपळा ला मिळतो आणि पिंपळा जवळ विष्णूचे स्थान असते. पिंपळाच्या खाली जर मारुतीचे मंदिर असेल तर मारुतीचीही शनिवारी पूजा केली जाते मारुती साठी शेंदूर,तेल,व रुईच्या पानांची माळ मोठ्या निष्ठेने घातली जाते. प्रल्हाद अवतारात नृसिंह खांबातून प्रगटले याचे प्रतीक म्हणून भिंतीवर खांबावर नृसिंहाचे चित्र रेखाटले जाते व त्याची पूजा केली जाते.
आता श्रावणातील रविवार आदित्य राणूबाई व्रत होय. हे व्रत स्त्रियांसाठी आहे खानदेशात आजही हे व्रत प्रचलित आहे खानदेशात बऱ्याच ठिकाणी मंगल कार्यात राणूबाई आणि सूर्याचे लग्न लावण्याची रीत आहे सूर्य पूजा करणे आपल्या संस्कृतीत आहे त्यामुळे श्रावणातील प्रत्येक रविवार सूर्याची पूजा करून खिरीचा नैवेद्य दाखवला जातो.
असा हा श्रावण महिना म्हणजे सुरुवात होते नागपंचमीने व या महिन्याचा शेवट होतो तो पिठोरी अमावस्याने म्हणजेच मातृदिन . याशिवाय या दिवशी बैलाची पूजा करून त्यांच्या बद्दल असलेले ऋणानुबंध साजरा करण्याचा दिवस म्हणजेच बैलपोळा म्हणून साजरा केला जातो.
असा हा श्रावण महिना म्हणजे चैतन्यमय वातावरण व भक्तीमय वातावरण घेऊन येतो, तसेच आम्हा महिलांसाठीही सणांची भरगच्च भेट घेऊन येतो.
आणि मग “श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशिमधारा ….” हे गाण नकळतच ओठांवर येत…….

सौ. तृप्ती भोईर
मो. नं ९१६७५८१६६०
उरण- रायगड

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *