उरण ( संगिता पवार ) देशाच्या स्वातंत्र्यासाठी उरण तालुक्यातील चिरनेर येथे २५ सप्टेंबर १९३० रोजी आक्कादेवीच्या माळरानावर झालेल्या गौरवशाली व शौर्यशाली लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचा ९१ वा स्मूतीदिन कार्यक्रम २५ सप्टेंबर रोजी चिरनेर गावातील स्मूतीस्तंभा जवळ मान्यवरांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा करण्यात आला.यावेळी हुतात्म्यांना शासकीय मानवंदना म्हणून उरण पोलीसांकडून बंदुकीच्या २१ फैऱ्या हवेत झाडण्यात आल्या.
ब्रिटिश सत्ते विरोधात लढल्या गेलेल्या रणसंग्रामात धाकू गवत्या फोफेकर ,नाग्या महादू कातकरी दोघेही – चिरनेर,आलू बेमट्या म्हात्रे – दिघोडे,आनंदा माया पाटील – धाकटी जुई,रामा बामा कोळी – मोठीजुई,मोरेश्वर रघुनाथ शिंदे(न्हावी) – कोप्रोली,परशुराम रामा पाटील – पाणदिवे व हसुराम बुद्धाजी घरत – खोपटे या आठ शूरविरांना चिरनेर गावातील आक्कादेवीच्या माळरानावर वीर मरण प्राप्त झाले.या गौरव व शौर्यशाली रणसंग्रामाच्या स्मूतीना उजाळा मिळावा व युवा पिढी समोर आपल्या पुर्वजानच्या इतिहासास स्मरण व्हावे यासाठी
दरवर्षी चिरनेर येथे रायगड जिल्हा परिषदेच्या आणि चिरनेर ग्रामपंचायतीच्या वतीने २५ सप्टेंबर रोजी स्मूतीदिन कार्यक्रमाचे आयोजन शासकिय मानवंदना देऊन साजरा करण्यात येतो, यावेळी हुतात्म्यांच्या नातेवाईकांचा व स्वातंत्र्य सैनिक आणि जखमींच्या नातेवाईकांचा यथोचित सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येतो.मात्र यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असला तरी शासनाच्या निर्बंधांचे पालन करीत अधिक गर्दी न करता हुतात्मा स्मूती स्तंभा जवळ आणि शिलालेख या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र आणि पुष्पहार अर्पण करुन साजरा करण्यात आला आहे.
चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या ९१ व्या स्मूतीदिनांचे औचित्य साधून उरण पोलिसांकडून शासकीय सलामी म्हणून हवेत बंदुकीच्या २१ फैऱ्या झाडण्यात आल्या.याप्रसंगी हुतात्म्यांच्या स्मूती स्तंभाजवळ आणि हुतात्माच्या शिल्पाजवळ आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उरण पंचायत समितीच्या सभापती सौ समिधा निलेश म्हात्रे, उपसभापती सौ शुभांगी सुरेश पाटील, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे,उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी एन एन गाडे,रायगड जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर,माजी सभापती भास्कर मोकल,साई देवस्थानचे रविशेठ पाटील, कामगार नेते भुषण पाटील, सुधाकर पाटील, सरपंच संतोष चिर्लेकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत आदिंसह इतर मान्यवरांनी तसेच हुतात्म्यांचे नातेवाईक, ग्रामपंचायत सदस्य यांनी पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले.
Leave a Reply