जालना (प्रतिनिधी) ः शहरातील नवीन मोंढा परिसरात राज्य शासनाच्या वतीने एक शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले असले तरी या परिसरात असलेल्या कामगारांसह जिल्ह्याभरातील येणार्या शेतकरी, शेत मजुरांची संख्या लक्षात घेवून आणखी एक नवीन शिवभोजन केंद्र सुरु करावे अशी मागणी लॉयन्स क्लब डायमंडचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मोहन इंगळे यांनी केली आहे.
या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात मोहन इंगळे यांनी म्हटले आहे की, नवीन मोंढा परिसरात जवळपास 500 पेक्षा अधिक दुकाना असून या परिसरात ठोक व किरकोळ विक्रेत्या व्यापार्यांकडे 2 पेक्षा अधिक कामगार कामावर आहेत. या शिवाय जालना कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जिल्ह्याभरातून माल विक्रीसाठी घेवून येणार्या शेतकर्यांची संख्या देखील दररोज मोठ्या प्रमाणात असते. शेकडो कामगार, शेतकरी, शेतमजुरांची नवीन मोंढ्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात दररोज होत असलेली वर्दळ लक्षात घेतली तर या परिसरात एक शिवभोजन केंद्र अपुरे पडते. त्यामुळे अनेक गोर गरीब व गरजु लोक शिवभोजन थाळीपासुन वंचित राहत असून हि बाब लक्षात घेवून नवीन मोंढा परिसरात आणखी एक शिवभोजन थाळी केंद्र सुरु करावे अशी मागणी मोहन इंगळे यांनी केली आहे. या संदर्भात आपण लवकरच जिल्ह्याधिकारी डॉ. विजय राठोड व जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती बसय्ये यांची भेट घेवून त्यांच्याकडे या मागणी बाबत पाठपुरावा करणार असल्याचे इंगळे यांनी या पत्रकात स्पष्ट केले आहे.
Leave a Reply