एका हिंदी सिनेमामध्ये एका लहान मुलाच्या तोंडी एक गाणं आहे,
‘दुध पिने में Tension है, स्कूल जाने में Tension है ,
पढने में Tension है, Tension! Tension! Tension!
एखाद्या लहान मुलाला Tension एवढे सतावत असेल तर हे Tension आहे तरी काय ? आज आपण या Tension ची शास्त्रशुद्ध माहिती बघूया.
प्राचीन काळी माणूस कळपात राहायचा, घनदाट जंगलात राहायचा, भूक लागली की शिकार आणि जंगलातून फक्त भटकत राहायचा. अग्नीचा शोध, चाकाचा शोध, धातूचा शोध, शेतीची सुरुवात याने माणसाचे जीवन बदलून गेले. प्रगतीने इतका वेग घेतला की निसर्गावर मात करण्याच्या नादात त्याला निसर्गाचा विसर पडला. आणि या प्रगतीशील, बुद्धिमान माणसाने आपला नवीन शत्रू निर्माण केला मानसिक ताणतणाव.
ताणतणाव अर्थ :
प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कारणाने ताणतणाव येतचं असतो, ताण म्हणजे आपल्याला जी परिस्थिती हवी आहे ती न मिळणे.
ताण ही संकल्पना प्रथम हेन्स सेले यांनी १९३६ मध्ये मांडली. त्यांनी ताणाचे वर्णन ‘Stress as the rate of all wear and tear caused by life’ असा केला आहे. ताण म्हणजे अशी परिस्थिती जिथे माणसाच्या सुस्थितीला किंवा जुळवून घेण्याच्या क्षमतेला धक्का पोहोचतो.
‘ज्याच्यामुळे शारीरिक, मानसिक कार्यक्षमतेत विघटन घडून येते किंवा धोका घडून येण्याचा संभव असतो अशा घटकाद्वारे उद्भभवणारी प्रक्रिया म्हणजे ताण होय’ ही लाझार फोकमन यांनी केलेली व्याख्या आहे.
आपल्या समोर साप आला तर आपण काय करू शकतो, एक तर आपण पळू शकतो, दुसरं म्हणजे स्थिर राहून मदतीसाठी बोलवू शकतो, किंवा सर्पमित्र बनून साप पकडून सुरक्षित त्याच्या अधिवासात त्याला सोडू शकतो किंवा भीतीने हार्टफेल सुद्धा होऊ शकते. घटना एकच पण प्रतिसाद वेगवेगळे. ताण एकच पण त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग वेगवेगळे. या दिलेल्या प्रतिक्रिया म्हणजे आपले आत्मकवच आहे. हे आत्मकवच वापरताना आपले हृद्याचे ठोके वाढतात, भीती वाटते, धडधड वाढते. म्हणजेच तणावयुक्त परिस्थितीला तोंड देण्यासाठी शरीर स्वत:मध्ये बदल करते. आदिमानवाला सुद्धा ताण यायचा पण त्याच्या शरीरातील बदल पूर्ववत व्हायचे पण आजच्या माणसाच्या शरीरामध्ये झालेले बदल कायम रहातात कारण तो ताण कधीच संपत नाही.
प्रमोद बात्रा यांच्या मते तणाव हे गुलाबाच्या झाडासारखे असतात. तुम्ही त्याच्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहता यावर ते अवलंबून आहे.
तुम्ही गुलाबाच्या झाडाकडे एक संपूर्ण काटेरी रोपटे म्हणून पाहू शकता की ज्याच्या टोकाला गुलाबाची फुलं आहेत किंवा ह्याच गुलाबाच्या झाडाला सुंदर फुलं आणि फुलाखाली काटे अशा नजरेने पाहू शकता, शिवाय हे काटे तुम्ही हातमोजे घालून तुमच्या हाताने मोडून टाकू शकता.
आयुष्य हे असेच समस्यांनी भरलेले असते त्यातल्या काही समस्या या खरंच अवघड असतीलही. खरंतर तुम्हीच ह्या समस्या मोठ्या करू शकता किंवा तुमच्या कौशल्याचा वापर करून त्या कमी करू शकता, नवनवीन युक्त्या वापरून एकापाठोपाठ एक समस्या सोडवू शकता. तुम्ही आयुष्यातल्या ताणतणावांना बळी पडू शकता किंवा ह्याच ताणतणावातून तुमचे आयुष्य घडवू शकता.
पुढच्या लेखात आपण ताणतणावाचे प्रकार आणि तो कमी करण्यासाठी काही छोट्या छोट्या उपायांचा विचार करू.
अनिता पोतदार मॅडम
प्राचार्या,
क. ने. अध्यापक विद्यालय
कराड
मो. नं. 7720976509
Leave a Reply