नांदेड – जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पंधरा ते पंचवीस असलेल्या रुग्णसंख्येत अडिचशेपर्यंत वाढ होतांना दिसत आहे. अशाही परिस्थितीत उच्च प्राथमिक तथा माध्यमिक शाळा सुरु आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मास्क, सॅनिटाईझर, शारिरिक अंतर या त्रिसूत्रीचा काटेकोरपणे अवलंब करावा असे आवाहन शिक्षणविस्तार अधिकारी सरस्वती आंबलवाड यांनी केले. त्या जवळा देशमुख येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी केंद्रप्रमुख अमीन पठाण, शिक्षक नेते संतोष अंबुलगेकर, मुख्याध्यापक ढवळे जी. एस., तपासणी अधिकारी कलणे एस. बी., संतोष घटकार, केदारे, शेख आदींची उपस्थिती होती.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर यानिमित्ताने घेतलेल्या ‘आईचे पत्र सापडले’ या उपक्रमाची त्यांनी माहिती घेतली.
आईचे पत्र हरवले, आम्हाला नाही सापडले! हा एक बालपणीच्या काळातील खेळ एक आनंददायी मानला जातो आणि आजही खेळल्या जातो. पण यात नकारात्मक शब्दांची भलावण करण्यात आल्याचे दिसते. यात सकारात्मक व आशयपूर्ण शब्दांची जुळवणी करीत आईचे पत्र हरवले ऐवजी आईने लिहिलेले पत्र मुलींना सापडले हा आनंददायी आणि भावनाप्रधान उपक्रम जवळ्याच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत राबविण्यात आला. यानिमित्ताने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या येणाऱ्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून शाळेचे मुख्याध्यापक ढवळे जी. एस. आणि सहशिक्षक संतोष घटकार यांच्या कल्पकतेतून शिक्षण घेऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याबाबत भावनिक साद घालणारी पोस्टकार्डे पोस्टाद्वारे पाठवून शाळेत शिकणाऱ्या आपल्या मुलींना आश्वस्त केले आहे.
ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणावर गंडांतर येऊ नये यासाठी मोबाईलच्या जमान्यात अनौपचारिक पत्रलेखनास फारसे महत्त्व उरले नसले तरी ‘आईचे पत्र सापडले’ हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. यात मीनाताई गोडबोले, आशाताई झिंझाडे, प्रतिभा गोडबोले, रेणुका टिमके, मनिषा गच्चे, जयश्री कदम, रेखा शिखरे, मायावती गच्चे यांच्यासह अनेक माता पालकांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., सहशिक्षक संतोष घटकार, मारोती चक्रधर, हैदर शेख, समाधान लोखंडे, इंदिरा पांचाळ, श्रावस्ती गच्चे, गंगासागर शिखरे, अंजली कदम, साक्षी गच्चे, संघमित्रा गच्चे, नंदिनी टिमके, विद्या गोडबोले, अंजली झिंझाडे, प्रतिक्षा गोडबोले आदींनी परिश्रम घेतले.
Leave a Reply