ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनास सादर करा – पालकमंत्री राजेश टोपे

September 9, 202122:58 PM 10 0 0

जालना, दि. 9 – जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतपीक, फळपिकांबरोबरच विहिरी, रस्ते,पुल, शाळाखोल्या, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणी पुरवठा योजना आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची अधिकाधिक भरपाई मिळावी यासाठी प्रत्येक विभागाने नुकसानीचा सविस्तर अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उप विभागीय अधिकारी सर्वश्री संदीपान सानप, भाऊसाहेब जाधव, स्वप्नील कापडनीस, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बी.एस. रणदिवे, कार्यकारी अभियंता श्री डाकोरे, तहसिलदार प्रशांत पडघन आदींची उपस्थिती होती.


पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे शेतपीक, फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल तातडीने शासनास सादर करण्यात यावा.
अतिवृष्टीमुळे अनेक गावातील विद्युत पोल, ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाले असल्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. ज्या ज्या गावामध्ये विद्युत पोल खराब झाले असतील त्याची माहिती तातडीने विद्युत विभागास सादर करण्यात यावी. विद्युत विभागाने याबाबत त्वरेने पाऊले उचलत गावे अंधारात राहणार नाहीत, याची काळजी घेऊन गावातील वीज पुरवठा पुर्ववत सुरु करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
पावसामुळे अनेक गावातील शाळाखोल्यांची, अंगणवाड्यांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी शाळांच्या संरक्षक भिंतीही पडल्या आहेत. पाण्यामुळे शाळांमधील साहित्य भिजल्यामुळे खराब झाले आहे. या झालेल्या सर्व नुकसानीचा प्रस्ताव तयार करुन तातडीने शासनास पाठविण्याच्या सुचनाही शिक्षण विभागाला यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या.
अनेक गावांमध्ये पाण्यामुळे रस्त्यांबरोबरच पुलांचीही दुर्दशा झाली असुन ते तातडीने दुरुस्त करुन घेण्यात यावेत. तसेच काही ठिकाणी आरोग्य उपकेंद्रांच्या ईमारतीबरोबरच विहिरींचेही पावसामुळे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या सर्व नुकसानीची माहिती शासनास पाठविण्यात यावी. झालेल्या नुकसानीची अधिकाधिक भरपाई मिळविण्यासाठी आपण व्यक्तीश: मंत्रालयीन स्तरावर प्रयत्‍न करु, असेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये नदीकाठी व ओढ्याच्या काठी घरे असलेल्या अनेक गोरगरीब कुटूंबांच्या अन्नधान्य, कपडे, भांडी तसेच घरावरील पत्र्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या ज्या गावात अशाप्रकारे नुकसान झाले असेल त्या प्रत्येक गावात नुकसानीचे पंचनामे करुन बाधित कुटूंबांना शासन निर्णयाप्रमाणे सानुग्रह अनुदान तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही उपस्थित अधिकाऱ्यांना पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.
जालना जिल्ह्यात माहे जुलै महिन्यात 2 हजार 900 हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले असुन नुकसानीचा अंतिम अहवाल सादर करुन निधीची मागणी करण्यात आली आहे तर ऑगस्ट महिन्यामध्ये 1 लक्ष 25 हजार 686.40 हेक्टर, माहे सप्टेंबरमध्ये 80 हजार 286.23 हेक्टर असे एकुण 2 लक्ष 8 हजार 873.08 क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अतिवृष्टीमुळे 662 गावे तर 1 लक्ष 97 हजार 499 शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज असुन 4 व्यक्ती मयत, एक व्यक्ती जखमी, लहान व मोठे अशा एकुण 255 जनावरे, 820 कोंबड्यांची हानी, 217 कच्च्या घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी मंत्री महोदयांना दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *