जालना (प्रतिनिधी) जालना शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाच्या नगरविकास खात्यातर्फे दहा कोटी रूपयांचा निधी मंजुर केला आहे. आमदार कैलास गोरंटयाल यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर हा निधी मंजुर करण्यात आला. दरम्यान शहरातील उर्वरीत रस्त्याच्या कामांसाठी लवकरच आणखी दहा कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजीतदादा पवार यांनी दिल्याचे आ. गोरंट्याल यांनी स्पष्ट केले.
जालना शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली असून या रस्त्यांच्या कामासाठी शासनाने निधी मंजुर करावा अशी आग्रही मागणी आ. कैलास गोरंट्याल यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजीतदादा पवार आणि नगरविकास खात्याचे मंत्री श्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे करून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेवून राज्य शासनाच्या नगरविकास खात्यातर्फे आज दि. 10 फेबु्रवारी बुधवार रोजी वैशिष्टपुर्ण योजनेअंतर्गत जालना शहरातील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंटीकरणासाठी सुमारे दहा कोटी रूपयांचा निधी मंजुर करून तसे आदेश निर्गमित केले आहेत. त्यात शहरातील मंमादेवी ते रेल्वेस्टेशन या रस्त्याच्या कामासाठी 3 कोटी 75 लक्ष रूपये, शिवाजी पुतळा ते गुरूबच्चन चौक ते आझाद मैदान या रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी 25 लक्ष रूपये, मुर्गीतलाव पोलिस चौकी ते बाबुराव काळे चौक या रस्त्याच्या कामासाठी 2 कोटी रूपये, शिवाजी महाराज पुतळा ते जिजामाता चौक ते अंबर हॉटेल पर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी 3 कोटी रूपये असा एकुण दहा कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. राज्याच्या नगरविकास खात्याचे अव्वर सचिव विवेक कुंभार यांनी याबाबतचे आदेश आज काढले आहेत. दरम्यान, जालना शहरातील अन्य रस्त्यांच्या कामासाठी देखील आनखी निधी आवश्यक असल्याची बाब आमदार कैलास गोरंट्याल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजीतदादा पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या उर्वरीत रस्त्यांच्या कामासाठी देखील लवकरच आनखी दहा कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही श्री पवार यांनी आमदार गोरंट्याल यांना दिली आहे. उपलब्ध झालेल्या निधीतून उपरोक्त रस्त्यांची कामे लवकरच सुरू करण्यात येणार असून उर्वरीत रस्त्यांची कामे निधी उपलब्ध झाल्यानंतर करण्यात येईल असे स्पष्ट करून शहरातील खराब झालेल्या प्रमुख रस्त्यांच्या कामांचे नियोजन जालना पालिकेकडून करण्यात आले असून प्राधान्यक्रम निश्चित करू सदर रस्त्यांची कामे देखील लवकरच मार्गी लावल्या जाईल असे आ. गोरंट्याल यांनी सांगीतले आहे. शहरातील उपरोक्त रस्त्यांच्या कामासाठी नगरविकास खात्याकडून दहा कोटी रूपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून दिल्याबद्दल जालना शहरातील जनतेच्या वतीने आ. कैलास गोरंट्याल व नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजीतदादा पवार आणि नगरविकास खात्याचे मंत्री श्री एकनाथराव शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहे.
Leave a Reply