उरण (तृप्ती भोईर ) : उरण दिनांक 19 ऑक्टोबर मंगळवार २०२१ रोजी आधार सामाजिक सेवाभावी संस्था उरण यांच्यावतीने या संस्थेच्या संचालिका अश्विनी निलेश धोत्रे यांच्या चमूने ” वृक्ष लावा दारोदारी समृद्धी होईल घरोघरी” या उक्तीप्रमाणे आज कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे “या श्री संत तुकाराम महाराजांच्या या ओवीची सत्यता आज मानवास समजण्यासाठी वृक्षारोपण मोहीम राबवण्यासाठी आज सर्वत्रच प्रयत्न होत आहेत. पर्यावरण व निसर्ग एक असा विषय आहे ज्यात , आपल्याला जगविण्याची आणि मारण्याची अशी दोन्हीही क्षमता आहे .पर्वत ,डोंगर, नदी, समुद्र ,प्राणी ,पशु ,मानव, जल, वायु ,अग्नि हे निसर्गाचे घटक यामध्येच वृक्ष या घटकाला ही अनन्यसाधारण महत्त्व आहे. झाडे ही एक निसर्गाची सुंदर ठेव आहे . आणि आपण ती मनापासून जपली पाहिजे. फक्त झाड लावणे हाच उद्देश न ठेवता त्यांना जगविणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.
सुंदर वनराई ही निसर्गाची शान आहे, सौंदर्य आहे हे सौंदर्य जपण्यासाठी आधार सामाजिक सेवाभावी संस्था उरण यांच्या वतीने पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने “वृक्ष लावा दारोदारी समृद्धी होईल घरोघरी” अभियान राबवण्यात आले आहे. या अभियानाचे हे पहिलेच वर्ष आहे या अभियानाअंतर्गत आधार सामाजिक सेवाभावी संस्था उरण यांच्यातर्फे आंबा ,पेरू, सीताफळ, जाम, चिकू, फणस, आवळा ही फळझाडे भविष्याच्या दृष्टिकोनातून व जमिनीची धूप थांबविण्यासाठी तसेच आज आजीने लावलेले झाड भविष्यात नातवंडांना फळे मिळवून देईल .या उद्देशाने याचबरोबर जास्वंदीचे फूलझाड , तसेच स्त्रीच्या सौभाग्याचं लेणं, आणि औषधी वऑक्सीजन मिळवून देणारे पवित्र तुळशीची रोप अशा प्रकारच्या फळझाडे व फुलझाडांचे वाटप करण्यात आले.
या संस्थेच्या संचालिका अश्विनी धोत्रे यांनी वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात श्री गणेश मंदिराच्या आजुबाजूच्या मोकळ्या जागेत वृक्ष लावून करण्यात आली. तर बाकीची झाडे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आली.घरोघरी जाण्याचा उद्देश हाच की, आपल्या घरासमोर लावलेल्या झाडांची देखरेख व मशागत स्वतः जातीने करता येते डोंगर रानात लावलेली झाडे या़चे संवर्धन होत नसल्याचे दिसून येते म्हणून त्यांनी हे वृक्ष वाटप कुटुंबातील सदस्यांच्या हाती झाड देऊन केले.
या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात ईशानी शिंदे, आवृत्ती पालकर, अर्चना समेळ ,अर्चना चोरगे ,संगीता ढेरे ,संयुक्त ठाकूर, शर्मिला धकाड या महिला वर्गाने विशेष सहभाग घेऊन ही वृक्षारोपणाची मोहीम यशस्वी केली.
Leave a Reply